T20 Betting Scam : ‘टी-२०’ विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील १० सहस्र कोटी रुपयांच्या सट्टेबाजीच्या प्रकरणाची चौकशी करा !

  • ‘सुराज्य अभियाना’ची मागणी !

  • ‘सुराज्य अभियाना’चे नागपूर आणि गोवा येथील तक्रारींना समर्थन !

नागपूर/पणजी, ८ मार्च (वार्ता.) – कर्णावती (गुजरात) येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या ‘टी-२०’ विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात १० सहस्र कोटी रुपयांची सट्टेबाजी करण्यात येत आहे. ‘हाय-टेक’ अ‍ॅप्स आणि ‘ऑफशोअर सर्व्हर’ (एखाद्या देशाबाहेर असलेल्या डेटा सेंटरमध्ये ठेवलेला सर्व्हर) यांद्वारे हा घोटाळा केला जातो.

या प्रकरणी रायबंदर, पणजी येथील जागरूक नागरिक श्री. दिलीप शेट्ये यांनी पणजी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

पणजी येथील सायबर सेल मध्ये तक्रार देताना श्री दिलीप शेट्ये (उजवीकडील)

नागपूर येथे एका जागरूक नागरिकानेही ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारींना हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने जाहीर पाठिंबा दिला आहे. या प्रकरणाची विशेष अन्वेषण पथकाद्वारे उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सुराज्य अभियानाने केली आहे.

सुराज्य अभियानाने सांगितलेल्या सट्टेबाजीवर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना !

१. १० सहस्र कोटी रुपये या आकड्याची भीषणता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ संबंधित प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून या माहितीच्या स्रोताची पडताळणी करावी आणि सट्टेबाजांचे नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त करावेत. जप्त रक्कम जनहिताच्या योजनांसाठी वापरावी.

२. केंद्र सरकारने संमत केलेल्या ‘ऑनलाईन गेमिंग कायदा २०२५’नुसार कारवाई व्हायला हवी, त्यात अवैध सट्टेबाजीला साहाय्य करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

३. अंमलबजावणी संचालनालय आणि सायबर सेल यांनी हवाला मार्ग (अरबी आणि दक्षिण आशिया येथील देश पैशांचे हस्तांतर करण्यासाठी वापरत असलेली एक विशिष्ट प्रणाली) अन् डिजिटल पेमेंट यांचे मार्ग बंद करावेत.

४. स्थानिक बुकी (सट्टा दलाल) आणि आंतरराष्ट्रीय सिंडिकेट (टोळी) यांच्यातील संबंधांचा शोध घेण्यासाठी राज्य स्तरावर तात्काळ ‘विशेष अन्वेषण पथक’ स्थापन करावे.

५. भारताची आणि क्रिकेटची जगभरात अपकीर्ती होऊ नये, यासाठी सामना संपण्यापूर्वीच या जाळ्यावर देशांतर्गत सर्जिकल स्ट्राईक होणे आवश्यक आहे. प्रशासकीय पारदर्शकता आणि राष्ट्रीय हित यांसाठी सुराज्य अभियान या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.

या संदर्भात ‘सुराज्य अभियाना’ने म्हटले की,

१. काही प्रमुख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या सट्टेबाजीविषयीच्या वृत्ताची जनहित याचिका (सुमोटो) नोंद घेऊन पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करायला हवी होती.

२. इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारी सट्टेबाजी भारताच्या जागतिक प्रतिमेला तडा देणारी आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होत असून भारतीय क्रिकेटची विश्‍वासार्हताही धोक्यात आली आहे.

३. क्रिकेटच्या निमित्ताने सट्टा, जुगार मोठ्या प्रमाणावर चालतो. हे चालवणारे काही ठराविक लोक असतात, याविषयी अन्वेषण यंत्रणांनाही ठाऊक असते. अनेक सट्टेबाजांना पकडल्याची वृत्ते येतात; मात्र पुन्हा सट्टाबाजार चालूच रहातो. याला कुणाचे पाठबळ आहे ? ते शोधायला हवे. छोट्या माशाऐवजी मोठा मासा पकडण्याची नितांत आवश्यकता आहे.