‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ. 

(लेखांक १३)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/997945.html 

कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग आचरणारे महान भारतीय संत !

यापूर्वीच्या लेखांतून आपण देवीदेवतांपासून ऋषिमुनींपर्यंतच्या संगीताच्या दैवी परंपरेविषयी जाणून घेतले. याच परंपरेतील पुढील पुष्प, म्हणजे ईश्वराचे देहधारी रूप असलेले संत ! संत नामदेव महाराज म्हणतात, ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।।’, म्हणजे ‘कीर्तनात रंगून जाऊया आणि त्या माध्यमातून संतांचा उपदेश संपूर्ण जगभर पोचवूया.’ संतांचे अभंग, ओव्या, दोहे, अशा प्रकारच्या ईश्वरभक्तीत डुंबवणार्‍या रचनांवर समाजच काय, तर ईश्वरही डोलतो आणि नाचतो ! ही किमया आहे संतांनी रचलेल्या काव्यांची आणि गायन अन् नर्तन या माध्यमांतून ईश्वराला आळवणार्‍या संत-विभूतींची !

भारत ही संतांची भूमी आहे. संगीताचे माध्यम वापरून संतांनी स्वतः ईश्वराची आराधना तर केलीच; परंतु त्यांनी संगीत आणि नृत्य यांच्या माध्यमातून समाजालाही भगवद्भक्तीचा मार्ग दाखवला. भारतात संगीतातून ईश्वरप्राप्ती करणारी अनेक संतांची मांदियाळी आहे, उदा. महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत कान्होपात्रा इत्यादी; राजस्थानमधील संत मीराबाई, उत्तरप्रदेशातील स्वामी हरिदास आणि संत सूरदास; गुजरातमधील संत नरसी मेहता; बंगालमधील संत चैतन्य महाप्रभु अन् स्वामी विवेकानंद, कर्नाटकातील संत पुरंदरदास, तसेच तमिळनाडूतील संत त्यागराज, संत आंडाळ इत्यादी.

या लेखमालेतून आपण संतांनी केलेल्या संगीत-साधनेविषयी जाणून घेत आहोत.

आजच्या लेखातून आपण उत्तरप्रदेश, राजस्थान आणि दक्षिण भारत येथील काही संतांनी केलेल्या संगीत-साधनेविषयी जाणून घेणार आहोत.

(भाग २)

४. उत्तरप्रदेशातील संत

४ अ. अंतर्चक्षूंनी गायनातून श्रीकृष्णाला अनुभवणारे संत सूरदास ! : ‘सूरदास हे जन्मांध होते; परंतु ते संगीतातून भक्ती करणारे एक महान कवी, गायक आणि कृष्णभक्त होते. पुष्टीमार्गाचे (टीप १) संस्थापक वल्लभाचार्य यांनी त्यांना पुष्टीमार्गाची दीक्षा दिली आणि श्रीकृष्णभक्तीचा उपदेश केला. वल्लभाचार्यांनी त्यांना कृष्णभक्तीपर पदे रचण्याची आज्ञा दिली.

टीप १ – पुष्टीमार्ग : हा एक प्रमुख वैष्णव भक्तीमार्गी संप्रदाय आहे. त्यात कृष्ण ही सर्वोच्च देवता आणि सर्व गोष्टींचे उगमस्थान मानले जाते.

सूरदास स्थुलातून अंध असूनही अंतर्दृष्टीने त्यांनी सहस्रावधी श्रीकृष्णभक्तीपर पदे आणि रचना रचल्या. या रचनांमध्ये श्रीकृष्णलीला, गोपींची भक्ती, कृष्णभक्ती इत्यादी प्राधान्याने दिसून येतात. सूरदासांचे गीतमाधुर्य आणि गानकौशल्य यांनी सहस्रावधी कृष्णभक्तांना मंत्रमुग्ध केले. सूरदासांसाठी संगीत हे कृष्णप्रेम व्यक्त करण्याचे साधन होते. त्यांच्या भावपूर्ण गायनामुळे त्यांचे गायन ऐकण्यासाठी साक्षात् भगवान श्रीकृष्ण येत असे. सूरदासांच्या पदांनी भक्तीसंगीताला समृद्ध केले. संत सूरदासांच्या रचनांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. मैं नहीं माखन खायो । (अर्थ : भगवान श्रीकृष्ण माता यशोदेला म्हणतो, ‘मी लोणी खाल्ले नाही.’)

२. प्रभुजी मेरे अवगुण चित ना धरो ।
समदर्शी है नाम तुम्हारो सोई पार करो ।।

अर्थ : संत सूरदास देवाला सांगतात, ‘देवा, माझे अवगुण बघू नकोस. तुझे नाव ‘समदर्शी (सर्वांकडे समान दृष्टीने पहाणारा)’ आहे. त्यामुळे तू आम्हाला भवसागरातून पार कर.’

४ आ. गायनाराधनेतून श्री बांकेबिहारीला वृंदावनात प्रगट करणारे संत स्वामी हरिदास ! : श्री बांकेबिहारीला (भगवान श्रीकृष्णाला) वृंदावनात प्रगट करणारे, तसेच कृष्णाच्या अपार भक्तीचे आणि गायनाराधनेचे एक मूर्तीमंत रूप, म्हणजे वृंदावनातील संत स्वामी हरिदास !

स्वामी हरिदास हे गायनासाठी प्रसिद्ध होते. प्रख्यात गायक तानसेन, बैजू बावरा इत्यादी त्यांचे गायनातील उच्च शिष्य होते. वृंदावनातील निधीवन येथे श्रीकृष्ण आणि गोपी यांनी रासलीला केली. स्वामी हरिदास यांनी साधनेसाठी हे ठिकाण निवडले. तेथे राहून ते गायनाच्या माध्यमातून श्री बांकेबिहारीची साधना करू लागले. त्यांचे गायन दैवी आणि अलौकिक होते. ते केवळ परमेश्वरासाठी गात असत. त्यांचे गायन ‘धृपद’ शैलीचे होते. धृपद गायन परंपरेचे ते प्रमुख संत मानले जातात. त्यामुळेच स्वामी हरिदासांना हिंदुस्थानी संगीताच्या गुरुपरंपरेत महत्त्वाचे स्थान आहे.

एकदा अकबर बादशहाच्या मनात तानसेनच्या गुरूंचे, म्हणजे स्वामी हरिदासांचे गायन ऐकण्याची इच्छा उत्पन्न झाली. तानसेन बादशहाला स्वामी हरिदासांच्या आश्रमात घेऊन गेला. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने गायन करणार्‍या स्वामी हरिदासांचे गायन ऐकून अकबर बादशहाची भावसमाधी लागली होती. अशी दिव्यता त्यांच्या भक्तीपूर्ण गायनात होती.

स्वामी हरिदास यांनी संगीताच्या माध्यमातून भक्तीची गोडी जगभर पसरवली. त्यांची भजने आणि गीते श्रोत्यांच्या हृदयाला कृष्णभक्तीच्या डोहात डुंबवणारी होते. त्यांची भजने व्रज भाषेतील आहेत.

५. भजनांच्या माध्यमातून कृष्णभक्तीत रममाण होणार्‍या राजस्थानमधील संत मीराबाई !

सौ. अनघा जोशी

मेवाड (राजस्थान) येथील संत मीराबाई यांची लहानपणापासून कृष्णावर असलेली भक्ती सर्वपरिचित आहे. त्यांनी श्रीकृष्णाची अनेक भजने रचली आहेत. आजही त्यांची भजने गाणारा कृष्णमय होऊन जातो. संत मीराबाई या संगीत तज्ञही होत्या. त्यांनी ‘मीरा मल्हार’, ‘मीरा सारंग’ इत्यादी रागांची निर्मिती केली.

एकदा मीराबाई भक्तीत रममाण होऊन श्रीकृष्णाचे भजन गात होत्या. त्या वेळी तेथून संगीतातील काही पंडित जात होते. त्यांनी मीराबाईंचे गायन ऐकून त्यांना सुरात गाण्यास सुचवले. त्या वेळी संत मीराबाई त्यांना म्हणाल्या, ‘‘मी सुरात नाही; पण अनुरागात गात आहे’’, म्हणजेच भगवंतासाठी गायन करतांना सुरापेक्षा ते अनुरागात गाणे (ईश्वराच्या प्रेमभक्तीत गाणे) अधिक श्रेष्ठ आहे.

‘भगवंताच्या भक्तीत गायन कसे करावे ?’, याविषयी संत मीराबाईंनी पंडितांना केलेला उपदेश साधक-कलाकारांसाठी मार्गदर्शक आहे.

६. दक्षिण भारतातील संत

६ अ. संगीताच्या माध्यमातून विठ्ठलाची करुणा भाकणारे ‘कर्नाटक संगीताचे पितामह’ – संत पुरंदरदास ! : कर्नाटकमधील संत पुरंदरदास यांनी कन्नड, संस्कृत आणि संगीत या विषयांचे शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले होते. त्यांना ‘कर्नाटक संगीताचे पितामह’, असे गौरवले जाते. त्यांच्या भक्तीमय रचनांमुळे आणि शिस्तबद्ध संगीत शिक्षणपद्धतीमुळे कर्नाटक संगीतात एक नवा अध्याय चालू झाला. त्यांनी ४ लाखांहून अधिक ईश्वरभक्तीपर पदे रचली आहेत.

संत पुरंदरदास हे केवळ महान संगीतकार नव्हते, तर संगीताला साधनेचे सर्वोच्च माध्यम बनवणारे संत होते. त्यांच्या रचनांमध्ये विद्वत्तेचा दिखावा नसून नम्र भक्ताची हाक आहे. त्यांच्या एका पदामध्ये ते पांडुरंगाला आर्ततेने म्हणतात, ‘हे विठ्ठला, ‘माझे गाणे सुंदर आहे कि नाही ?’, हे मला ठाऊक नाही; पण माझे हृदय मात्र तुझ्यापर्यंत पोचू दे.’ संत पुरंदरदास संगीत-आराधनेने विठ्ठलाची करुणा भाकतांना म्हणतात, ‘स्वरांनी मला तुझ्या दारापर्यंत नेले. आता तूच मला आत घे.’

महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणेच संत पुरंदरदास यांनी कर्नाटकात संगीत, भजन अन् कीर्तन या माध्यमांतून भक्ती परंपरेचा प्रसार केला.

६ आ. भावपूर्ण गायनाने श्रीरामाची भक्ती करणारे संत त्यागराज ! : दक्षिणेकडील संगीतातील संतगणांत श्रेष्ठ असलेले संत, म्हणजे संत त्यागराज ! तमिळनाडूमधील त्यागराज हे केवळ एक महान संगीतकार नव्हते, तर त्यांच्यामध्ये भक्ती आणि सूर यांचा अद्वितीय संगम होता. त्यांच्या हृदयात रामभक्तीची ज्योत अखंड प्रज्वलित होती आणि त्या ज्योतीतूनच स्वरांची निर्मळ गंगा अवतरली.

एकदा तंजावुर (तमिळनाडू) येथील सरोबोजी महाराज याच्या दरबारात संत त्यागराज यांच्या रचना त्यांचे गुरु वेंकटरमणय्या यांनी गायल्या. त्या रचना राजाला आवडल्याने त्याने संत त्यागराजांसाठी ‘राजगायक’ म्हणून नेमणूक, धन आणि उपहार पाठवले. त्या वेळी संत त्यागराजांनी ‘मी ज्या जिभेने श्रीरामाची स्तुती करतो, त्या जिभेने मानवाची (राजाची) स्तुती कधीही करू शकत नाही’, असा निरोप देऊन ‘राजगायक’ पद आणि धन नाकारले. यातून संत त्यागराज यांच्या अनासक्त वृत्तीचे दर्शन घडते.

एकदा त्यागराज यांच्या भावाने रागावून त्यांची श्रीरामाची मूर्ती नदीत विसर्जित केली. तेव्हा संत त्यागराज श्रीराममूर्तीच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले. या कालावधीत त्यागराज यांनी विविध भक्तीगीते रचली. ३ मासांनंतर एकदा एका रात्री संत त्यागराज झोपले असता एक आकाशवाणी झाली. प्रभु श्रीराम त्यागराजांना म्हणाला, ‘त्यागराज, तू मला तीन मासांपासून शोधत आहेस. तीन मासांत तू ३० गाणी गायलीस. मला तुझी भावपूर्ण गाणी ऐकण्याची इच्छा होती. त्यासाठी मी ही लीला केली. आता माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. मी कावेरी नदीत आहे. इकडे ये आणि मला लवकर घेऊन जा.’ अशा प्रकारे संत त्यागराज यांना ती मूर्ती ३ मासांनी मिळाली.

संत त्यागराज यांच्यासाठी संगीत हे करमणुकीचे साधन नव्हते, तर ईश्वराशी संवाद साधण्याचे एक पवित्र माध्यम होते. त्यांच्यासाठी तो श्रीरामभक्तीचा मार्ग होता. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये (टीप २) रामभक्तीचा सुगंध दरवळतो. त्यांचे गायन हे दिव्यत्वाची अनुभूती देणारे होते. त्यांच्या भक्तीने प्रत्यक्ष श्रीराम आणि माता सीता यांनी त्यांना दर्शन दिले.

टीप २ – कृती : कर्नाटक शास्त्रीय संगीतातील गीत, राग आणि ताल यांचा समुच्चय असलेली भक्तीपूर्ण रचना.

६ इ. इतर संत : संत त्यागराज यांच्याप्रमाणेच संगीतातून भगवंताला आळवणारे अनेक संत दक्षिण भारतात होऊन गेले, उदा. तिरुपति बालाजीचे परम भक्त संत अण्णामलाई, श्रीकृष्णभक्त संत कनकदास, श्रीरंगनाथावर भक्तीपूर्ण प्रेमकाव्य रचून गाणार्‍या संत आंडाळ.

संतांनी कलेतून केलेली भक्ती साधक-कलाकारांसाठी आदर्श आहे. संतांच्या साधनेमुळेच त्यांची नावे अजरामर झाली आहेत. कलाकाराने केवळ कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवली, तर काळाच्या ओघात समाज त्याला विसरतो; पण भगवद्भक्तीमुळे संत मात्र समाजाच्या कायमचे स्मरणात राहिले आहेत. या लेखातून आपल्या लक्षात येते, ‘कलाकाराने तत्कालिक प्रसिद्धी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत न रहाता कलेतून स्वतःला भगवद्भक्तीमध्ये विसरण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे भगवंतच त्याच्या भक्ताची कीर्ती अजरामर करतो.’                                                            

(समाप्त)

– सौ. अनघा जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (११.१.२०२६)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८

ईमेल : [email protected]


लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005068.html