कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

कीर्तनरंग महोत्सवाला शेकडोंची उपस्थिती

ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

रत्नागिरी –  महाराष्ट्राच्या संत मांदियाळीने सांस्कृतिक आणि आध्यात्मिक श्रीमंतीचे वैभव जगासमोर मांडले आहे. ही आपली देवभूमी आहे. येथे उत्सवप्रिय मंडळी आहेत. पुराणांमध्ये सात्त्विकता, भावप्रधानता आहे. त्यामुळे देवभूमीत जन्माला येणार्‍यांच्या रक्तात ते संस्कार पहायला मिळतात. सध्या कीर्तन हे मनाला उपदेश (मनाचे कौन्सिलिंग) करणारे आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. सौ. रोहिणी माने-परांजपे यांनी केले.

अधिक मासानिमित्त जयेश मंगल कार्यालयात कीर्तनरंग महोत्सव

अधिक मासानिमित्त जयेश मंगल कार्यालयात कीर्तनरंग महोत्सवात पहिल्या दिवशी त्या बोलत होत्या. या कीर्तनाला शेकडों कीर्तनप्रेमींनी गर्दी केली. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, वात्सल्य- स्नेह यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जयेश मंगल पार्क आणि खल्वायन यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ह.भ.प. रोहिणी परांजपे यांनी दीपप्रज्वलनाने केले. या वेळी जयेश मंगल पार्कच्या संचालिका सौ. कल्याणी मलुष्टे, चित्पावन मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, पावस येथील राममंदिराचे आबा चिपळूणकर, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, अविनाश काळे उपस्थित होते. चित्पावन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी निवेदन केले. कीर्तनात ऑर्गनची साथ कौस्तुभ परांजपे आणि तबलासाथ अमेय हर्डीकर यांनी केली. ५ जूनलाही सलग तिसर्‍या दिवशी हे कीर्तन येथील ‘जयेश मंगल कार्यालया’त रंगणार आहे.

 

‘सध्या स्वतःच्या आत बघायला कुणी तयार नाही. सर्व जण भ्रमणभाषवर (मोबाईलवर) इतरांचे स्टेटस पहाण्यात वेळ घालवतात; पण स्वतःचे स्टेटस पहात नाहीत. माणसं आरशात पहायला तयार नाहीत, ‘मोबाईल’मध्ये फिल्टर वापरतात. आम्ही कसे नाही, हे दाखवण्यात शक्ती वाया जात आहे; पण संतांनी सांगितले जसे आहात तसे दाखवा, असे ह.भ.प. रोहिणीताईंनी या वेळी सांगितले.

रत्नागिरीत १४ जूनला ‘कॉर्पोरेट जिहाद आणि नक्की सत्य काय?’ या विषयावर विशेष संवाद

कीर्तनातूनही केले जाहीर आवाहन

रत्नागिरी – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, १४ जून २०२६ रत्नागिरीत एका विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॉर्पोरेट जिहाद आणि नक्की सत्य काय?’ हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय असेल. हा कार्यक्रम माळनाका, थिबा पॅलेस रोड येथील ‘जयेश मंगल पार्क’ येथे दुपारी ४ ते सायंकाळी ६:३० या वेळेत पार पडेल. या कार्यक्रमात मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करून संवाद साधणार आहेत.

‘लव्ह जिहाद’विषयी संवाद कार्यक्रमाला उपस्थित रहा ! – ह.भ.प. सौ. रोहिणी माने-परांजपे

हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी ह.भ.प. सौ. रोहिणी माने-परांजपे यांची सदिच्छा भेट

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येथे ३ जून या दिवशी येथे चालू असलेल्या कीर्तनाच्या मध्यंतरात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौ. रोहिणी माने-परांजपे यांनी उपस्थित श्रोत्यांना ‘लव्ह जिहाद’विषयीचे व्याख्यान आणि संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी ह.भ.प. सौ. रोहिणी माने-परांजपे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. १४ जून या दिवशी होणार्‍या विशेष संवाद व्याख्यानाची माहिती या वेळी ह.भ.प. सौ. रोहिणी माने-परांजपे यांना देण्यात आली. या वेळी सौ. शुभांगी मुळ्ये, श्री. हनुमंत करंबेळकर आणि श्री. गोविंद भारद्वाज उपस्थित होते.