सपाट तळपायाचे शरिरावर होणारे परिणाम आणि घ्यायची काळजी !

सपाट तळपाय (Flat Foot) : एक दुर्लक्षित; पण गंभीर समस्या !

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १२०

‘१ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘तळपाय सपाट होण्यामागील कारणे’ जाणून घेतली. लेखाच्या या भागात आपण ‘सपाट तळपायाचे शरिरावर होणारे परिणाम आणि तळपाय सपाट असल्यास कोणती काळजी घ्यायला हवी ?’, हे समजून घेणार आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1003737.html

६. सपाट तळपायाचे शरिरावर होणारे परिणाम

६ अ. गुडघेदुखी अन् गुडघ्याचा संधिवात होऊ शकणे : तळपाय सपाट असल्यास तळपायाची आतील कमान न्यून किंवा नाहीशी झालेली असल्याने चालतांना पाय नैसर्गिकरित्या सरळ न रहाता आत वळतो. पाय आत वळला की, त्याचा थेट परिणाम पिंडरीच्या हाडावर होतो आणि तेही आत फिरते. त्यामुळे गुडघ्यावर चुकीचा ताण पडतो आणि गुडघा आतील बाजूला ओढला जातो. त्यामुळे गुडघ्याच्या सांध्यावर असमान दाब निर्माण होतो, गुडघ्याची आतील बाजू झिजू लागते आणि कालांतराने गुडघेदुखी अन् गुडघ्याचा संधिवात होऊ शकतो.

६ आ. खुब्याच्या सांध्यावर अतिरिक्त ताण पडणे, चालतांना थकवा जाणवणे आणि खुबा दुखणे : गुडघ्यातील हा ताण त्याच्या वरील हाडावर, म्हणजे मांडीच्या हाडावर येतो. मांडीचे हाड आत वळल्यामुळे खुब्याचा सांधाही आत फिरतो. त्यामुळे खुब्याला स्थिर ठेवणारे स्नायू दुर्बल होतात आणि चालतांना शरिराचा तोल नीट रहात नाही. याचा परिणाम म्हणून खुब्याच्या सांध्यावर अतिरिक्त ताण पडतो, चालतांना थकवा जाणवतो आणि खुबा दुखण्याची समस्या उद्भवते.

चित्र १

६ इ. कंबरदुखी उद्भवणे : खुब्याच्या सांध्याची स्थिरता बिघडली की, श्रोणी (Pelvis) पुढे झुकते आणि कमरेच्या मणक्यांची नैसर्गिक वक्रता अधिक वाढते. (चित्र  १ पहा.) त्यामुळे कमरेचा मणका आणि डिस्क (मणक्यांच्या मधली गादी) यांवर असमान दाब पडतो अन् कंबरदुखी चालू होते. सतत बसणे, उभे रहाणे किंवा चालणे यांमध्ये कंबर लवकर थकते अन् वेदना वाढतात.

चित्र २

६ ई. ‘मानदुखी, डोकेदुखी, तसेच चक्कर येणे’, यांसारख्या समस्या निर्माण होणे : ही शारीरिक असंतुलनाची साखळी कमरेपासून पुढे मानेपर्यंत पोचते. कंबर आणि पाठ यांची ठेवण चुकीची झाल्यामुळे शरिराच्या वरच्या भागाचा तोल सांभाळण्यासाठी मान पुढे जाते. (चित्र २ पहा.) त्यामुळे मानेचे स्नायू सतत ताणात रहातात आणि मणक्यांवर दाब वाढतो. परिणामी ‘मानदुखी, डोकेदुखी, तसेच चक्कर येणे’, यांसारख्या समस्या निर्माण होतात.

अशा प्रकारे केवळ पायाची कमान न्यून किंवा नाहीशी झाल्याने चालू झालेली ही समस्या हळूहळू गुडघा, खुबा, कंबर आणि मान यांपर्यंत पोचते. त्यामुळे सपाट तळपाय ही केवळ पायांपुरती मर्यादित समस्या नाही, तर ती संपूर्ण शरिराच्या हालचाल यंत्रणेवर परिणाम करणारी गंभीर स्थिती आहे.

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

७. तळपाय सपा‌ट असल्यास कोणती काळजी घ्यावी ?

७ अ. वजन नियंत्रित ठेवणे

७ आ. योग्य पादत्राणे (supportive footwear) वापरणे : योग्य पादत्राणांची (चपलांची) निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्णपणे सपाट, निकृष्ट दर्जाच्या (Cheap qualities) किंवा घासलेल्या चपला वापरणे टाळावे. शक्यतो ‘आर्च सपोर्ट’ असलेली, म्हणजे आपल्या तळपायांच्या कमानीला योग्य आधार देणारी पादत्राणे वापरावीत.

७ इ. शरिरावर, विशेषतः सांधे आणि पाय यांवर अधिक ताण देणार्‍या क्रिया (high-impact activities) टाळणे : तळपाय सपाट असलेल्या व्यक्तींनी ‘उड्या मारणे, धावणे, तसेच जोरात व्यायाम करणे, म्हणजे जोरात धावण्याचे व्यायाम, ‘स्किपिंग’ (दोरीवरच्या उड्या मारणे), जोरदार ‘एरोबिक्स’ (‘एरोबिक्स’ (Aerobics) म्हणजे तालबद्ध हालचालींनी संगीतासह केला जाणारा हृदय आणि फुफ्फुसे यांची क्षमता वाढवणारा व्यायाम), ‘झुंबा’ (‘झुंबा’ (Zumba), म्हणजे नृत्याच्या हालचालींवर आधारित ‘फिटनेस’ व्यायाम), ‘हाय-इम्पॅक्ट कार्डिओ’ (‘हाय-इम्पॅक्ट कार्डिओ (High-Impact Cardio)’, म्हणजे जोरात उड्या मारणे, धावणे, अशा हालचाली असलेले हृदयासाठीचे व्यायाम. त्यांत सांध्यांवर अधिक ताण येतो.), यांसारख्या ‘हाय-इम्पॅक्ट’ क्रिया टाळाव्यात. अशा प्रकारच्या हालचालींमुळे पायांचे तळवे, टाचा आणि घोटे यांवर अधिक ताण येतो. त्यामुळे वेदना, सूज आणि दुखापती यांचा धोका वाढतो. त्याऐवजी चालणे, सायकल चालवणे (सायकलिंग), जलव्यायाम (जलव्यायाम (Water Exercise / Aquatic Exercise), म्हणजे पाण्यात केला जाणारा व्यायाम. यात शरिरावर अल्प ताण पडतो.) यांसारख्या सौम्य व्यायाम प्रकारांचा अवलंब करावा, तसेच लेखाच्या पुढच्या भागात देण्यात येणारे व्यायाम नियमित केल्यास कालांतराने तळपायांची कमान िनर्माण होण्यास साहाय्य होईल.

चित्र ३

७ ई. आधुनिक वैद्यांनी सुचवलेले ‘ऑर्थोटिक्स’ (Orthotics) नियमितपणे घालणे : हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या पायाचा आकार वेगळा असतो. त्या व्यक्तीच्या पायाच्या रचनेनुसार बुटात बसवण्यासाठी खास तयार केलेल्या अन् पायाच्या कमानीला आधार देणार्‍या सोलला ‘ऑर्थोटिक्स’ किंवा ‘कस्टम आर्च सपोर्ट’, असे म्हणतात. (चित्र ३ पहा.)

८. सपाट तळपायाविषयीच्या संशोधनावरून लक्षात आलेली सूत्रे

अ. आंतरराष्ट्रीय, तसेच भारतीय संशोधनानुसार तळपाय सपाट असल्यास चालण्याची पद्धत पालटते आणि गुडघा, कंबर अन् घोटा यांवर असामान्य ताण पडतो. त्यामुळे ‘गुडघेदुखी, अस्थि-संधिवात (Osteoarthritis) अन् वारंवार घोटा मुरगळणे’, यांचा धोका वाढतो.

आ. ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आय.सी.एम्.आर्.)’ यांच्याशी संबंधित अभ्यासामध्ये हेही आढळले आहे की, योग्य वेळेवर भौतिकोपचार (फिजिओथेरपी), विशिष्ट व्यायाम अन् योग्य पादत्राणे वापरल्यास सपाट तळपायांचे दुष्परिणाम अत्यल्प करता येतात, म्हणजेच सपाट तळपाय ही कायमची अपरिवर्तनीय समस्या नसून योग्य उपचारांनी ती नियंत्रणात ठेवता येते.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कु. वैदेही शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (२२.१२.२०२५)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1010780.html

वाचकांना सूचना

‘निरोगी जीवनासाठी व्यायाम’ या सदरावर आधारित  लवकरच ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.

 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा