श्रीराममंदिरामुळे देशाच्या विकासाला गती !

राष्ट्रहितार्थ

उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेत वार्षिक ४ लाख कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता !

पर्यटकांची संख्या वर्ष २०२४-२५ मध्ये १६ ते २० कोटींहून अधिक झाली !

जवळपास २ वर्षांपूर्वी अयोध्येत श्रीरामलल्लाची (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा झाली. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून काही लेखांच्या माध्यमातून ‘मंदिरांवर आधारित हिंदूंची अद्भुत अर्थव्यवस्था’, हा विषय हाताळला होता. हिंदूंची मंदिरे पूर्वापार धार्मिकसह अर्थव्यवस्थेला गती देणारे केंद्र होते. गावे, नगरे, शहरे आणि जिल्हा यांचा विकास मंदिरकेंद्रित होता. अयोध्येत श्रीराममंदिराच्या निर्मितीमुळे जे काही पालट गेल्या

२ वर्षांत झाले आहेत, त्यातून हे पुन्हा सिद्ध झाले आहे की, मंदिरांमुळे केवळ एक श्रद्धेचे केंद्र उभे रहात नाही, तर सहस्रो ते लाखो लोकांचे उदरभरण होण्यासाठी ते माध्यम बनते. अयोध्या आणि उत्तरप्रदेश येथे झालेले पालट आपण या लेखातून जाणून घेऊया. यातून ‘मंदिरावर आधारित संस्कृतीचा विकास’, हा विषय किती महत्त्वाचा आहे, हेसुद्धा लक्षात येते.

श्रीरामलल्ला

१. ‘आय.आय.एम्. लखनऊ’चा अहवाल

‘आय.आय.एम्. लखनऊ’च्या (‘भारतीय व्यवस्थापन संस्थे’च्या) अहवालानुसार श्रीराममंदिराच्या लोकार्पणानंतर देशभरात १ लाख कोटींहून अधिक रुपयांची व्यावसायिक उलाढाल झाली. या अहवालानुसार पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसूल यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ‘पर्यटन आधारित उपक्रमांमधून मिळणारा कर महसूल २० ते २५ सहस्र कोटी रुपयांपर्यंत पोचू शकतो’, असे अनुमान आहे. पुढील ४ ते ५ वर्षांत पर्यटन, वाहतूक आणि आदरातिथ्य क्षेत्रात अनुमाने १ लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत मंदिरांचा वाटा अनुमाने ३ लाख कोटी ते ६ लाख कोटी रुपयांमध्ये आहे, जो देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या २.३ ते ३ टक्के आहे. श्रीराममंदिर या मंदिर अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधारस्तंभ बनले आहे.

श्री. यज्ञेश सावंत

२. श्रीराममंदिर न्यासाकडून कराद्वारे महसूल

५ फेब्रुवारी २०२० ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने सरकारला अनुमाने ४०० कोटी रुपये कर म्हणून दिले आहेत. यामध्ये २७० कोटी रुपये ‘जी.एस्.टी.’ (वस्तू आणि सेवा कर) आणि १३० कोटी रुपये इतर कर यांचा समावेश आहे.

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार श्रीराममंदिराच्या संपूर्ण संकुलाच्या बांधकामासाठी अनुमाने १ सहस्र ९०० ते २ सहस्र १५० कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे. भाविकांनी ३ सहस्र कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे.

३. व्यापारातील मोठी उलाढाल

श्रीराममंदिर खुले झाल्यानंतर अयोध्येत स्थानिक व्यापारात प्रचंड वाढ झाली आहे. विविध अहवालांनुसार (उदा. एस्.बी.आय. रिसर्च) अयोध्येतील पर्यटन आणि संबंधित सेवांमुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेत वार्षिक ४ लाख कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतरच्या पहिल्या ६ मासांतच अयोध्येला २३ कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली. वर्षअखेरपर्यंत हा आकडा ५० कोटींच्या पुढे जाण्याचे अनुमान आहे. मंदिराच्या आसपास असलेल्या छोट्या दुकानदारांचे उत्पन्न ४ ते ५ पटींनी वाढले आहे, म्हणजे त्यांचे प्रतिदिनचे उत्पन्न २ सहस्र ५०० ते ३ सहस्र रुपयांपर्यंत पोचले. अयोध्या प्रभागामधील ‘जी.एस्.टी.’ संकलन वर्ष २०२१-२२ मध्ये अनुमाने ९९० कोटी होते, जे वर्ष २०२३-२४ मध्ये वाढून १ सहस्र ७९८ कोटी रुपयांवर पोचले आहे. केवळ अयोध्याच नव्हे, तर वाराणसी आणि मथुरा यांसारख्या तीर्थक्षेत्रांमुळे उत्तरप्रदेश सरकारला पर्यटनातून मिळणारा महसूल प्रतिवर्षी अनुमाने २० सहस्र ते २५ सहस्र कोटी रुपयांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

४. वाढती भाविक/पर्यटक यांची संख्या

पूर्वीची भाविक/पर्यटक संख्या वर्ष २०१७ मध्ये अयोध्येला केवळ २ लाख भाविक/पर्यटक यांनी भेट दिली होती. वर्ष २०२३ मध्ये ही संख्या ५ कोटी ७५ लाख होती, जी वर्ष २०२४-२५ मध्ये १६ ते २० कोटींहून अधिक झाली आहे.

५. उत्तरप्रदेशाला झालेले लाभ

पर्यटन क्षेत्रात अनुमाने २ लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. हॉटेल, गाईड्स (पर्यटन मार्गदर्शक), टॅक्सीचालक आणि हस्तकला कारागीर यांना याचा मोठा लाभ झाला आहे. अयोध्येत महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ, अत्याधुनिक रेल्वेस्थानक आणि चौपदरी रस्ते यांचे जाळे निर्माण झाले आहे. शहरात ७५ हून अधिक नवीन हॉटेल्सचे प्रकल्प चालू आहेत.

अयोध्या आता जगाच्या नकाशावर एक ‘ग्लोबल स्पिरिच्युअल हब’ (जागतिक आध्यात्मिक केंद्र) म्हणून उदयास आली आहे. उत्तरप्रदेशला १ ट्रिलियन डॉलर्सची (एकावर १२ शून्य) अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. अयोध्येचा कायापालट करण्यासाठी सरकारने ‘अयोध्या मास्टर प्लॅन २०३१’च्या अंतर्गत अनुमाने ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प राबवले आहेत. ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट’ आणि ‘अयोध्या धाम रेल्वे स्टेशन’ यांमुळे देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढला. रामपथ, भक्तीपथ आणि जन्मभूमी पथ यांसारख्या भव्य रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे शहरांतर्गत वाहतूक सुलभ झाली. या रस्त्यांच्या बाजूला सौरऊर्जेवर चालणारे दिवे आणि आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

६. पंचतारांकित हॉटेल्स आणि आदरातिथ्य व्यवसाय

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे अयोध्येत रहाण्याची सोय करण्याच्या व्यवसायात क्रांती झाली आहे. ‘ताज’, ‘रेडिसन’ आणि ‘मॅरियट’ यांसारख्या मोठ्या हॉटेल आस्थापनांनी अयोध्येत स्वतःचे प्रकल्प चालू केले आहेत. यामुळे उच्चभ्रू पर्यटकांची सोय झाली. उत्तरप्रदेश सरकारने स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरांचे रूपांतर ‘होमस्टे’मध्ये (स्थानिक कुटुंबाकडे निवासाची सोय) करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज अयोध्येत ६०० हून अधिक नोंदणीकृत ‘होमस्टे’ आहेत. यामुळे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळाले. जुन्या धर्मशाळांचे नूतनीकरण करून तिथेही सोयीसुविधा वाढवण्यात आल्या आहेत.

७. सहस्रो नोकर्‍यांची निर्मिती

मंदिर ट्रस्ट, हॉटेल्स आणि विमानतळावर सहस्रो तरुणांना सुरक्षा रक्षक, ‘हाऊसकीपिंग’, रिसेप्शनिस्ट आणि व्यवस्थापन क्षेत्र यांमध्ये नोकर्‍या मिळाल्या. टॅक्सी आणि ‘ई-रिक्शा’ यांमुळे स्थानिक तरुणांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली आहे. अधिकृत ‘गाईड्स’ची मागणी वाढल्याने सहस्रो तरुणांना प्रशिक्षण देऊन या क्षेत्रात सामावून घेण्यात आले. फुलांचे हार, ‘रामनामा’चे उपरणे, लाडूचा प्रसाद आणि लाकडी हस्तकलेच्या वस्तू विक्री करणारे छोटे व्यापारी यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अयोध्येच्या ‘वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट’ (एक जिल्हा एक उत्पादन) योजनेच्या अंतर्गत गुळाचे पदार्थ आणि लाकडी हस्तकलेच्या वस्तूंना जागतिक मागणी आहे. ‘ई-कॉमर्स’च्या माध्यमातून या वस्तू विकण्याचे मोठे दालन खुले झाले आहे.

७ अ. स्थानिकांचे उत्पन्न वाढले ! : या आर्थिक उलाढालीचा सर्वांत मोठा परिणाम स्थानिक लोकांच्या जीवनमानावर झाला आहे. अयोध्येतील एका सामान्य दुकानदाराचे किंवा रिक्शाचालकाचे उत्पन्न जे पूर्वी दिवसाला ३००-४०० रुपये होते, ते आता सरासरी २ ते २ सहस्र ५०० रुपयांपर्यंत पोचले आहे. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक तरुणांमध्ये इंग्रजी बोलण्याचे कौशल्य आणि ‘डिजिटल पेमेंट’ वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.

ज्या स्थानिकांच्या भूमी रस्त्यालगत होत्या, त्यांच्या भूमीच्या किमतीत ५०० ते १००० टक्के वाढ झाली. अनेकांनी स्वत:ची जुनी घरे, हॉटेल किंवा दुकाने यांसाठी भाड्याने देऊन कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

७ आ. महिला सक्षमीकरण : अनेक महिला बचत गट आता प्रसाद बनवणे, हस्तकला आणि ‘होमस्टे’ व्यवस्थापनात सक्रीय झाल्या आहेत, ज्यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारली आहे.

मंदिर उभारण्याला विरोध करणार्‍या बुद्धीजीवींना चपराक !

८. अयोध्येतील धार्मिक स्थळांना जोडणे

अयोध्येचा विकास हा केवळ एका शहराचा विकास नसून तो उत्तरप्रदेशच्या ‘स्पिरिच्युअल टुरिझम’ (आध्यात्मिक पर्यटन) मॉडेलचा आधारस्तंभ आहे. सरकारने अयोध्येला केंद्रस्थानी ठेवून आजूबाजूच्या धार्मिक स्थळांना एका सूत्रात गुंफले आहे.

८ अ. धार्मिक पर्यटन सर्कीट : अयोध्येला भेट देणारा पर्यटक केवळ श्रीराममंदिरापर्यंत मर्यादित राहू नये, तर त्याने आसपासचा संपूर्ण परिसर अनुभवावा, यासाठी ‘रामायण सर्कीट’ विकसित करण्यात आले आहे.

८ आ. चौदा कोसी आणि पंच कोसी परिक्रमा पथ : भाविकांच्या सोयीसाठी हे परिक्रमा मार्ग आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज केले जात आहेत. यामुळे स्थानिक गावांमधील अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.

८ इ. शरयू रिव्हर फ्रंट : ‘साबरमती रिव्हर फ्रंट’च्या धर्तीवर शरयू नदीचा किनारा विकसित केला जात आहे. इथे चालवल्या जाणार्‍या ‘जटायू क्रूझ’ आणि ‘सोलर बोट्स’ पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.

अयोध्या आता वाराणसी (काशीविश्वनाथ) आणि प्रयागराज (त्रिवेणी संगम) यांच्याशी ‘टुरिस्ट ट्रँगल’ म्हणून जोडली गेली आहे. यामुळे एकाच यात्रेमध्ये पर्यटक तिन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकतात.

९. गुंतवणुकीच्या प्रमुख संधी

अयोध्येत सध्या मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणुकीला वाव आहे. उत्तरप्रदेश सरकारने येथे गुंतवणूक सुलभ करण्यासाठी अनेक सवलती घोषित केल्या आहेत.

अ. हॉटेल्स : केवळ पंचतारांकित हॉटेल्सच नाही, तर ‘बजेट हॉटेल्स’ (स्वस्त दरातील हॉटेल्स) आणि ‘गेस्ट हाऊस’ (अतिथीगृह) यांची अजूनही मोठी कमतरता आहे.

आ. वाहतूक व्यवस्था : विमानतळ आणि रेल्वे टिर्मनलच्या विस्तारामुळे मालाची आणि पर्यटकांची वाहतूक यांसाठी खासगी टॅक्सी सेवा, ई-बस आणि ट्रॅव्हल एजन्सी यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.

इ. आरोग्य सेवेची संधी : कोट्यवधी पर्यटकांच्या आगमनामुळे तिथे जागतिक दर्जाची रुग्णालये, ‘डायग्नोस्टिक सेंटर्स’ (रोगनिदान केंद्र) आणि ‘वेलनेस सेंटर्स’ (आरोग्य केंद्र) यांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

उत्तरप्रदेश सरकारने अयोध्येत गुंतवणूक करणार्‍यांसाठी विशेष धोरणे आखली आहेत. व्यवसायासाठी लागणारे परवाने जलद गतीने मिळण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हॉटेल व्यवसायासाठी भूमीच्या खरेदीवर आणि बांधकामावर विशेष ‘सबसिडी’ (अनुदान) दिली जात आहे.

१०. गुंतवणुकीचा दूरगामी लाभ

तज्ञांच्या मते अयोध्येत आज केलेली १ रुपयाची गुंतवणूक येत्या ५ वर्षांत १० ते १५ पटीने वाढण्याची शक्यता आहे; कारण अयोध्या आता केवळ भारतीय भाविकांचेच नाही, तर थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांतील पर्यटकांचेही केंद्र बनत आहे.

मंदिरांमुळे एकूणच काय पालट होतो ? ‘मंदिरांपेक्षा रुग्णालये बांधा, उद्योग उभारा, मंदिरांपेक्षा प्रसाधनगृहे बांधा’, इत्यादी भाषणे दिली जातात. ‘मंदिरांमुळे रोजगार मिळणार आहे का ?’, अशी विधाने केली जातात. अशी विधाने करणार्‍यांना मंदिरामुळे काय होऊ शकते ?, याचा धडाच अयोध्येतील श्रीराममंदिराने घालून दिला आहे. अयोध्येच्या या उदाहरणामुळे देशभरात मंदिर आधारित अर्थव्यवस्था उभारण्याचा विचार केला जात आहे.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (२५.२.२०२६)