हिंदूंनी त्यांचे जन्मदिवस तिथीनुसार साजरे करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

बैठकीला उपस्थित डावीकडून श्री. आनंद जाखोटिया,  सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि अन्य

कोटा (लाडपुरा, राजस्थान) – ज्याप्रमाणे देवतांच्या अवतारांचे जन्मोत्सव त्यांच्या तिथीनुसार साजरे केले जातात, त्याप्रमाणे प्रत्येक सनातन धर्मीय हिंदूंनीही त्यांचे जन्मदिवस तिथीनुसारच साजरे करावेत. हिंदु धर्मातील १६ संस्कार आणि सण-उत्सव शास्त्राशी जोडलेले आहेत. त्यांचे आचरण केल्याने जीवनात आनंद आणि शांती मिळते, तसेच समाजातील अनेक वाईट गोष्टी दूर होतात, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एरंडखेडा गावातील मंशापूर्ण हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या बैठकीत केले. कोटा येथील ज्येष्ठ शिक्षक तथा समितीचे सदस्य श्री. कुंजबिहारी शर्मा यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सन्मान केला.

सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सन्मान करतांना श्री. कुंजबिहारी शर्मा

हिंदु जनजागृती समितीचा परिचय समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी करून दिला. श्री. जाखोटिया म्हणाले, ‘‘सनातन धर्माची प्रत्येक परंपरा शास्त्र आणि विज्ञान यांवर आधारित आहे. हे समजून घेतले आणि स्वीकारले, तर शरीर, मन अन् जीवन यांच्याशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवता येतात.’’ याप्रसंगी माजी ग्रामप्रमुख ललितेश शर्मा, मेघराज सेन, पवन, देवीशंकर सुमन, बजरंग दलाचे समन्वयक बबलू सुमन, गिरीराज प्रसाद आणि इतर अनेक गावकरी उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित धर्माभिमानी