सपाट तळपाय (Flat Foot) : एक दुर्लक्षित; पण गंभीर समस्या ! तळपाय सपाट होण्यामागील कारणे !

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक ११८

‘आपण दिवसभर ‘उभे रहाणे, धावणे, चालणे’ इत्यादी कृती करत असतो. त्यामुळे आपल्या संपूर्ण शरिराचा भार पायांवर, विशेषतः तळपायांवर अधिक येत असतो. ‘शरिरात कुठेही छोटासा जरी पालट झाला, तरी त्याचा परिणाम शरिरात वेगवेगळ्या ठिकाणी जाणवतो’, हे आपण आधीच्या लेखमालिकांतून जाणून घेतले आहे, उदा. भ्रमणभाषचा अधिक वापर केल्याने किंवा दिवसभर संगणक वापरल्याने खांदे पुढे येतात. खांदे पुढे आले की, मानेवर ताण येतो आणि मानदुखी चालू होते. आपण अयोग्य पद्धतीने बसलो की, कमरेचा बाक वाढतो आणि कंबरदुखी चालू होते. याच तत्त्वावर आधारित आपल्या तळपायाची कमान (foot arch) न्यून किंवा नाहीशी होते (तळपाय भूमीला पूर्ण टेकतो). त्याला वैद्यकीय (मेडिकल) भाषेत Pes Planus (Flat Foot) आणि मराठीत ‘सपाट तळपाय’, असे म्हणतात. ‘सपाट तळपायाची समस्या कशी उद्भवते ? तळपाय सपाट झाल्यावर शरिरावर नेमका कोणता परिणाम होतो ? आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे सपाट झालेला तळपाय परत सुधारू शकतो का ?’, हे आपण आजच्या लेखातून समजून घेणार आहोत.

(भाग १)

प्रतीकात्मक छायाचित्र

१. पायाची रचना

आपल्या पायामध्ये २६ हाडे, ३३ सांधे आणि १०० पेक्षा अधिक स्नायू अन् अस्थिबंध (लिगामेंट्स  – Ligaments) असतात. या सर्व रचना मिळून पायात एक नैसर्गिक कमान (Arch) सिद्ध होते. पायाच्या कमानी ३ प्रकारच्या असतात. (चित्र १ पहा)

अ. आतील कमान (Medial Arch)

आ. बाहेरील कमान (Lateral Arch)

इ. आडवी कमान (Transverse Arch)

१ अ. तळपाय सपाट कसा होतो ? : या कमानी शरिराचे वजन योग्य प्रकारे वाटून घेतात आणि चालतांना लागणारे धक्के शोषून घेतात. जेव्हा तळपायाची आतील कमान न्यून किंवा नाहीशी होते (तळपाय भूमीला पूर्ण टेकतो), तेव्हा तो तळपाय सपाट बनतो. (चित्र २ पहा)

२. सपाट तळपायाचे प्रकार

२ अ. लवचिक सपाट तळपाय (Flexible Flat Foot) : उभे राहिल्यावर कमान दिसत नाही; पण बसल्यावर किंवा बोटांवर उभे राहिल्यावर ती दिसते. हे प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळते.

२ आ. कडक सपाट तळपाय (Rigid Flat Foot) : कुठल्याही स्थितीत, म्हणजे बसल्यावर, उभे राहिल्यावर किंवा बोटांवर उभे राहिल्यावरही कमान दिसत नाही. मुले किंवा प्रौढ यांमध्येही हे होऊ शकते. हा अधिक गंभीर प्रकार मानला जातो.

३. ‘तळपाय सपाट आहे का ?’, हे कसे ओळखावे ?

घरच्या घरी करता येऊ शकणारी एक चाचणी पुढे दिली आहे. (चित्र ३ पहा)

अ. पाय पाण्यात ओला करावा.

आ. त्यानंतर ओला केलेला पाय कागद किंवा भूमी यांवर ठेवा. कागद किंवा भूमी यांवर ठसा उमटतो. जर ठशामध्ये पूर्ण तळपाय दिसत असेल, तर तो ‘सपाट तळपाय’ असण्याची शक्यता अधिक असते.

४. तळपाय सपा‌‌ट होण्याची इतर काही लक्षणे

अ. घोटा (Ankle) आतल्या बाजूला वळलेला दिसणे (चित्र ४ पहा)

आ. बूट आतल्या बाजूने अधिक झिजणे

इ. ‘उभे राहिल्यावर पाय लवकर थकणे, चालतांना पाय जड वाटणे किंवा असमतोल जाणवणे’, असे त्रास होणे 

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

५. तळपाय सपा‍ट होण्यामागील काही कारणे

५ अ. स्थूलता (Obesity) : शरिराचे अतिरिक्त वजन पायांच्या कमानीवर सतत ताण निर्माण करते. त्यामुळे हळूहळू तळपायाची आतील कमान न्यून किंवा नाहीशी होते (तळपाय भूमीला पूर्ण टेकतो) आणि तळपाय सपाट होऊ लागतात.

५ आ. गर्भधारणा (Pregnancy) : गर्भधारणेत वजन वाढते आणि शरिरातील संप्रेरके (hormones) यांमुळे स्नायू अन् अस्थिबंध (लिगामेंट्स) सैल होतात. त्यामुळे तळपायाची कमान दुर्बल होऊन तो सपा‌‌ट होऊ शकतो.

५ इ. मधुमेह (Diabetes) : मधुमेहामुळे नसा आणि स्नायू यांवर परिणाम होतो. पायातील संवेदना आणि शक्ती न्यून होते. त्यामुळे कमान टिकवून ठेवणारे स्नायू आणि अस्थिबंध दुर्बल होतात.

५ ई. पायाला इजा होणे : ‘घोटा किंवा पाय यांना आलेली मुरगळ, अस्थिभंग (फ्रॅक्चर) किंवा अस्थिबंधाला झालेली इजा’, यांमुळे पायाचा आधार दुर्बल होत जातो आणि तळपाय सपा‌‌ट होऊ शकतो.

५ उ. अनुवांशिक कारणे (Genetic Factor) : जर आई-वडिलांचे तळपाय सपाट असतील, तर मुलांमध्येही होण्याची शक्यता अधिक असते; कारण पायांची रचना अनुवांशिक असू शकते.

५ ऊ. तळपायांची कमान सांभाळणारा स्नायूबंध दुर्बल होणे : सपाट तळपायांमध्ये पायाची कमान टिकवणारा आतील स्नायूबंध सतत ताण असल्यामुळे दुर्बल होतो. त्यामुळे ‘चालणे, धावणे आणि जिने चढणे’, यांसारख्या कृती करतांना वेदना जाणवतात. या त्रासावर वेळेत उपचार न झाल्यास तळपाय अधिक सपाट होत जातो आणि पुढे गुडघेदुखी अन् कंबरदुखीही चालू होऊ शकते.

५ ए. लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती

५ ए १. लहान मुले : लहान मुलांमध्ये जन्मतः तळपायांची कमान पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे ५ ते ८ वर्षांपर्यंतच्या अनेक मुलांमध्ये तळपाय सपाट दिसण्याची शक्यता असते, जो बहुतेक वेळा नैसर्गिक असतो. लहान मुले ‘चालणे, धावणे आणि खेळणे’, यांसारख्या कृती करू लागल्यावर त्यांच्या पायांचे स्नायू सक्रीय होऊ लागतात. त्यानंतर हळूहळू त्यांच्या तळपायांमध्ये कमान सिद्ध होत जाते.

सध्याच्या काळात मुले ‘भूमीवर अनवाणी चालणे किंवा धावणे’, यांसारख्या कृती अल्प प्रमाणात करतात. मुले दिवसभर शाळेत आणि खेळतांना सतत बूट घालतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांच्या पायांच्या स्नायूंनी जितके काम करायला हवे, तितके ते होत नाही. परिणामी चालणे आणि फिरणे यांमुळे जी कमान विकसित व्हायला हवी, ती पुरेशी सिद्ध होत नाही. यामुळे मुलांना मैदानात आणि शक्य असेल, तिथे अनवाणी चालायला प्रोत्साहन द्यायला हवे. जर ८ वर्षांनंतरही ‘तळपाय पूर्णपणे सपाट रहाणे, चालतांना थकवा, वेदना किंवा अडचण जाणवणे’, या समस्या असतील, तर आधुनिक वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

५ ए २. वयोवृद्ध व्यक्ती : वृद्धांमध्ये वय वाढल्याने पायांचे स्नायू आणि स्नायूबंध दुर्बल होऊ लागतात. परिणामी तळपायाची आतील कमान न्यून किंवा नाहीशी होते आणि सपाट तळपाय होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे लहान वय आणि वृद्धावस्था या दोन्ही टप्प्यांमध्ये तळपाय सपाट होण्याची शक्यता अधिक असते.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कु. वैदेही शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (२२.१२.२०२५)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005794.html

वाचकांना सूचना

‘निरोगी जीवनासाठी व्यायाम’ या सदरावर आधारित लवकरच ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.

 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा