हिंदुविरोधी व्यवस्थेचा पीडित : समीर गायकवाड !

‘सरकार किसीकी भी हो, व्यवस्था तो हमारी है’ (सरकार कुणाचेही असू दे, प्रशासन आमचे आहे), हा केवळ ‘चित्रपट संवाद’ नाही, तर ते आजचे विदारक वास्तव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७८ वर्षांत शासनकर्त्यांनी निर्माण केलेली ही व्यवस्था इतकी बुरसटलेली आहे की, सत्ता कुणाचीही असो, व्यवस्थेचा ‘हिंदुविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ चेहरा सहसा पालटत नाही. याच व्यवस्थेत देशविरोधी घोषणा देणार्‍यांना आणि नक्षलवाद्यांना ‘विचारवंत’ म्हणून डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे राष्ट्रहिताचा विचार करणार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. याच पक्षपाती व्यवस्थेची दिरंगाई आणि जाच यांचे पीडित ठरले आहेत, सनातन संस्थेचे निष्पाप साधक समीर गायकवाड ! समीर यांचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून एक निर्दोष जीव जो या निष्ठूर व्यवस्थेने अन्याय केलेला पीडित आहे.

१. समीर यांच्या मृत्यूला कारणीभूत कोण ?

गेल्या दशकात डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, कथित पत्रकार गौरी लंकेश या हत्या प्रकरणांची प्रचंड चर्चा झाली. माध्यमांनी या व्यक्तींना अवास्तव प्रसिद्धी देऊन मोठे केले; परंतु या हत्यांची चौकशी निष्पक्षपणे करण्याऐवजी एका विशिष्ट विचारसरणीला लक्ष्य करण्यासाठी आणि ‘भगव्या आतंकवादा’चे खोटे कथानक (नॅरेटिव्ह) रुजवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांचा वापर झाला. अन्वेषणातील त्रुटी, म्हणजे हत्येमागे आर्थिक वाद, कौटुंबिक कलह, बाईचे प्रकरण किंवा व्यावसायिक शत्रुत्व, असे अनेक पैलू असू शकतात; मात्र अन्वेषण यंत्रणांनी केवळ ‘सनातन संस्थे’ला लक्ष्य करून चारही हत्यांची सखोल चौकशी न करता ‘कॉपी पेस्ट’ (नक्कल) पद्धतीचे आरोपपत्र प्रत्येक ठिकाणी प्रविष्ट (दाखल) केले.

श्री. चेतन राजहंस

समीर यांना वर्ष २०१५ मध्ये कोल्हापूरमधील कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. ‘एका गाडीवरून आलेल्या २ मारेकर्‍यांनी हत्या केली. त्यातील एक समीर गायकवाड आहे’, असे अन्वेषण यंत्रणांनी सांगितले. वास्तविक हत्येच्या दिवशी समीर गायकवाड हे पालघरला होते. चौकशीच्या कालावधीत पोलिसांनाही त्यांच्या ‘कॉल डिटेल्स’द्वारे (भ्रमणभाष संपर्कांच्या माहितीवरून) आढळून आले की, पानसरेंच्या हत्येच्या दिवशी समीर गायकवाड पालघर येथे होते; पण कुणाच्या दबावामुळे त्यांनी ते न्यायालयासमोर आणले नाही, याचे अन्वेषण व्हायला हवे !

उलट एक शाळकरी मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून आणला, त्याने समीर यांना ओळखले; पण वर्षभरातच ‘समीर खुनी नसून ते २ खुनी भलतेच आहेत’, असे घोषित केले. काही मासांनी पुन्हा नवीन २ नावे समोर आणली. मग दुसरे २ जर हत्यारे असतील, तर पहिल्या संशयितावरचे आरोप रहित केले पाहिजे होते; पण ते हेतूतः केले गेले नाहीत. याचा अर्थ ‘समीर निर्दोष असल्याचे ठाऊक असल्याने त्यांचा खटला चालवायचा नाही आणि दुसरीकडे त्यांचे नाव असलेले पहिले दोषारोपपत्र कायम ठेवून त्यांचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त करून छळही करायचा’, ही आसुरी प्रवृत्ती आहे.

या हेतूपुरस्सर आणि खोट्या अन्वेषणामुळे समीर गायकवाड यांच्यासारख्या पापभिरू साधकाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. ‘खोट्या आरोपांमुळे झालेली अपकीर्ती आणि न्यायालयीन प्रक्रियेचा ताण यांमुळे सार्वजनिक अन् जीवन जगण्यात येत असलेल्या अडचणी यांमुळे समीर प्रचंड ताणाखाली होते. परिणामी समीर यांना हृदयविकाराचा झटका आला’, असे त्याचे कुटुंबीय ठामपणे सांगत आहेत. हा नैसर्गिक मृत्यू नसून हिंदुविरोधी व्यवस्था, साम्यवादी विचारसरणीच्या टोळ्या आणि अन्वेषण यंत्रणा यांनी केलेली हत्या आहे.

२. निर्दोषत्वाचा सर्वांत मोठा पुरावा : ‘खटला चालवा’ ही मागणी !

समीर गायकवाड यांचे निर्दोषत्व सिद्ध करणारा सर्वांत मोठा पुरावा, म्हणजे त्यांची आणि त्यांच्या अधिवक्त्यांची भूमिका. सर्वसाधारणपणे गुन्हेगार खटला लांबवण्याचा प्रयत्न करतात; मात्र या प्रकरणात समीर गायकवाड यांनी स्वतःहून ‘माझा खटला लवकरात लवकर जलद गती न्यायालयात चालवा’, अशी लेखी मागणी केली होती. दुसरीकडे पानसरे कुटुंबीय आणि अन्वेषण यंत्रणा मात्र खटला रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. अजमल कसाबसारख्या नराधम आतंकवाद्याला सरकारी व्ययाने अधिवक्ता मिळतो; मात्र केवळ एक हिंदु, सनातन संस्थेचा साधक आणि गरीब शेतकर्‍याचा मुलगा आहे; म्हणून समीर यांना अधिवक्ता मिळू दिला जात नाही. आतंकवादाच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेल्या आतंकवाद्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय उघडते; पण राज्यघटनेच्या गप्पा मारणारे समीर यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करतात, ही व्यवस्थेची थट्टा आहे.

हिंदुविरोधी खोटे कथानक (नॅरेटिव्ह)

३. खोटे कथानक (नॅरेटिव्ह) हाणून पाडा !

आजच्या व्यवस्थेत ‘हाऊस अरेस्ट’चे (घरात कैदेत ठेवणे) कोणतेही प्रावधान नाही; पण तरीही पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणार्‍या शहरी नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांना ‘हाऊस अरेस्ट’ करण्याचे फर्मान सोडले जाते. कोरेगाव भीमा  प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर न्यायव्यवस्थेकडून शोक व्यक्त होतो; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त होऊन भाजप सरकारवर टीका केली, तसेच थेट संयुक्त राष्ट्रांकडून शोक व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले जाते. यातून राष्ट्रविरोधकांची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) किती मोठी आहे, हे समजते. ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणारा उमर खालिद याची कारागृहातून सुटका व्हावी, यासाठी न्यूयॉर्कचे महापौर ममदानी पत्र लिहितात. समीर गायकवाड हे या हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’चे पीडित ठरले आहेत. त्यांच्यासाठी कोण पत्र लिहिल का ? कोण आवाज उठवणार का ?, हा प्रश्न आहे.

हे वाचा → ♦ पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन !

संपादकीय : सतर्कता आवश्यक !

जर भविष्यात असे पीडित होऊ द्यायचे नसतील, तर देश आणि धर्म यांच्या रक्षणाची तळमळ असणार्‍यांनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता आहे. केवळ ‘फील गुड’ अर्थात् ‘सर्व काही छान चालले आहे’, या भ्रमात न रहाता या व्यवस्थेतील साम्यवादी विचारसरणीच्या आणि तथाकथित पुरोगाम्यांचा ढोंगीपणा उघड करणे अन् हिंदुविरोधी अपप्रचाराच्या विरोधात सक्षमपणे लढा देणे, हीच समीर गायकवाड यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल !

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (२२.१.२०२६)