Karnataka CM Siddaramaiah : देवाच्या दृष्टीने जात-धर्म असा भेद नाही !

  • जात आणि धर्म यांच्या नावाने राजकारण करून सत्ता मिळवणार्‍या काँग्रेसचे कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधान !

  • हे भेद मानवानेच निर्माण केल्याचे सूतोवाच

मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मैसुरू (कर्नाटक) – देवाच्या दृष्टीने जात किंवा धर्म, असा भेद नसतो. तो मानवानेच निर्माण केला आहे. आज माणूस माणसाचा द्वेष करू लागला आहे, ही परिस्थिती पालटून सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावे आणि गुण्यागोविंदाने रहावे, अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी, अशी आशा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. (अशी व्यवस्था निर्माण करण्यास सिद्धरामय्या यांना कुणी रोखले आहे ? देशात आणि अनेक राज्यात सर्वाधिक काळ काँग्रेसीच सत्ता असतांना तिने अशी व्यवस्था का निर्माण केली नाही ? काँग्रेसनेच जिहादी आतंकवाद्यांना आणि जिहादी मुसलमानांना नेहमीच पाठीशी घातल्याने हिंदु कधीच गुण्यागोविंदाने राहू शकलेले नाहीत, यावर तेे का बोलत नाहीत ? – संपादक) येथील शिरमल्ली गावात ग्रामस्थांनी बांधलेल्या लक्ष्मीदेवी मंदिराचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, देव केवळ मंदिरापुरता मर्यादित नाही. सर्वत्र असलेल्या देवावर माझा विश्‍वास आहे. प्रत्येक कामाचा प्रारंभ करतांना मी देवाचे स्मरण करतो आणि सर्वांचे भले व्हावे यासाठी प्रार्थना करतो. (हिंदु सर्वांचे भले होण्यासाठीच प्रार्थना करतात; मात्र काही समुदाय ‘आमचाच देव महान असून अन्य कुणीही नाही’ असे सांगतात आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करत असतात, यावर सिद्धरामय्या कधी बोलणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • देवाच्या दृष्टीने जात-धर्म असा भेद नाही; पण काँग्रेसच्या दृष्टीने आहे, त्याचे काय ? आणि काँग्रेसवाले कधीपासून देवाला मानायला लागले ?
  • असे आहे, तर सिद्धरामय्या जाती-धर्माच्या आधारे दिल्या जाणार्‍या सुविधा बंद करण्याचे धाडस दाखणार का ? कि सर्व काही ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ?