पाकिस्तान्यांच्या धमक्यांमुळे लंडन येथील ‘रंगरेज’ हे सुप्रसिद्ध भारतीय उपाहारगृह बंद होणार !

खलिस्तानी चळवळीला जाहीर विरोध केल्यामुळे उपाहारगृह आणि त्याचे मालक हरमन सिंह कपूर यांच्यावर पूर्वी झाले होते आक्रमण

हरमन सिंह कपूर

लंडन (ब्रिटन) – शहरातील हॅमरस्मिथ येथे मागील १६ वर्षांपासून स्वतःची ओळख निर्माण केलेले प्रसिद्ध भारतीय उपाहारगृह ‘रंगरेज’ पाकिस्तानी नागरिकांच्या धमक्यांमुळे आणि पोलिसांकडून पुरेसे संरक्षण मिळत नसल्याने पुढील महिन्यात कायमचे बंद होणार आहे. उपाहारगृहाचे मालक हरमन सिंह कपूर यांनी ही घोषणा केली आहे.

१. कपूर यांनी ‘एक्स’वर याविषयी माहिती देतांना म्हटले की, येथील पाकिस्तानी नागरिकांकडून उपाहारगृहात वारंवार करण्यात येत असलेला गोंधळ आणि ऑनलाईन धमक्या, तसेच वाढता खर्च अन् पोलिसांकडून पुरेसे साहाय्य मिळत नसल्याने उपाहारगृह बंद करण्याचा निर्णय घेतला.

२. कपूर यांच्या रेस्टॉरंटवर पाकिस्तानी कट्टरतावाद्यांनी आक्रमण केले होते आणि त्यांच्यावर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा दबाव आणण्यात आला.

३. कपूर यांचा आरोप आहे की, लंडन पोलिसांना सीसीटीव्ही चित्रफीत आणि पुरावे देऊनही त्यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली नाही.

४. रेस्टॉरंट बंद होण्याची बातमी समोर येताच सामाजिक माध्यमांवर अनेकांनी खंत व्यक्त केली. एकाने लिहिले की, ‘रंगरेज’चे जेवण अप्रतिम होते. १६ वर्षे जुना व्यवसाय बंद होणे म्हणजे लंडनमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीविषयी गंभीर प्रश्‍न निर्माण करणारी घटना आहे.

कपूर यांचा खलिस्तानवादाच्या विरोधात निर्धार !

कपूर यांनी ‘एक्स’वर लिहिले की, आता ते त्यांचा संपूर्ण वेळ कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईसाठी देणार आहेत. ते म्हणाले, ‘तुम्ही माझा व्यवसाय थांबवू शकता, पण माझा निर्धार नष्ट करू शकत नाही. आता मी कोणत्याही अडथळ्यांखेरीज अधिक ठामपणे तुमच्याविरुद्ध लढीन. (असे हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती होत ! किती हिंदू हिंदूबहुल भारतात राहूनही अशा प्रकारे धर्मरक्षणार्थ निर्धार करतात ? – संपादक)

वर्ष २०२३ पासून कपूर खलिस्तानवाद्यांच्या समोर हात थोपटून उभे राहिले !

कपूर यांनी यापूर्वी खलिस्तान चळवळीवर टीका करणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला होता. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्या मिळाल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. वर्ष २०२३ मध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड झाल्यानंतर काही दिवसांनी खलिस्तान समर्थकांनी कपूर यांच्या उपाहारगृहावर आक्रमण केले होते. तसेच खलिस्तान चळवळीवर टीका करणारा त्यांचा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी खलिस्तान्यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलांना जिवे मारण्याच्या धमक्या, अपमानास्पद दूरभाष आणि ऑनलाईन धमक्या दिल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • खलिस्तानवादी चळवळीमागे पाकिस्तानीच असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते, हे लक्षात घ्या ! ही घटना लंडनचे झपाट्याने होत असलेले इस्लामीकरण दर्शवते, हेसुद्धा विसरून चालणार नाही !
  • सातासमुद्रापलीकडे स्वकर्तृत्वाने व्यवसायात यश संपादन करणारे अनेक भारतीय व्यावसायिक आहेत, परंतु हरमन सिंह कपूर यांच्यासारखे देशप्रेमी विरळाच आढळतात. त्यांच्यावर देशप्रेमामुळे व्यवसाय बंद करण्याची पाळी येते, हे भारतासाठी लज्जास्पद !