संपादकीय : सतर्कता आवश्यक !

सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड

२० जानेवारीला सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांचा अवघ्या ४३ व्या वर्षी अकस्मात् मृत्यू झाला. एकीकडे साम्यवादी नि हिंदुविरोधी प्रसारमाध्यमांनी समीर यांना ‘पानसरे हत्याकांडातील प्रमुख आरोपीचा मृत्यू’ असे मथळे देऊन त्यांच्या मृत्यूनंतरही ‘मिडिया ट्रायल’द्वारे ‘हिंदुफोबिया’चा कंड शमवण्यात धन्यता मानली. ही चिखलफेक समीर यांच्या केवळ मानवाधिकारांचे उल्लंघन नाही, तर त्यांचा अमानवीय छळच होय. दुसरीकडे सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांना अभिमानाने पाठिंबा घोषित करून साम्यवादी, तसेच संपूर्ण व्यवस्था त्यांच्या मृत्यूसाठी कशा प्रकारे कारणीभूत आहे, हे वस्तूनिष्ठ परिस्थिती मांडून लक्षात आणून दिले. ‘समीर यांना आधी आरोपी म्हणून अटक करायची, त्यांना १९ महिने कारागृहात डांबून छळ करायचा आणि समाजात त्यांची टोकाची अपकीर्ती करायची’, असा हा गलिच्छ प्रकार. त्यामुळे समीर यांचा मृत्यू नव्हे, तर ‘व्यवस्थेने केलेली ही हत्या’ आहे, असे म्हणावे लागेल. ‘निर्दाेष समीर गायकवाड यांच्या प्रकरणातून हिंदूसंघटनाची किती आवश्यकता आहे’, हे लक्षात येऊ शकेल.

डोळसपणा नाही !

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या व्यापक संघटनासाठी प्रयत्न करत असतांना सतर्कता पाळणेही तेवढीच आवश्यक आहे. मध्यंतरी एक अशी घटना घडली, ज्यामध्ये राष्ट्रप्रेमी शक्तीच एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. तथापि ‘राष्ट्रहितार्थ अशा चुका होता कामा नयेत’, हे जगासमोर योग्य प्रकारे आणणे हा आमचा धर्म होय, ही आमची भूमिका. त्यामुळे व्यापक राष्ट्रहितासाठी या घटनेवर भाष्य झाले पाहिजे. झाले असे की, भारतातील एका शहरात काही राष्ट्रवाद्यांनी एकत्र येऊन एका वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला एका प्रखर राष्ट्रनिष्ठ लेखकाला निमंत्रित करण्यात आले. लेखकाने एका इस्लामी आक्रमकाचा खरा चेहरा दर्शवणारे एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकावर या कार्यक्रमात एक परिसंवाद होणार होता. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ‘आयोजक संघटना ही साम्यवादी ‘इकोसिस्टम’चा भाग आहे’, असा दावा स्थानिक राष्ट्रप्रेमींकडून होत आला आहे. १-२ वर्षांपूर्वी संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रघातकी मानसिकतेच्या एका लेखकाला बोलावले होते. त्यामुळे तेव्हापासून ही संघटना राष्ट्रप्रेमींच्या रोषाचे कारण ठरली. या संघटनेला होणार्‍या विरोधाला आणखी एक कारण असे की, तिला शहरातील एक प्रतिष्ठित सरकारी सभागृह वापरण्याची सरकारने अनुमती दिली आहे. त्या सभागृहात अन्य कुणा खासगी संघटनेला कार्यक्रम घेण्याची अनुमती नसते; परंतु या संघटनेला तो नियम लागू नाही. त्यामुळेसुद्धा संघटनेला होणारा विरोध वाढत आहे. आता या संघटनेचा विचार करता, यातील काही जण प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे ही संघटना साम्यवादी आहे किंवा नाही, हा संशोधनाचा विषय असू शकतो. या पार्श्वभूमीवर यंदा जो कार्यक्रम होणार होता, त्याला ज्या राष्ट्रप्रेमी लेखकाला निमंत्रित करण्यात आले होते, त्याच्या पुस्तकाला तीव्र विरोध करण्यात आला. एका राष्ट्रवादी नियतकालिकाने कार्यक्रमाच्या विरोधात वृत्त प्रसारित करून या लेखकाच्या पुस्तकाला विरोध केला. ‘इस्लामी आक्रमकाच्या इतिहासाला पुन्हा कशाला उगाळायचे ?’ ‘त्याची काय आवश्यकता आहे ?’, असा त्या वृत्ताचा आशय. मुळात संघटनेला विरोध करण्यासाठी कार्यक्रमाच्या रूपरेषेतील कोणत्यातरी भागाला विरोध करणे क्रमप्राप्त असल्याचा बहुधा या दैनिकाने विचार करून राष्ट्रप्रेमी लेखकाच्या पुस्तकाला लक्ष्य केले. झाले. यावरून काही राष्ट्रवादी संघटनांनी मागचा-पुढचा विचार न करता सदर लेखक आणि त्यांचे पुस्तक यांना विरोध करण्यास आरंभले. विरोध हा डोळस का असला पाहिजे ?, हे या घटनेतून लक्षात येऊ शकेल. आपण ज्या लेखकाला विरोध करत आहोत, त्याचा इतिहास, त्याची विचारसरणी आदींचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते. अभ्यासांती सुनिश्चित केलेली भूमिका ही अचूक आणि राष्ट्रहिताचा विचार पुढे नेण्यासाठी सर्व अंगांनी परिणामकारक ठरू शकते. या अपेक्षित गोष्टींना फाटा देऊन राष्ट्रवादी संघटनांनी ‘लेखकाचा आणि त्याच्या पुस्तकावरील विषयाचा परिसंवाद रहित करा, अन्यथा कार्यक्रमच होऊ दिला जाणार नाही’, अशी भूमिका घेतली. विरोधाला व्यापक स्वरूप मिळाले. एवढे की, काही मंत्री, वरिष्ठ प्राध्यापक यांनीही राष्ट्रप्रेमींच्या मागणीचे उघड समर्थन केले. या सगळ्या प्रक्रियेत कुणाचाही हा विचार झाला नाही की, ‘आयोजक संघटनेला विरोध करण्याच्या नादात आपण आपल्याच एका राष्ट्रनिष्ठ योद्ध्याला दुखावत आहोत’; ‘त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही.’ शेवटी विरोधाची तीव्रता पहाता आयोजकांना लेखकाचा त्या विषयावरील परिसंवाद रहित करावा लागला.

एखादा तार्किक मनुष्य म्हणेल की, या सगळ्यासाठी त्या दैनिकाला दोषी ठरवले गेले पाहिजे. तसे पाहिले, तर हे काही अंशी सत्यही आहे. साम्यवादी संघटना समजून तिला विरोध करतांना कोणत्या सूत्राला धरून विरोध झाला, तर तो वैचारिक ठरू शकतो, यावर त्या दैनिकाने विरोधाची दिशा ठरवायला हवी. तथापि एका दैनिकाच्या वृत्तावर आंधळेपणाने विश्वास ठेवून राष्ट्रवादी संघटनांनी राष्ट्रप्रेमी लेखकालाच विरोध करणे, हाही आत्मघाताचा प्रकार आहे.

संभाव्य धोके !

हे एवढ्यावरच थांबले नाही, तर राष्ट्रघातकी शक्तींनी या परिस्थितीचा अपलाभ उठवण्यास आरंभले. एका कट्टर राष्ट्रद्वेष्ट्या वृत्तसंकेतस्थळाने या घटनेची बातमी देऊन ‘राष्ट्रप्रेमीच राष्ट्रप्रेमींचे पाय कशा प्रकारे खेचत आहेत’, हे सांगण्याचा प्रयत्न चालवला. पीडित राष्ट्रप्रेमी लेखक संबंधित राष्ट्रवादी दैनिकाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे समजते. एका कुप्रसिद्ध राष्ट्रघातकी पत्रकाराला या विषयावर मुलाखत देऊन राष्ट्रप्रेमींमधील वैचारिक भेद शत्रूसमोर मांडून लेखक मोकळेही झाले आहेत. हा सर्व घटनाक्रम राष्ट्रप्रेमींना विचार करायला लावणारा आहे, तसेच हिंदुत्वनिष्ठांनीही याचा विचार करावा. आपल्यातील परिपक्वतेचे दर्शन घडून आगामी काळात सशक्त ‘राष्ट्रवादी इकोसिस्टम’द्वारे भारताचा उत्कर्ष साधता येईल. मुळात असा आत्मघात पुन्हा कधी कुठे घडू नये, एवढाच सांगण्याचा प्रामाणिक उद्देश !

राष्ट्रप्रेमींनो, राष्ट्रहितार्थ कृती करतांना सतर्कता बाळगणे, हे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !