(म्हणे) ‘जागतिक मुसलमान ऐक्याचा हा क्षण !’ – Mirwaiz Umar Farooq

काश्मीरचे मुख्य धर्मगुरु आणि ‘हुरियत कॉन्फरन्स’ या फुटीरतावादी संघटनेचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारूक यांचे सूचक विधान

मिरवाईज उमर फारूक

श्रीनगर (काश्मीर) – काश्मीरचे मुख्य धर्मगुरु आणि ‘हुरियत कॉन्फरन्स’ या फुटीरतावादी संघटनेचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारूक यांनी इराणचे सर्वाेच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, खामेनी यांच्या निर्घृण हत्येने मुसलमान जगाला हादरवून टाकले आहे. जम्मू-काश्मीरमधील लोक एकत्रितपणे या क्रूरतेचा आणि इराणविरुद्ध चालू असलेल्या आक्रमकतेचा निषेध करतात. ‘उम्मा’ने (जागतिक मुसलमान समाजाने) मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकत्र यावे. या हत्येचा आणि मध्यपूर्वेत चालू असलेल्या आक्रमकतेचा निषेध करावा. आपले ऐक्य नोंदवण्याचा हा क्षण आहे.

इराणमधील मुसलमान जगताचा सर्वाेच्च आवाज ! – मेहबूबा मुफ्ती

जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री मेहबुबा मुफ्‍ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवर चालू असलेल्या आक्रमणांचा निषेध केला आहे. त्यांनी या आक्रमणांना ‘आक्रमक कृत्य’ संबोधले असून इराणचे ‘मुसलमान जगताचा एक सर्वाेच्च आवाज’ म्हणून वर्णन केले. त्या म्हणाल्या की, कोणतेही क्षेपणास्त्र इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करू शकत नाही. मी खामेनी यांच्या दैवी संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी प्रार्थना करते.

काश्मीरमध्ये शिया मुसलमानांकडून आंदोलने !

खामेनी यांच्या मृत्यूवरून काश्मीरमधील शिया समुदायाने रस्त्यावर उतरून निषेध नोंदवणास आरंभ केला आहे. सोनावरी, बारामुल्ला, बंदीपोरा आदी भागांत शिया समुदायातील पुरुष अन् महिला यांनी खामेनी यांचे छायाचित्र हातात धरून इराणला समर्थन व्यक्त करणार्‍या घोषणा दिल्या. विविध मुसलमान संघटना आणि शियांचे धर्मगुरु यांनी या हत्येचा निषेध केला आहे.

संपादकीय भूमिका

अशा वक्तव्यांमुळे उद्या काश्मीर, तसेच भारतात इतरत्र धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या, तर आश्चर्य वाटू नये !