स्वातंत्र्यसंघर्षातील अमर स्वरगाथा !
‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रचेतनेच्या महामंत्राला ‘जन गण मन’ पूर्व संपूर्ण स्वरूपात सादर करण्याच्या केंद्राच्या निर्णयाने पुन्हा एकदा जुन्या वादांनी डोके वर काढले आहे. परकीय सत्तेविरुद्धच्या लढ्यात स्वातंत्र्यविरांच्या चेतनेचे प्रतीक ठरलेल्या या गीताचा इतिहास केवळ काव्यपरंपरेत मर्यादित नसून तो आंदोलन, त्याग आणि राष्ट्रभक्ती यांच्या भावविश्वाशी घट्ट जोडला गेला आहे. तथापि त्यावरील आक्षेपांची परंपराही तितकीच जुनी. कधी धार्मिकतेच्या नावाखाली, तर कधी राजकीय समीकरणांच्या चौकटीतून या गीताचे अर्थ लावले गेले. साहित्यिक प्रतिकांची व्यापकता समजून न घेता संकुचित दृष्टीकोनातून निर्माण होणार्या या वादांचा उगम नेमका का झाला ? स्वातंत्र्य यज्ञातील या गीताचे प्रेरणादायी योगदान, सांस्कृतिक अधिष्ठान आणि समकालीन राजकारणातील त्याचे स्थान यांचा घेतलेला सखोल मागोवा…

१. ‘वन्दे मातरम्’ प्रत्येक विरोधातून तावून सुलाखून बाहेर आले !
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे २८ जानेवारी २०२६ या दिवशी जी. पार्थसारथी (जॉईंट सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया – भारत सरकारच्या मंत्रालयाचे सहसचिव) यांच्या आदेशाने निघालेले राष्ट्रीय गीताविषयीचे पत्र त्याच आठवड्यात प्रसिद्धिमाध्यमांमधून सर्वांपर्यंत पोचले. अपेक्षेप्रमाणे त्यावर उलटसुलट चर्चा आणि प्रतिक्रियाही येऊ लागल्या, विरोधाचे सूर आळवले जाऊ लागले. ‘वन्दे मातरम्’च्या संदर्भात हे काही नवे नाही. हे वर्ष ‘वन्दे मातरम्’चे १५१ वे जन्मवर्ष आहे. या १५० वर्षांत स्वातंत्र्यापूर्वीची ७२ वर्षे आणि स्वातंत्र्यानंतरची ७८ वर्षे ‘वन्दे मातरम्’ने अनेक विरोध सहन केले असून त्या प्रत्येक विरोधातून ‘वन्दे मातरम्’ तावून सुलाखून बाहेर आले आहे.
२. ‘वन्दे मातरम्’च्या १५० व्या वर्षातील अत्यंत महत्त्वाची आणि गौरवास्पद घटना !

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये भारतीय जनतेची ब्रिटीश सत्तेविरुद्धची युद्धगर्जना म्हणून गाजलेल्या ‘वन्दे मातरम्’ला स्वातंत्र्यानंतरही शासनकर्त्यांनी उपेक्षेचीच वागणूक दिली. अलीकडे मात्र ही परिस्थिती पालटू लागली आहे. ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ आणि देहलीतील ‘वन्दे मातरम् गौरव’ कार्यक्रमानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांत घडवून आणलेल्या ‘वन्दे मातरम्’वरील चर्चेमुळे पुन्हा एकदा ‘वन्दे मातरम्’चे देशव्यापी जागरण चालू झाले. पुढे त्याच आठवड्यात केंद्र सरकारने ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ गायनाविषयी घेतलेला निर्णय ही ‘वन्दे मातरम्’च्या १५० व्या सार्धशती जयंती वर्षातील अत्यंत महत्त्वाची आणि गौरवास्पद घटना ठरावी.
वैदिक वाङ्मय, संतांच्या रचना किंवा स्वातंत्र्यलढ्यातील काही साहित्य हे जनसामान्यांनी केलेल्या मौखिक पाठांतरामुळे अखंडितपणे आजच्या पिढीपर्यंत पोचले. ‘वन्दे मातरम्’ हे असेच जनसामान्यांच्या मनातील त्याने मिळवलेल्या अत्युच्च स्थानामुळे कायमच तरले आहे आणि यापुढेही तरून जाणार आहे.
३. ‘वन्दे मातरम्’वर बंदी आणावी कि नाही ? यासाठी काँग्रेसने समिती नेमणे आणि समितीच्या अहवालातील उत्तर
‘वन्दे मातरम्’वर पहिली बंदी बंगालच्या फाळणीनंतर ८ नोव्हेंबर १९०५ या दिवशी विभाजित बंगालचा गव्हर्नर फुल्लर याचा चिटणीस पी.सी. लोन याने एका परिपत्रकाद्वारे आणली. त्यानंतर पुढच्याच वर्षी स्थापन झालेल्या ‘मुस्लीम लीग’नेही ‘वन्दे मातरम्’वर आक्षेप घेण्यास प्रारंभ केला. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाचा प्रारंभ वर्ष १९०१ पासून ‘वन्दे मातरम्’नेच होत असे. वर्ष १९२३ मध्ये काकिनाडा येथील अधिवेशनात महंमद अली यांनी पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांना हे गीत गाण्यास विरोध केला. वर्ष १९३७ मध्ये बॅ. जिनांनी ‘वन्दे मातरम्’वर संपूर्ण बंदी आणण्याची मागणी केली. त्याला उत्तर देण्यासाठी रवींद्रनाथ यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. याखेरीज आचार्य नरेंद्र देव, पंडित नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस यांची पोटसमितीही नेमण्यात आली. या वादग्रस्त पार्श्वभूमीवर ‘वन्दे मातरम्’ या गीताला आक्षेप न घेता त्यातील पहिली २ कडवी विनाअट मान्य करावी’, असे रवींद्रनाथ यांनी सुचवले. या घटनेमुळे ‘वन्दे मातरम्’च्या छेदनाला उत्तरदायी धरले जात असले, तरी रवींद्रनाथांसारख्याच व्यक्तीमुळे त्या वेळी पहिल्या २ कडव्यांपुरते तरी ते वाचले. अन्यथा ‘मुस्लीम लीग’च्या मागण्या मान्य करून काँग्रेसकडून हे संपूर्ण गीतही रहित होऊ शकले असते.
‘वन्दे मातरम्’ला होणारा विरोध, म्हणजे भारतीय संस्कृती आणि हुतात्मा वीर यांना विरोध !

‘वन्दे मातरम्’मधील रूपकात्मक भाग समजून घेतला, तर मुसलमानांच्या आक्षेपांचे आपोआप खंडण होईल, त्यासाठी त्याची शेवटची ३ कडवी अभ्यासायला हवी. हिंदु धर्माचे नव्हे, तर ‘वन्दे मातरम्’चे श्रेष्ठत्व नेमके याच ओळींमध्ये आहे, हे समजून येईल. केवळ हिंदु संस्कृतीतच नव्हे, तर अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये मातृकापूजनास महत्त्व आहे. सानेगुरुजींनी वर्णन केलेल्या ज्ञान-विज्ञानाला हृदयाची जोड देणार्या सर्वसमावेशक अशा उदारमतवादी भारतीय संस्कृतीतील मातृपूजनाला, मातृभूमीच्या स्वरूपातील जगदंबेच्या पूजनाला वा वंदन करण्याला विरोध असेल, तर तो विरोध भारतीय संस्कृतीला आहे, तो विरोध मातृभूमीसाठी हुतात्मा झालेल्या विरांनाही आहे. या काव्यातील, या मंत्रातील रूपकात्मक असा भावच समजला नाही, तर त्याला असलेला त्यांचा विरोध तात्त्विक पातळीवर न रहाता द्वेषमूलक होतो. ‘वन्दे मातरम्’मध्ये व्यक्त केलेली मातृभूमीवरील भक्ती अशी धर्माधिष्ठित, मूलतत्त्ववादी आणि आंधळी नाही; म्हणूनच अनेक हिंदु देशभक्तांप्रमाणेच अशफाकउल्ला खान, कुर्बान हुसेनसारख्या अनेक मुसलमान देशभक्तांनीही ‘वन्दे मातरम्’ची गर्जना करतच फाशी स्वीकारली, तरीही ‘मुस्लीम लीग’चा विरोध कायमच राहिला. स्वातंत्र्यापूर्वीच ४ वर्षे आधी ‘जन गण मन’ला पुढे आणण्याचे प्रयत्न पंडित नेहरूंनी चालू केले होते.
– श्री. मिलींद सबनीस
४. ‘वन्दे मातरम्’विषयी मुसलमानांना असलेले आक्षेप विचारवंतांनी खोडून काढणे
‘वन्दे मातरम्’च्या शेवटच्या कडव्यात आणि पहिल्या२ कडव्यांत असलेल्या देवीच्या विविध रूपांच्या उल्लेखांमुळे मूर्तीपूजेचा आक्षेप घेत मुसलमान नेत्यांनी याला विरोध केला होता आणि त्यांचेच वंशज आजही विरोध करत आहेत. मौलाना रेजा उल करीम यांनी वर्ष १९४४ मध्ये ‘बंकिमचंद्र ओ मुसलमान समाज’ नावाचे बंगाली पुस्तक लिहून याचे खंडण केले होते. अगदी अलीकडेही ‘वन्दे मातरम् आणि इस्लाम’ या पुस्तकातून अरबिंदो मुजुमदारांनी आक्षेप खोडून काढले आहेत. ‘हैद्राबाद मुक्तीसंग्रामा’तील स्वातंत्र्यसैनिक आणि उर्दू-फारसी भाषांवर प्रभुत्व असणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री देवीसिंग चौहान यांनीही ‘वन्दे मातरम् आणि मुसलमानांचा सिज्दा’ असा लेख वर्ष १९७३ मध्ये लिहिला होता. प्रसिद्ध पत्रकार मुजफ्फर हुसेन यांनी ‘इस्लामची श्रद्धा आणि वन्दे मातरम्’, तसेच न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी ‘वन्दे मातरम् मुसलमानविरोधी कसे ?’ असे वर्ष २००६ मध्ये लिहिलेले लेखही गाजले होते. ‘वन्दे मातरम्’ची विविध भाषांतील भाषांतरे आणि २० पेक्षा अधिक अनुवादही झाले आहेत. त्यात सिमब अकबराबादी, भानू आणि अलीकडे अरिफ महंमद खान यांनी उर्दूमध्येही ‘वन्दे मातरम्’चा अनुवाद केला आहे. याखेरीज उर्दूतील ‘वन्दे मातरम्’चा पहिला अनुवाद ‘पयाम’ या वृत्तपत्राच्या ७ ऑक्टोबर १९३७ या दिवशीच्या अंकात प्रकाशित झाला होता, तो काझी अब्दुल गफार यांनी केला होता.
५. ‘वन्दे मातरम्’कडे धर्म आणि जातीभेद यांच्यादृष्टीने बघणे चुकीचे !
‘वन्दे मातरम्’च्या ज्या ओळींमधील हिंदु देवीचे वर्णन मुसलमानांना खटकते, त्यांनी एक काव्य म्हणून या गीताकडे प्रथम पहायला पाहिजे. ‘वन्दे मातरम्’ ही कुठल्याही हिंदु देवतेची प्रार्थना किंवा स्तोत्र नाही, ते एक श्रेष्ठ रूपकात्मक काव्य आहे. कालिदास, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्यापासून आजच्या अनेक सर्वभाषिक साहित्याने, अशी अनेक रूपकात्मक काव्ये लिहिली आहेत. एक साहित्यकृती म्हणून ‘वन्दे मातरम्’कडे पहातांना त्यातील रूपकात्मक बाज ओळखण्यासाठी धर्माची आणि जातीभेदाची झापडे उतरवणे आवश्यक असते. धर्मप्रचारक साहित्याची जातकुळी वेगळी; परंतु निखळ सौंदर्यदृष्टी लाभलेल्या साहित्याचे अवलोकन करतांना असा दूषित दृष्टीकोन आडवा येणे चुकीचेच आहे. ‘वन्दे मातरम्’विषयी नेमके हेच अनेक वर्षे घडत आहे.
६. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीताच्या बरोबरीने मान दिला जाईल’, असे सांगणे
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळीही नेमक्या राष्ट्रगीताचा निर्णय घेतला नव्हता. ‘घटना समिती’चे काम चालू होऊन ‘संविधान निर्मिती’च्या बैठकांमध्येही यावर वेगळी चर्चा घेतली नाही.
१४ ऑगस्ट १९४७ च्या उत्तररात्री आणि १५ ऑगस्टच्या पहाटे देहलीत झालेल्या मुख्य कार्यक्रमात ‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ ही दोन्ही गीते वाजवली गेली. भारतीय स्वातंत्र्यानंतर नियोजित राष्ट्रध्वजही त्यापूर्वीच संमत केला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कायमच लोकांच्या मनात राष्ट्रगीताचे स्थान असणार्या आणि या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय कामगिरी केलेल्या ‘वन्दे मातरम्’लाच राष्ट्रगीताचे स्थान मिळेल, याविषयी कुणालाही शंका नव्हती. मधल्या काळात ‘घटना समिती’समोर माननीय कृष्णराव फुलंब्रीकर, तसेच पंडित वि.दे. अंभईकर यांनी ‘वन्दे मातरम्’च्या संगीतरचनांचे प्रात्यक्षिक सादरही केले होते; परंतु पंडित नेहरूंनी आधीच ‘जन गण मन’ निश्चित केल्यामुळे या विषयावर कोणतीही चर्चा किंवा मतदान न घेता ‘घटना समिती’चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी थेट निवेदन जाहीर केले. २४ जानेवारी १९५० या दिवशी ‘घटना समिती’ची शेवटची बैठक झाली, त्यात डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले, ‘जन गण मन’ या शब्दांनी सिद्ध झालेले गीत आणि संगीत हे भारताचे राष्ट्रगीत आहे. या गीतातील शब्दांत सरकारला वेळ पडेल, तेव्हा आवश्यक तो पालट करण्याचा अधिकार राहील. भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यात ऐतिहासिक कामगिरी बजावलेल्या ‘वन्दे मातरम्’ला ‘जन गण मन’च्या बरोबरीने मान दिला जाईल आणि त्याची प्रतिष्ठा त्यासारखीच राहील. मला वाटते, सभासदांचे याने समाधान होईल.’
या निवेदनामुळे ‘जन गण मन’ला राष्ट्रगीत (नॅशनल अँथेम) आणि ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीत (नॅशनल साँग) अशी मान्यता मिळाली. ‘घटना समिती’तील अध्यक्षांचे निवेदन, त्यावर चर्चा किंवा सदस्यांचे मतदान टाळणे हा सारा कटाचाच एक भाग वाटतो.
– श्री. मिलींद सबनीस, पुणे.
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १५.२.२०२६)
संपादकीय भूमिकास्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक कामगिरी केलेल्या ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीतासारखा मान देण्यासह त्याची प्रतिष्ठा तशीच रहायला हवी ! |
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !