पुणे येथील महाविद्यालयात बांगलादेशी झेंडा असलेले विक्रीकेंद्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले

पुणे शहराच्या भाजप युवा मोर्चाकडून निषेध व्यक्त

पुणे – येथील कोथरूड भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध देशांतील विद्यार्थी जे या महाविद्यालयात शिक्षण घेतात, त्यांनी त्यांच्या कला आणि संस्कृतीचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात सुदान देशाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशातील लोककलेचे सादरीकरण करतांना हातात तलवारी घेऊन नृत्य केले, तसेच याच कार्यक्रमात बांगलादेशी विद्यार्थ्यांनी एक खाद्य पदार्थांचे विक्रीकेंद्रही लावले होते. तेथे बांगलादेशाचा झेंडा फडकवण्यात आला होता.

स्थानिक विद्यार्थ्यांनी या केंद्राविषयी एक पत्र महाविद्यालयाच्या प्रशासनाला पाठवले होते; मात्र त्यानंतरही बांगलादेशाच्या विद्यार्थ्यांनी तेथे विक्रीकेंद्र लावले. (बांगलादेशात हिंदूंनी असे केंद्र उभारले असते आणि त्याला विरोध झाला असता, तर हिंदूंनी केंद्र चालू ठेवले असते का ? – संपादक) ही गोष्ट भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी तेथे जाऊन संबंधित खाद्य पदार्थांचे विक्रीकेंद्र बंद करून महाविद्यालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

सौजन्य : Pudhari News

भाजयुमोचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले की, शैक्षणिक संस्था या राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करण्याच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक भावना जपल्या जाव्यात आणि कोणताही निर्णय घेतांना व्यापक सामाजिक परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

  • सातत्याने भारतविरोधी कारवाया करणार्‍या बांगलादेशी विद्यार्थ्यांना भारताच्या महाविद्यालयांमध्ये स्थान का देण्यात येते ? अशा समाजविघातक वृत्तीमुळेच भारताला फटका बसत आहे !
  • बांगलादेशावर केवळ राजकीय स्तरावर नव्हे, तर सर्वच स्तरांवर भारताने विरोध केला, तरच तो वठणीवर येईल, हे जाणा !