रोगराईस कारणीभूत असलेल्या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे गंगानदीतील प्रमाण ३२ पट ! – CAG Report

  • प्रशासकीय हलगर्जीपणा दाखवणारा ‘कॅग’चा अहवाल सादर

  • ‘नमामि गंगे’ उपक्रमातील १६ टक्के निधीचाच प्रभावी वापर

  • ३२ टक्के सांडपाणी शुद्धीकरण न करताच थेट सोडले जाते गंगानदीत

गैरसैंण (उत्तराखंड) – ‘नमामि गंगे’ प्रकल्प हिंदूंसाठी पूज्य असणार्‍या गंगानदीच्या शुद्धीकरणासाठी योजिला गेला असला, तरी ती अनेक पटींनी प्रदूषितच होत असल्याचे दिसत आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, म्हणजेच ‘कॅग’चा या संदर्भातील देवप्रयाग ते हरिद्वार या क्षेत्रातील गंगेच्या पाण्याची स्थिती दर्शवणारा अहवाल समोर आला आहे. यांतर्गत गंगानदीच्या पाण्यात रोगराईस अनुकूल वातावरण बनवणार्‍या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे प्रमाण ३२ पटींनी अधिक असल्याचे आढळले. याखेरीज अनेक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन करत नसल्याचेही आढळून आले. हे लेखापरीक्षण वर्ष २०१८ ते २०२३ या कालावधीत उत्तराखंडमध्ये ‘नमामि गंगे’ या उपक्रमाच्या कार्यवाहीचा (अंमलबजावणीचा) आढावा घेतांना करण्यात आले.

अहवालातील महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. अनुमाने ३२ टक्के सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातून शुद्धीकरण न होताच थेट गंगेत सोडले जात आहे.

२. गंगेच्या किनार्‍यावर असलेल्या शहरांमध्ये या योजनेतील अनेक घटक योग्य प्रकारे अंमलात आणले गेले नाहीत.

३. प्रकल्पांतर्गत वृक्षलागवडीशी संबंधित कामांमध्येही अपेक्षित प्रगती झालेली नाही. योजनेसाठी निश्चित केलेल्या खर्चापैकी अनुमाने १६ टक्के रक्कमच प्रभावीपणे वापरली गेली आहे.

४. दूषित पाणी आणि निकृष्ट स्वच्छता यांमुळे अनेक गंभीर आजार पसरू शकतात. यांत जुलाब, आमांश, ‘हिपॅटायटिस ए’, टायफॉईड आणि पोलिओ यांसारख्या आजारांचा समावेश होतो.

संपादकीय भूमिका

  • हे प्रशासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! यास उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, तसेच देवनदी गंगेच्या शुद्धीकरण प्रक्रियेची समयमर्यादा १०० कोटी हिंदूंना स्पष्ट करावी !
  • गंगा नदीत अशा प्रकारे विनाप्रक्रिया सांडपाणी सोडणार्‍या आस्थापनांना सरकार टाळे का ठोकत नाही ? तसेच महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून असे होत असेल, तर त्यांनाही सरकारने धडा शिकवला पाहिजे !
  • देवनदी गंगेची ही स्थिती होण्यास १०० कोटी हिंदूही तितकेच उत्तरदायी आहेत ! त्यांनी आता तरी सरकारवर दबाव आणून गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
  • समस्त मानव जातीला शुद्ध करून पापमुक्त करणार्‍या गंगा नदीलाच अशुद्ध करणारे महापापी होत. अशांचे पाप कधीही धुतले जाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !