कळंबस्ते परिसरात बिबट्याने भरवस्तीत शिरून केले २ शेळ्यांवर आक्रमण

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी – जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते परिसरात बिबट्याने मानवी वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांवर आक्रमण केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
४ मार्चला पहाटे कळंबस्ते येथील विरतवाडी परिसरात बिबट्याने शिरकाव केला. स्थानिक शेतकरी संतोष जुवळे यांच्या घराशेजारील बकर्‍यांच्या खुराड्यावर बिबट्याने आक्रमण केले, त्यात १ बकरी ठार झाली, तर दुसरी गंभीर घायाळ झाली आहे.

१. बकर्‍यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने संतोष जुवळे यांना जाग आली आणि त्यांनी तातडीने खुराड्याकडे धाव घेतली. माणसाची चाहूल लागताच बिबट्या अंधाराचा लाभ घेऊन पसार झाला.

२. कळंबस्ते परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. अवघ्या ४ दिवसांपूर्वीच कळंबस्ते-अंजवली फाटा येथे बिबट्याने एका पाडीची (वासराची) शिकार केली होती. आता थेट घराशेजारी येऊन बिबट्या आक्रमण करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

३. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे गार्ड सुरेश तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

४. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतीची कामे करणे किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावावा, अशी आग्रही मागणी कळंबस्ते विरतवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.