३.३.२०२६ या दिवशी ‘धूलिवंदन आणि मदनोत्सव’ झाला. त्या निमित्ताने…
‘कामदेव’ हा प्राणीमात्रांच्या उत्पत्तीच्या संबंधातील प्रमुख देव आहे. तो ‘प्रेम, इच्छा आणि सौंदर्य’, यांचा देव आहे. ३.३.२०२६ या दिवशीच्या लेखात आपण कामदेवाची उत्पत्ती, परिवार, त्याची विविध नावे आदी सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहू.
भाग २
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014111.html

७. कामदेवाच्या ५ बाणांची वैशिष्ट्ये !
७ अ. अमरकोषामधील श्लोकामध्ये कामदेवाच्या पाच बाणांचे केलेले वर्णन !
अरविन्दमशोकं च चूतं च नवमल्लिका ।
नीलोत्पलं च पञ्चैते पञ्चबाणस्य सायकाः ।। – अमरकोष, काण्ड १, स्वर्गवर्ग, श्लोक २९
अर्थ : ‘अरविंद म्हणजे श्वेतकमल, अशोकं म्हणजे अशोक वृक्षाचे पुष्प, चूतं म्हणजे आम्रमंजरी, नवमल्लिका म्हणजे नुकतीच उमललेली सुवासिक आणि सुंदर फुले अन् नीलोत्पल म्हणजे निळ्या रंगाचे कमळ.’ हे कामदेवाचे पाच बाण आहेत.
या श्लोकात प्रेमाचा हिंदु देव ‘कामदेव’ याला ‘पंचबाण’ किंवा ‘पाच बाण असलेला’, असेही म्हटले आहे. कामदेवाकडे कमळ, अशोक, आंबा, ताजी चमेली आणि निळे कमळ ही फुले आहेत. ती कामदेवाच्या हातातील पाच बाणांची नावे आहेत. त्याच्या जवळील ५ कामबाणांचे वर्णन पुढील सारणीत दिले आहे.
भारतीय सौंदर्यशास्त्र आणि कविता यांमध्ये ‘प्रेम’ ही केवळ एक भावना नाही, तर निसर्गाने निर्माण केलेला एक संवेदी, म्हणजे ‘शब्द, स्पर्श, रूप, रस अन् गंध’ यांनी युक्त असलेला पंचज्ञानेंद्रियांच्या स्तरावरील अनुभव किंवा अनुभूती आहे. पुढील सारणीत दिलेले प्रत्येक फूल आकर्षणाचा एक वेगळा टप्पा किंवा परिणाम दर्शवते.

७ आ. ब्रह्मांडपुराणामध्ये वर्णिलेल्या कामदेवाच्या ५ बाणांची वैशिष्ट्ये !
ब्रह्मांडपुराणामध्ये ‘प्रेम आणि सौंदर्य यांचा देव’ म्हणून ओळखला जाणारा कामदेव अन् त्याचे पाच बाण यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

टीप १ – ‘मोहन बाण’, हा कामदेवाने भगवान शिवावर वापरलेला बाण आहे. त्यामुळे शिवाच्या तिसर्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले.
७ इ. विशेष बाण : ५ मुख्य बाणांच्या व्यतिरिक्त कामदेवाकडे तीन बिंदू असलेला एक विशेष बाण आहे. या विशेष बाणातील ३ बिंदूंचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
१. पहिला बिंदू ब्रह्माच्या खाली आहे. तो सृष्टीचे प्रतीक आहे.
२. दुसरा बिंदू भगवान विष्णूच्या खाली आहे. तो कृतीचे प्रतिनिधीत्व करतो.
३. तिसरा बिंदू भगवान शंकराच्या खाली आहे. तो मुक्तीचे प्रतीक आहे.
८. देवी संध्या हिने शिवाकडे मागितलेला वर आणि त्याने त्या वराची केलेली पूर्तता !
‘सत्ययुगाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची मानसपुत्री देवी संध्या ही ऋषिमुनींना त्यांच्या यज्ञकर्मात साहाय्य करत होती. ती अखंड ब्रह्मचारिणी होती. एकदा कामदेवाने तिला स्वतःच्या बाणाचे लक्ष्य बनवून तिच्यात कामोन्माद निर्माण केला. त्यामुळे ती कामदेवावर मोहित होऊन यज्ञाचा त्याग करून त्याच्या पाठी चालू लागली. तेव्हा तेथे शिव प्रगट झाला आणि त्याने कामदेव अन् देवी संध्या यांना रोखले. तेव्हा परिस्थिती लक्षात येऊन संध्यादेवीला अत्यंत खंत वाटली आणि तिने शिवाला शरण जाऊन त्याची क्षमा मागितली. तेव्हा देवी संध्या हिने शिवाकडे वरदान मागितले, ‘‘१२ वर्षांपर्यंतच्या कन्या आणि पुत्र यांच्यावर कामदेव किंवा रति यांचा प्रभाव न पडता त्यांना कामवासनेच्या पलीकडील शुद्ध अन् निरागस जीवन जगता येऊ दे. जेव्हा त्या कन्या आणि पुत्र यौवनावस्थेत येतील, तेव्हा त्यांच्या मनामध्ये परस्परांविषयी कामेच्छा जागृत होऊ दे.’’ अशा प्रकारे देवी संध्या हिने मागितलेला वर शिवाने पूर्ण केला.’ (संदर्भ : ‘शिवपुराण’)
९. कामदेवाच्या विविध क्षमता आणि त्याच्या कार्याची वैशिष्ट्ये

१०. कामदेव आणि अन्य देवता !
अ. शिवाने कामदेवाला तिसर्या नेत्राच्या अग्नीने भस्म केले होते.
आ. प्रभु श्रीरामामध्ये सहस्रो कामदेवांचे तेज संयत, म्हणजे नियंत्रित स्थितीत अकार्यरत होते.
इ. भगवान श्रीकृष्णामध्ये लक्ष, म्हणजे लाखो कामदेवांचे तेज संतुलित स्थितीमध्ये कार्यरत होते.
ई. भगवान विष्णूमध्ये कोटी कामदेवांचे तेज उन्नत अवस्थेत कार्यरत असते.
११. कामदेवाची उपासना
तो नृत्यांगना आणि गायिका यांचाही उपास्यदेव असून त्या त्याच्या प्रीत्यर्थ पूजन करतात, तसेच यक्ष, गंधर्व, किन्नर अन् अप्सराही कामदेव आणि रतिदेवी यांची उपासना करतात.
१२. कामदेवाचा मदनोत्सव
वसंतऋतूमध्ये, विशेषतः वसंतपंचमी आणि होळी या कालावधीत कामदेवाच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक उत्सव साजरा केला जातो. त्याला प्राचीन काळात ‘मदनोत्सव’, असे म्हटले जात असे. कामदेव आणि रतिदेवी या त्या उत्सवाच्या प्रमुख देवता आहेत. हा उत्सव वििवध रंगांची फुले, रंग आणि रंगीत पाणी यांची एकमेकांवर उधळण करून साजरा केला जातो. ‘होळी ते रंगपंचमी’ या काळात विशेषतः उत्तर भारतात ‘रंगोत्सव’ किंवा ‘मदनोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करतात.

१३. काळानुसार कामभावनेत झालेले परिवर्तन
सत्य, त्रेता आणि द्वापर या तीन युगांमध्ये कामवासना ही ‘धर्म, अर्थ, काम अन् मोक्ष’, या चार पुरुषार्थांच्या चौकटीत बद्ध होती. त्यामुळे ती सौम्य आणि नियंत्रित स्वरूपात होती. कलियुगामध्ये आता धर्माला ग्लानी आल्यामुळे कामवासनेने धर्माच्या पुरुषार्थाच्या चौकटी ओलांडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र ‘कामोन्माद’ निर्माण होऊन कामवासना अनिर्बंध झाली आहे. परिणामी कामाच्या सुंदर आणि सात्त्विक भावनेचे रूपांतर बीभत्स अन् तामसिक रूपात झाले आहे. त्यामुळे कलियुगातील मनुष्य वासनांध होऊन त्याचे अधःपतन होऊन तो रसातळाला जात आहे.
१४. सारांश
कामवासना हा षड्रिपूंपैकी एक महत्त्वाचा रिपु, म्हणजे शत्रू असला, तरी त्याचे नियंत्रित स्वरूप हे सृजन निर्माण करते. त्यामुळे हिंदु धर्मशास्त्रात कामवासनेच्या नियंत्रित उपभोगाला ‘विवाह संस्कारा’च्या स्वरूपात मान्यता दिलेली आहे, तसेच हिंदु धर्मशास्त्रात कामभावनेला आसुरी स्वरूपात न दाखवता ‘कामदेव आणि रतिदेवी’ यांच्या सुंदर अन् सात्त्विक स्वरूपात सादर केले आहे.
कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मला कामदेवाविषयी वरील ज्ञान मिळाले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करते.’
(समाप्त)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २३.२.२०२६, वेळ : दुपारी १ ते१.३०)
|
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?