राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान ! – पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला (दादाजी), श्री परशुराम तपोवन आश्रम, मेढे गाव, वसई

सकल ब्रह्मांड परमात्म्याची एक अद्वितीय कृती आहे. या राष्ट्राच्या विकासासाठी विज्ञानासमवेत अध्यात्म आणि वेद आहेत. सनातन संस्कृतीच्या वैदिक तत्त्वांच्या साधनेद्वारे भारतवर्ष महान बनू शकतो. केवळ भौतिकतेने राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. सनातन वैदिक धर्माचे सदाचारी आचरण आणि चारित्र्यनिर्मिती अत्यावश्यक आहे. व्यक्तीने प्रामाणिक आत्मनिष्ठा आणि सामाजिक सेवाभाव जोपासला, तर त्यातून सशक्त अन् महान राष्ट्राची निर्मिती होऊ शकते. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी समाजसुधारणाही अत्यावश्यक आहे. ‘सनातन प्रभात’ या कार्यात योगदान देत आहे. भारत हे राष्ट्र धर्मप्रधान आहे. राष्ट्रीय चेतना जागृत राहो !
‘सनातन प्रभात’ विश्वासार्ह वाटते ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, मुंबई उच्च न्यायालय

सध्या माध्यमांची विश्वासार्हता न्यून होत आहे. अशा वातावरणात ‘सनातन प्रभात’ इतक्या चांगल्या प्रकारे विविध प्रकारची वृत्ते प्रसिद्ध करते, तसेच धर्मशास्त्रही सांगते. त्यामुळे ‘सनातन प्रभात’ विश्वासार्ह वाटते. अशा दैनिकाने उत्तरोत्तर प्रगती करावी, ही शुभेच्छा !
वर्षभर सुटी न घेता चालवणारे जाणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ आणि अभिनेता

दैनिक ‘सनातन प्रभात’ वर्षातील एकही दिवस सुटी न घेता सेवाभावी वृत्तीने ३६५ दिवस चालवले जाते. ‘मराठी भाषेचा पुरस्कार’ करणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे. ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनासाठी माझ्या शुभेच्छा !
‘व्रतस्थ धर्मरक्षक’ असणारे ‘सनातन प्रभात’ गेली २६ वर्षे कार्यरत असणे अभिमानास्पद ! – दुर्गेश जयवंत परुळकर, लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शीर्षस्थानी ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हे दोन शब्द दोन धर्मध्वजांमध्ये झळकत आहेत. नित्य प्रसिद्ध होणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्याची दिशा आणि हेतू नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट करतात. ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ याच नात्याने मागील २६ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’ अथकपणे धर्म, संस्कृती आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कार्य करत आहे. हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
देशबांधवांमधील विवेक जागृत करून राष्ट्रनिष्ठेचे संस्कार करतांना त्यांची ज्ञानवृद्धी व्हावी, त्यांना सामाजिक आणि धार्मिक कर्तव्याची जाणीव व्हावी; म्हणून दैनिक प्रयत्नशील आहे. हे बातम्या देणारे दैनिक नाही, तर बातम्यांचे विश्लेषण करून देशातील घडामोडींमागील वेध घेण्याचे शिक्षण देणारे आहे; म्हणून दैनिकाचा गौरव करणे उचित ठरेल. अनेक नामवंत, सेनाधिकारी, अधिवक्ते, अभ्यासक, विचारवंत यांचे लेख सनातन प्रभातमधून प्रसिद्ध होतात. त्यामुळे वाचकांना राजकीय दृष्टी प्राप्त होण्यास हातभार लागतो. आध्यात्मिकदृष्ट्या मार्गदर्शन करणारे लेखही दैनिकातून प्रसिद्ध होतात.
अखंड सावध राहून धर्मबांधवांना सावध रहाण्यासाठी प्रवृत्त करणारे हे एकमेव दैनिक आहे. दैनिकाचे लक्ष वेधून घेणारे वैशिष्ट्य म्हणजे देशातील विविध भाषांमध्ये हे नियतकालिक प्रकाशित होते. व्रतस्थ धर्मरक्षक दैनिकाला पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !
सकारात्मकता आणि कर्तव्यबुद्धी वाढवून आनंदप्राप्तीकडे नेण्याचे कार्य करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि.

आजच्या काळात बहुतांश वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी माध्यमे विविध उद्योगसमूहांच्या प्रभावाखाली चालवली जातात. त्यामुळे त्यांच्या बातम्यांमध्ये स्वार्थी विचारसरणीचा प्रभाव दिसतो; पण दैनिक ‘सनातन प्रभात’ हे संत-सद्गुरूंच्या आध्यात्मिक मार्गदर्शनातून, तसेच साधकांच्या निःस्वार्थ सेवेच्या बळावर, तोटा सहन करून चालवले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण दैनिक आहे. राजकीय किंवा व्यावसायिक बंधनात न अडकता ते हिंदुत्वनिष्ठ विचार निर्भीडपणे मांडते. अन्य माध्यमांत अपघात, गुन्हे या घटना अतिरंजित स्वरूपात मांडल्या जातात. त्याद्वारे भीती अन् नकारात्मकता पसरवली जाते; मात्र सनातन प्रभात देव, देश आणि धर्म यांना वाहिलेल्या भूमिकेतून समाजाला सकारात्मक दिशा देते.
धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी मार्गदर्शन, शास्त्रीय विवेचन, तसेच धर्मपालनाचे महत्त्व यांचा अभ्यासपूर्ण ऊहापोह यांत आढळतो. संपादकीय, संशोधन, संस्कृती, नामस्मरण, सत्संग या सदरांमधून वाचकांचा विवेक जागृत होतो. सनातन प्रभात वाचकांना कृतीप्रवण करणारे एकमेवाद्वितीय दैनिक असल्याने मी गेली २५ वर्षे दैनिक नियमित वाचत आहे.
१४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमातून व्यक्तीमत्त्व विकास, सकारात्मकता आणि कर्तव्यबुद्धी वाढवून व्यक्तीला आनंदप्राप्तीकडे नेण्याचे कार्य दैनिक करते. तीच व्यक्ती देव, देश आणि धर्म यांसाठी योगदान देऊ शकते. समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सनातन प्रभातचे योगदान अत्यंत मोलाचे ठरते.
आयुर्वेदावर श्रद्धा ठेवून आधुनिक विज्ञानाशी विसंगत लेखही प्रसिद्ध करणारे ‘सनातन प्रभात’ ! – वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, संस्थापक, श्री व्यंकटेश आयुर्वेद, डोंबिवली

अनेकदा इतर माध्यमे आयुर्वेदावर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी डावलत नाहीत; मात्र दैनिक ‘सनातन प्रभात’ हे सातत्याने आयुर्वेदावर श्रद्धा ठेवून आधुनिक विज्ञानाशी विसंगत लेख असले, तरी कोणतीही तमा न बाळगता ते प्रसिद्ध करते. आमच्यासारख्या आयुर्वेदीय वैद्यांचे लेखही नेहमीच प्रसिद्ध होत असतात. एक वैद्य म्हणून आयुर्वेदासारख्या महत्त्वपूर्ण विषयाच्या पाठीशी उभे राहिल्याविषयी आम्हालाही दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी आनंद वाटतो.
हिंदुहिताच्या संदर्भात जगभरात कुठेही घडणारी गोष्ट असेल किंवा एखादे महत्त्वाचे वृत्त असेल, ते निश्चितपणे वाचायला कुठे मिळते ? तर त्यासाठी संदर्भ म्हणून नेहमी मी दैनिक ‘सनातन प्रभात’कडेच बघतो.
त्यात वृत्त प्रसिद्ध झाले म्हणजे ते सत्यच असणार, यात संशय नाही. ते वृत्त दुसरीकडे पडताळावे लागतच नाही. हा आजवरचा माझा अनुभव आहे.
‘सनातन प्रभात’चे राष्ट्रकार्यातील योगदान उल्लेखनीय ! – लेफ्टनंट कर्नल मनोज सिन्हा (निवृत्त)

‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नाही, तर समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक आहे. सध्याच्या व्यावसायिक काळात वृत्तपत्रांनाही व्यावसायिक स्वरूप आले आहे. अशा स्थितीतही समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने वृत्तपत्र चालवणे आणि त्यासाठी सनातनच्या साधकांचे समर्पण निश्चितच कौतुकास्पद आहे. सनातन प्रभातमधून सातत्याने राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांसह भारतातील थोर पुरुषांच्या कार्याची माहिती प्राधान्याने दिली जाते. भारताचा सुसंस्कृत, समृद्ध इतिहास आणि पराक्रम यांविषयी लिखाण केले जाते. यामुळे भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेम वृद्धींगत होत आहे. सनातन प्रभातचे राष्ट्रकार्यातील योगदान उल्लेखनीय आहे.
‘सनातन प्रभात’सारख्या सैनिकामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

दैनिक ‘सनातन प्रभात’ सैनिकाप्रमाणे समाजातील अयोग्य गोष्टींविरुद्ध लढा देत आहे. गेल्या २६ वर्षांत समाजप्रबोधन आणि धर्मजागृती यांसह सनातन प्रभातने हिंदूंना संघटित करण्याचे मोठे कार्य केले आहे. अनेक गैरप्रकार कुणालाही न घाबरता समाजासमोर आणले. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती झाली. धर्मांतर रोखण्याचेही मोठे कार्य सनातन प्रभातने केले. विविध मान्यवरांचे विचार दैनिकात लेखाद्वारे प्रसिद्ध होत असल्याने तळागाळापर्यंत जनजागृती होत आहे. ‘सनातन प्रभात’मुळे लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! ‘या दैनिकाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि सर्व विश्वात त्याचा नावलौकिक होऊन विश्वाचे कल्याण होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना !
– श्रीमती स्मिता नवलकर (वय ७४ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !