महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे वेतन रोखा ! – आयुक्त आधुनिक वैद्य सुनील भोकरे

 ‘स्पर्श’ या संगणकीय प्रणालीवर तांत्रिक समस्या

ए आय निर्मित चित्र

पुणे – ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना गेल्या ३ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तांत्रिक प्रणालीवर कर्मचार्‍यांची माहिती वेळेत न भरल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ‘शहरी आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागा’चे आयुक्त आधुनिक वैद्य सुनील भोकरे यांनी ‘प्रलंबित वेतन तातडीने द्यावे, कर्मचार्‍यांना वेतन मिळेपर्यंत आरोग्य विभागातील अधिकार्‍यांच्या मे महिन्याच्या वेतनाला मान्यता देऊ नये’, असा आदेशही त्यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालकांना दिला आहे.

राज्यात एकूण ४२ सहस्र कंत्राटी कर्मचारी आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये २ सहस्र ७६५ कर्मचारी असून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांची १ सहस्र ४३० एवढी संख्या आहे. त्यातील १ सहस्र ३६५ कर्मचार्‍यांचे वेतन प्रलंबित आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना ३ महिन्यांचे वेतन मिळाले नाही.

कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ‘स्पर्श’ ही संगणकीय प्रणाली विकसित केली. या प्रणालीत नोंद झाल्यानंतरच कर्मचार्‍यांना वेतन दिले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या प्रणालीवर तांत्रिक समस्या येत असल्याने नोंदी करण्यास अडचणी येत आहेत. मार्चपासून नोंद वेळेत होत नसल्यामुळे वेतन थकले असल्याचे समजते.