तिरुपती लाडूमधील केंद्रीय अन्नतंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या अन्वेषण अहवालात भेसळीचा उल्लेख होता; पशु चरबीचा नव्हे ! – सुब्बा रेड्डी, माजी अध्यक्ष, तिरुमला तिरुपती देवस्थानम् मंडळ

तिरुमला तिरुपती देवस्थानम् मंडळाचे माजी अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांचा दावा

(वाय.एस्.आर्. काँग्रेस म्हणजे युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पक्ष, म्हणजेच युवा, कामगार आणि शेतकरी काँग्रेस पक्ष)

नवी देहली – तिरुपती येथे भगवान वेंकटेश्‍वरांचा प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणार्‍या लाडूंमध्ये भेसळ झाल्याच्या आरोपाच्या प्रकरणी तिरुमला तिरुपती देवस्थानम् मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे खासदार वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, केंद्रीय अन्नतंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या वर्ष २०२२ मधील अहवालात भेसळयुक्त तुपाच्या वापराचा उल्लेख होता; मात्र पशु चरबीच्या भेसळीचा कोणताही उल्लेख नव्हता.

आंध्रप्रदेश राज्यातील तेलुगू देशम् पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने अहवाल दडपल्याचा जो आरोप केला आहे, तो रेड्डी यांनी फेटाळून लावला. त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला की, जर अहवाल दडपला गेला असता, तर नमुन्यांच्या तपासणीसाठी त्यांनी केंद्रीय अन्नतंत्रज्ञान संशोधन संस्थेला पत्र का पाठवले असते ? अज्ञात तक्रारीच्या आधारे कारवाई केली होती आणि त्या वेळी प्रकरण केंद्रीय अन्नतंत्रज्ञान संशोधन संस्थेकडे सोपवले होते. तिच्या अहवालावर अधिकार्‍यांनी नेमकी कोणती कारवाई केली, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणीही रेड्डी यांनी केली.

संपादकीय भूमिका

रेड्डी यांच्या वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे सरकार असतांनाच ही भेसळ झाली होती. त्या वेळी रेड्डी यांच्या सरकारने कारवाई का केली नाही ? सरकारला हे का लक्षात आले नाही ? याची उत्तरे ते सोयीस्कर टाळत आहेत.