३.३.२०२६ या दिवशी ‘धूलिवंदन आणि मदनोत्सव’ आहे. त्या निमित्ताने…
‘कामदेव’ हा प्राणीमात्रांच्या उत्पत्तीच्या संबंधातील प्रमुख देव आहे. तो ‘प्रेम, इच्छा आणि सौंदर्य’, यांचा देव आहे.
भाग १

१. कामदेवाची उत्पत्ती
पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव सृष्टीचा विस्तार करत असतांना त्याच्या सारातून, म्हणजे ब्रह्मतत्त्वातून ‘कामदेव’ प्रगट झाला. ब्रह्माने कामदेवाला सृष्टीचे दायित्व सोपवले आणि त्याला ‘कोकिळ पक्ष्याचे गाणे, चंद्रप्रकाश, पावसाळा, विशिष्ट मास, वसंतऋतू अन् मनुष्याच्या शरिराचे विविध भाग’, यांसह बारा निवासस्थाने दिली.
२. परिवार
‘दक्ष प्रजापतीच्या पुत्री रतिदेवी (सौंदर्याची देवी), प्रीती (प्रेमाची देवी), शक्ति आणि मदशक्ति’, या त्याच्या चार धर्मपत्नी आहेत. त्याच्या मुलांची नावे ‘हर्ष’ आणि ‘यश’ ही आहेत.
३. वाहन
त्याचे वाहन पोपट आहे. पोपट भारतीय परंपरेत प्रेम आणि एकता यांचा संदेशवाहक मानला जातो.
४. कामदेवाच्या मूर्तीचे वर्णन
देवशिल्पी विश्वकर्म्याने श्री कामदेवाची अत्यंत रूपवान आणि अप्रतिम अष्टभूजा मूर्ती बनवली आहे. कामदेवाच्या ४ हातांत शंख, कमळ, धनुष्य आणि बाण हे आहेत. त्याचे नेत्र मदघूर्णित (मदधुंद) आहेत. त्याच्या जवळ सुंदर आणि कांतीमान असलेल्या रति, प्रीती, शक्ति अन् मदशक्ति या त्याच्या ४ धर्मपत्नी असतात. कामदेवाचे ४ हात त्यांच्या जवळ असतात. कामदेवाच्या ध्वजावर मोठ्या मकराचे, म्हणजे मगरीचे चित्र असते.
५. कामदेवाची विविध नावे आणि त्यांचा अर्थ
कामदेवाला ‘मदन’, ‘मन्मथ’ आणि ‘अनंग (शरीर नसलेला)’, अशा नावांनी ओळखले जाते. तो केवळ वासनाच नाही, तर प्रेम आणि आकर्षण यांच्या दैवी शक्तींचेसुद्धा प्रतीक आहे.
५ अ. मदन : कामाचा प्रवेश झाला की, स्त्री आणि पुरुष यांच्या शरिरांत कामोन्मद उत्पन्न होतो.
५ आ. मन्मथ : कामाने जन्मतःच ब्रह्मदेवासह मरीचि आदी ऋषींच्या मनाचे मंथन केले; म्हणून तो ‘मन्मथ’ झाला.
५ इ. अनंगदेव : सत्ययुगात जेव्हा शिव कैलासापासून दूर हिमालय क्षेत्रात समाधीस्थ होता, तेव्हा तेथे प्रतिदिन हिमवान राजाची राजकन्या ‘पार्वती’ ही शिवाची पूजा करण्यासाठी येत होती; परंतु शिवाने वैराग्य धारण केल्यामुळे त्याचे पार्वतीकडे लक्ष कधीच गेले नाही. केवळ शिवपुत्रच तारकासुराचा वध करणार असल्याचे ब्रह्मदेवाने इंद्रादी देवतांना सांगितले. तेव्हा शिवाची समाधी भंग करून त्याला पार्वतीप्रती कामोन्मुख करण्यासाठी इंद्राने कामदेव, रति आणि वसंत यांना शिवाजवळ पाठवले. तेव्हा वसंताने सर्वत्र सुवासिक फुलांनी बहरलेले वृक्ष आणि वेली यांची निर्मिती करून शिवाच्या तपःस्थळी वसंतऋतूचे उल्हसित वायूमंडल निर्माण केले. त्यानंतर कामदेवाने भगवान शिवावर कामबाण चालवल्यावर शिवाची समाधी भंग पावली. भगवान शिवाने त्याचा तिसरा नेत्र उघडला आणि त्यातून वैश्वानर अग्नीचा झोत कामदेवावर सोडून त्याचे शरीर भस्म केले. त्यानंतर कामदेव जरी भस्म झाला, तरी तो देहातीत ‘अनंगदेव’ बनून अदृश्य रूपात वास करत होता. त्यानंतर रतीने विलाप केला. तेव्हा शिवाला तिची दया येऊन त्याने तिला वर दिला, ‘तुझा पती अनंग (शरीररहित) स्वरूपात मानवाच्या मनात जिवंत होईल.’ तेव्हापासून काम हा ‘वृत्ती’ किंवा ‘भावना’ या स्वरूपात सर्वत्र सजीव झाला, तसेच शिवाने अनंगला द्वापरयुगात प्रद्युम्नच्या रूपात श्रीकृष्णाच्या पोटी जन्माला येण्याचा उःशाप दिला. त्याची कामशक्ती जगात प्रेमरस पसरवत रहाते. कामदेवाच्या दहनापूर्वी त्याची प्रगट शक्ती ५० टक्के होती. शिवाने कामदेवाचे दहन केल्यानंतर त्याची प्रगट शक्ती केवळ १० टक्के राहिली. त्यामुळे सृष्टीत वाढलेली कामभावना न्यून होऊन ती नियंत्रित झाली.
५ ई. प्रद्युम्न : सत्ययुगात शिवाच्या नेत्राग्नीने भस्म झालेल्या मदनाने पुढे द्वापरयुगात द्वारकेत ‘श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा पुत्र’ म्हणून जन्म घेतला आणि त्याला ‘प्रद्युम्न’ हे नाव मिळाले.
५ उ. मकरध्वज : कामदेवाच्या रथाच्या ध्वजावर ‘मकरा’चे, म्हणजे मगरीचे चित्र असते. त्यामुळे त्याला ‘मकरध्वज’, हे नाव प्राप्त झाले.
५ ऊ. मनसिज : काम हा प्रथम प्राण्यांच्या मनात उत्पन्न होतो; म्हणून कामदेवाला ‘मनसिज’, असे म्हटले जाते. मनुष्य कामवश झाला की, तो विवेकाला परका होतो आणि उन्मत्तही होतो. ‘कामातुराणां न भयं न लज्जा ।’, म्हणजे ‘कामातुराला भय किंवा लज्जा नसते’, असे सुभाषितच आहे. कामोन्मत्त होऊन स्त्रियांच्या पाठीमागे लागलेले देव, ऋषी आणि मानव यांच्या कितीतरी कथा पुराणांत आहेत.
५ ए. पुष्पधन्वा : हा शब्द ‘पुष्प’ आणि ‘धन्वा’, या दोन शब्दांनी बनलेला आहे. याचा अर्थ ‘ज्याने पुष्पाचे, म्हणजे फुलाचे धनुष्य धारण केले आहे, तो.’
५ ऐ. अन्य नावे : याव्यतिरिक्त ‘मार, मीनकेतन, कंदर्प, दर्पक, स्मर, रतिपति आणि आत्मभू’, अशीही कामदेवाची विविध नावे आहेत.
६. कामदेव आणि रति यांचे कार्य

कामदेवाच्या उत्पत्तीनंतर ब्रह्मदेवाने कामदेवाला धनुष्य आणि ५ बाण दिले. त्याच्याकडे उसापासून बनवलेले धनुष्य आणि फुलांचे ५ बाण आहेत. ‘स्त्री-पुरुषांच्या मनात परस्परांविषयी प्रेमाकर्षण उत्पन्न करणे’, हे कामदेवाचे प्रमुख कार्य आहे. कामदेव पंचबाणांचा उपयोग करून कामना जागृत करतो. कामदेवाच्या हातातील ‘ईक्षुदंड (उसाचे कांड)’, हे त्याचे धनुष्य असून या धनुष्याची दोरी भुंग्यांनी बनलेली आहे. रति आणि वसंत हे त्याचे साहाय्यक असून मलय पर्वताचा वारा हा त्याचा रथ आहे. अशा प्रकारे अंगहीन असूनही कामदेव त्रैलोक्यावर राज्य करतो.
कामदेवाकडील पाच बाण हृदयात वेगवेगळ्या मानवी भावना जागृत करतात. कामदेव या कामबाणांचा वापर करून विश्वातील यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, स्वर्गलोकातील देवता, पृथ्वीवरील मनुष्य इत्यादींमध्ये प्रेम जागृत करतो. कामदेव पुरुषांमध्ये आणि रतिदेवी स्त्रियांमध्ये प्रेम जागृत करते.’
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1015797.html
|
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !