‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांविषयी जाणून घेत आहोत.
(लेखांक १४)
‘पूर्वी भगवद्भक्ती करण्याचे माध्यम असणार्या आणि मंदिर संस्कृतीशी संलग्न असलेल्या ‘गायन, वादन, नृत्य अन् नाट्य’, यांसारख्या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश आता काळाच्या प्रभावामुळे पालटत चालला आहे. ‘कलेसाठी कला’, ‘अर्थार्जन, तसेच मनोरंजन यांसाठी कला’, असा हा प्रवास आता कलांमध्ये विकृती निर्माण होण्याच्या दिशेने होत आहे. या लेखमालेतील पुढील काही भागांमध्ये आपण कलांचा विकृतीपर्यंतचा प्रवास समजून घेणार आहोत. आजच्या लेखात आपण ‘मूळ दैवी परंपरा असलेल्या भारतीय कलांचा लोकाभिमुख होत गेलेला प्रवास, तसेच या स्थितीला कारणीभूत असलेले विविध घटक’ जाणून घेणार आहोत.
(भाग १)
लेखांक १३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1002608.html

१. ‘भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गाणे’ आणि ‘व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी गाणे’, यांतील भेद स्पष्ट करणारी एक सत्य कथा

एकदा बादशाह अकबराला गानसम्राट तानसेनच्या गुरूंचे, म्हणजेच स्वामी हरिदास यांचे गायन ऐकण्याची तीव्र इच्छा झाली. तानसेनने सांगितले, ‘‘माझे गुरु दरबारात येऊन गायन करणार नाहीत. ते केवळ भगवंताच्या आज्ञेने गातात.’’ स्वामी हरिदास यांचे गायन ऐकण्याची तीव्र इच्छा असल्याने अकबर आणि तानसेन वेश पालटून स्वामी हरिदास यांच्या कुटीजवळ थांबले अन् त्यांच्या गायनाची प्रतीक्षा करू लागले. ब्राह्ममुहूर्तावर स्वामी हरिदासांनी ईश्वराच्या आज्ञेने दैवी आणि भावपूर्ण गायन करण्यास आरंभ केला. स्वामी हरिदासांचे गायन ऐकून अकबर एका वेगळ्याच भावसमाधीत गेला. परतीच्या प्रवासात अकबराने तानसेनला विचारले, ‘‘तुझ्या आणि स्वामी हरिदासांच्या गायनात एवढा भेद का ?’’ त्यावर तानसेन म्हणाला, ‘‘मी तुम्हाला (व्यक्तीला) प्रसन्न करण्यासाठी गातो, तर माझे गुरु केवळ त्या जगन्नियंत्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी गातात. त्यामुळे हा भेद आहे.’’
तानसेनने दिलेल्या वरील उत्तरामधून ‘कला ही ईश्वराभिमुख न रहाता हळूहळू लोकाभिमुख कशी होत गेली हे’ आणि या दोन्ही प्रकारांत असलेला कमालीचा भेद’, स्पष्ट होतो.
२. भारतातील आध्यात्मिक वारसा असणार्या कलांना ‘मनोरंजन’ म्हणून पहाण्याच्या दृष्टीकोनाला कारणीभूत असलेले काही घटक !
२ अ. भारतावर झालेली मोगलांची आक्रमणे : भारतावर झालेल्या मोगलांच्या आक्रमणांमुळे भारतीय कलांचा र्हास मोठ्या प्रमाणात झाला. मोगलांनी तक्षशिला, नालंदा, भोजशाला यांसारखी कला आणि विद्या यांच्या ज्ञानाचा मुख्य स्रोत असणारी विद्यापिठे नष्ट केली, तसेच मोगल आक्रमणकर्त्यांनी भारतीय संस्कृती जपणारी मंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यामुळे मंदिराभिमुख, तसेच ईश्वराच्या आराधनेचे माध्यम असणारी भारतीय कला अधिकतर मोगल राजांच्या दरबारी सादर केली जाऊ लागली. तिला ‘दरबारी रूप’ प्राप्त झाले. त्यामुळे कलाकार कलांच्या मूळ उद्देशापासून दूर गेला आणि ‘राजाला खुश करून पारितोषिक मिळवणे, राजाची वाहवा मिळवणे आणि स्वकौतुक’, यांत गुरफटला. राजाश्रय मिळालेल्या कलांकडे ‘मनोरंजन’ म्हणून पाहिले जाऊ लागले.
त्या कालखंडापासून भारतीय शास्त्रीय कलांवर उर्दू संस्कृतीचा प्रभाव दिसायला लागला. त्याचाच परिणाम म्हणून हिंदुस्थानी संगीतातील ‘धृपद’ शैली न्यून झाली आणि ‘ख्याल’ गायनाचा आरंभ होणे, त्यातील बंदिशींमध्ये (टीप १) शृंगारप्रधान, तसेच अनेक उर्दूमिश्रित शब्दांचा वापर होणे’, हे वाढले. हाच परिणाम ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्य शैलीवरही झाला. मंदिरातील नृत्य हे दरबारात होऊ लागल्याने नृत्याचा पोशाख, नृत्याचे गीत प्रकार यांतही शृंगारिकता दिसायला लागली.
टीप १ – बंदीश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’, किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्य किंवा द्रुत लयीत असते.
उत्तर भारतामध्ये मोगलांची राजवट अधिक काळ असल्याने त्या भागातील कलांवर त्याचा प्रभाव अधिक प्रमाणात झाला. त्या तुलनेत दक्षिण भारतात मोगलांची आक्रमणे अल्प झाली. त्यामुळे तेथील कलांवर त्याचा तेवढा प्रभाव झाला नाही. परिणामी तेथे आपली कला संस्कृती बर्यापैकी टिकून राहिली.
२ आ. इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत भारतातील ‘गुरु-शिष्य परंपरा’ नष्ट करणे : इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्या वेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचे मूळ असलेली ‘गुरु-शिष्य परंपरा’च नष्ट केली. त्यामुळे भारतीय परंपरेनुसार ‘कला शिकणे’, आपोआपच न्यून झाले. परिणामी मधल्या कालखंडामध्ये नृत्य आणि गायन या कलांकडे वेगळ्या, म्हणजे ‘दरबारातील कला’, ‘लोकांच्या मनोरंजनासाठी कला’, अशा दृष्टीने पाहिले जाऊ लागले. त्यामुळे चांगल्या घरातील स्त्रियांना या कला शिकण्याविषयी बंधन होते. पुढील काळात या कलांचा समावेश शिक्षणपद्धतीत करण्यात आला. यात अनेक नृत्यगुरु, कला-अभ्यासक आणि दक्षिण भारतातील काही राजे यांचे योगदान आहे. त्यांच्यामुळेच कला शिकणे सर्वांसाठी सोपे झाले; परंतु ‘कलेतून साधना अन् आत्मरंजन’, हा दृष्टीकोन आता जवळपास संपुष्टात येऊन ‘कलेतून लोकरंजन अन् मनोरंजन’, हा दृष्टीकोन समाजामध्ये दृढ झाला.
३. सध्याचे कला-शिक्षक आणि विद्यार्थी यांची कलेच्या मूळ उद्देशापासून दूर नेणारी मानसिकता !
अ. काही जुनी-जाणती मंडळी सोडली, तर आता कला शिकवणारे आणि शिकणारे यांचा कल कलेच्या सादरीकरणाकडे वाढला आहे. त्यातून ‘अर्थार्जन करणे’, हेही ओघाने वाढले आहे. कलाकाराचे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू त्याच्या कलेत प्रगट होतांना दिसतात. कलाकारांची ‘लोकेषणा’ही वाढली आहे. त्यामुळे समाज कलेच्या मूळ उद्देशापासून दूर होऊन कलेतील क्षणिक सुखाकडे आकृष्ट व्हायला लागला आहे.
आ. हल्ली कलेतील बहुतांश गुरुजन हेही अर्थार्जनासाठी कला शिकवत असल्याने त्यांचे ‘कला शिकवणे’, हे नोकरीप्रमाणे होत आहे. त्यांनी स्वतःही कलेकडे साधना म्हणून पाहिलेले नसल्याने विद्यार्थ्यांना ते याविषयी कसे सांगू शकणार ? त्यामुळे या पिढीच्या मनावरही ‘संगीत आणि नृत्य या कला केवळ मनोरंजन किंवा सादरीकरण यांसाठीच आहेत’, हे बिंबले गेले आहे. ‘कला शिकणे’, हे तांत्रिक पद्धतीने (Technical) होत आहे. या दृष्टीकोनामुळे ही पिढी भारतीय दैवी कलांमधील आध्यात्मिक अनुभूती घेण्यापासून वंचित रहात आहे.
इ. पूर्वीचे कलाकार आणि गुरु आपले संपूर्ण जीवन कलेलाच समर्पित करत असत. आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातही आजच्या पिढीला पाश्चात्त्य संगीताने भुरळ पाडली आहे. त्यामुळे कलेतील मूळ गाभा समजून त्यातील खरा आनंद घेण्यापासून ही पिढी वंचित रहात आहे.
४. कलाकारांचा संगीतोपयोगी वस्तूंप्रतीचा भाव न्यून होऊन त्यांच्याकडून वस्तूंचा अनादर होणे
पूर्वी कलाकार कला ही ‘आराधना’ म्हणून करत असल्याने संगीतोपयोगी वस्तू, उदा. घुंगरू, वाद्ये इत्यादींविषयी कला-उपासकांचा भाव होता. ‘या वस्तू आणि वाद्ये संगीत-आराधनेसाठी साहाय्य करतात’, या भावाने त्यांच्याकडे पाहिले जायचे; परंतु आजच्या पिढीला ही दिशा नसल्याने घुंगरू अथवा वाद्य यांना नमस्कार न करताच नर्तन किंवा वादन चालू केले जाते. काही वादक त्यांच्या वाद्यावर ‘स्टंट’ म्हणून जोरात आघात करतात. काही नृत्य-कलाकारांकडून ‘पायांत घुंगरू घालून चप्पल घालणे, घुंगरांना थेट भूमीवर ठेवणे’, अशा अयोग्य कृतीही होतात. त्यामुळे नकळत का होईना, एक प्रकारे त्या वस्तूंचा अवमान होतो. पूर्वीच्या काळी कलाकारांमध्ये ‘स्टंट’( लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जेव्हा काहीतरी वेगळे करणे.) ऐवजी ‘भाव’ असायचा. त्यामुळे त्यांच्याकडून अशा अयोग्य कृती होत नसत. आता कला विकसित झाल्या आहेत; परंतु ‘आध्यात्मिक दृष्टीने कला खर्या अर्थाने विकसित व्हायला हव्यात’, हे या उदाहरणांतून लक्षात येत आहे.
५. कलाकारांनी ‘कला ही ‘ईश्वराधना’ आहे’, असा भाव ठेवल्यास कलेतील सात्त्विकता आपोआपच वाढेल !
आजची ही स्थिती लक्षात घेतल्यास समाजाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. ही योग्य दिशा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’द्वारे दिली जात आहे. ‘आपली कला हे केवळ सादरीकरण नसून ती ‘ईश्वराधना’ आहे’, असा भाव ठेवल्यास कलेतील सात्त्विकता आपोआपच वाढू शकते. ‘कलेचे शास्त्रशुद्ध स्वरूप जपणे आणि भगवंताला समर्पितभावाने कला अर्पण करणे’, हे ध्येय ठेवल्यास कलाकारांना पुन्हा दैवी संगीत अन् दैवी नृत्य अनुभवता येईल’, यात शंकाच नाही !’
संग्राहक : कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१८.१.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1007006.html
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ई-मेल : [email protected]
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !