साहित्यिकांनीही कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे ! – पालकमंत्री उदय सामंत

मांडकी, पालवण येथील ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलन

राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. उदय सामंत यांनी केले.

चिपळूण – कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे, तर ‘कॅलिफोर्निया’मध्ये कृत्रीमता आहे. त्यामुळे कोकणातील निसर्ग टिकवूया. साहित्यिकांनीही कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

१४ फेब्रुवारी या दिवशी डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील मांडकी, पालवण येथे राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत पुढे म्हणाले,

१. बॅरिस्टर नाथ पै यांनी आखलेल्या मार्गावरून आमचा प्रवास चालू आहे. कोकण रेल्वेचे निर्माते मधू दंडवते यांचे नाव मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राला दिले. चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव रत्नागिरीतील उपकेंद्राला दिले. कोकण सुपुत्रांचा आपणच आपल्या पद्धतीने सन्मान केलेला आहे.

२. विश्व मराठी साहित्य संमेलन या वर्षी नाशिक येथे होत आहे. कुसुमाग्रजांचे हे गाव आहे. ‘जगभरातील मराठी भाषिक येथे यावेत’, हा यामागचा उद्देश आहे. सीमा भागांतील मराठी ग्रंथालयांना शासनाने अनुदान दिले. त्यातून अनेक वाचनालये उभी रहात आहेत. मातृभाषा टिकण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता आहे. ही संमेलने केवळ चर्चेपुरती रहायला नकोत. यातून शासनाला मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे.

३. साहित्य संमेलनात नेहमीच राजकारण्यांवर टीका केली जाते; मात्र राजकारणातसुद्धा कलाकारांची काही न्यूनता नाही. काही राजकारणी २४ घंटे ‘मेकअप’ करूनच बसलेले असतात. ज्याप्रमाणे पद्मश्री पोपटराव पवारांनी गावांचा विकास केला. तशी जिल्ह्यातील ५ मतदार संघातील प्रत्येकी २ याप्रमाणे १० गावे आदर्श गावांसाठी निवडू. त्यांना पोपटराव पवारांनी मार्गदर्शन करावे.

४. कृषी विद्यापिठे हे संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत. जेणेकरून शेतकर्‍यांना संकटाच्या काळात साहाय्य होईल. कृषी विद्यापिठांमध्ये अनुमाने २५ सहस्र एकर जागा पडीक आहेत, त्यांचा संसोधनासाठी वापर व्हायला हवा.

संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, ‘‘शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन येथे होऊ शकले. साहित्यिकांनी नेहमीच सकारात्मकता मांडायला हवी. भाषा आणि समाजासमाजात वाद, विध्वंस होईल, असे लिखाण करू नये. बोलीभाषा टिकण्यासाठी आणि मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यायला हवे.’’

स्वागताध्यक्ष कुलगुरु डॉ. संजय भावे म्हणाले, ‘‘जगात शेती आणि शिक्षण हेच शाश्वत आहे. अलीकडच्या ग्रामीण लेखनामध्ये शेती, संशोधन समस्या येत नाहीत. त्यामुळे साहित्यिकांनी यााकडे लक्ष दिले पाहिजे.’’ यानिमीत्त डॉ. तानाजी चोरगे लिखित आंदोलन या पुस्तकाचे, तसेच स्मरणिकीचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी पद्मश्री पोपटराव पवार, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.