Saraswati Puja Oppose : बंगालमध्ये ४ ठिकाणी वसंतपंचमीच्या दिवशी श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्याला तृणमूल काँग्रेसकडून विरोध

कोलकाता (बंगाल) : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशासित  बंगालमध्ये वार्षिक हिंदु पर्व असलेल्या सरस्वती पूजेत अनेक ठिकाणी अडथळे निर्माण करण्यात आले. २३ जानेवारी या दिवशी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कमरहाटी शहरात श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यात अडथळे आणण्यात आले.

मंदिराला कुलूप !

‘डीडी न्यूज बांग्ला’च्या वृत्तानुसार बेलघरिया सर्वजनिन श्री श्री दुर्गा चौक सोसायटीच्या मंदिराला तृणमूल काँग्रेसच्या एका गटाने कुलूप लावले. त्यामुळे स्थानिक हिंदु महिलांना श्री सरस्वतीदेवीची पूजा करता आली नाही. या वादावर अद्याप तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक तोडगा काढू शकलेले नाहीत. स्थानिक पोलिसांनी ‘दोन्ही गटांमध्ये सहमती होत नाही, तोपर्यंत कुलूप काढले जाणार नाही’, असे सांगत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. एका महिलेने सांगितले की, मंदिर सर्वांसाठी सामायिक पूजास्थळ असावे. एका कुलपाला दोन चाव्या असाव्यात, एक त्यांच्या कह्यात आणि एक आमच्या कह्यात. दुसर्‍या महिलेने सांगितले की, हे मंदिर कुणाच्याही वैयक्तिक मालकीचे नाही, तर सर्वांचे आहे.

ममता बॅनर्जी यांच्या महाविद्यालयात मुसलमान नेत्याकडून श्री सरस्वतीदेवीच्या पूजेला विरोध !

दक्षिण कोलकात्यातील सरकारी अनुदानित जोगेश चंद्र चौधरी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने श्री सरस्वतीदेवीची पूजा आयोजित केल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार त्या नेत्याचे नाव दाऊद आलम मोल्ला असे आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीने सांगितले की, दाऊद आलम मोल्ला बाहेर उभा असून त्याने तिला माझ्या विधी क्षेत्राच्या पदवी शिक्षणाची हानी करण्याची धमकी दिली. हे महाविद्यालय बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे शिक्षणसंस्थान आहे. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये श्री सरस्वतीदेवीची पूजा केल्यास विद्यार्थिनींना बलात्कार आणि हत्या करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

गटबाजीमुळे पूजा मंडप बंद !

२३ जानेवारी या दिवशी कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा महाविद्यालयात तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांमध्ये झटापट झाल्याने श्री सरस्वतीदेवीचे पूजा मंडप सोडून देण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच दिनहाटा पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी महाविद्यालयाच्या परिसरात पोचले. पूजेसाठी आलेल्या हिंदु भाविकांना जीवित आणि मालमत्ता यांच्या सुरक्षिततेसाठी तेथून पळ काढावा लागला. परिसरातील दृश्यांवरून तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी महाविद्यालयाचे रूपांतर रणांगणात केल्याचे दिसून आले.

मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने शाळेत पूजेला मनाई !

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासात शहरात हिंदु विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात श्री सरस्वतीदेवीची पूजा आयोजित करण्यास अनुमती देण्यात आली नाही. अहवालानुसार शाळेत ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी मुसलमान असल्याने ही अनुमती नाकारण्यात आली. समाजमाध्यमांवरील एका व्हिडिओत पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यापासून रोखतांना दिसतात. त्यानंतर हिंदु विद्यार्थ्यांना शाळेबाहेर पदपथावर पूजा करावी लागली. प्रदीप चटर्जी नावाच्या व्यक्तीने सांगितले की, शाळेत हिंदु अल्पसंख्यांक असल्याने येथे पूजा होऊ शकत नाही. बंगाल आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या परिस्थितीत भेद उरलेला नाही. पोलिसांनी श्री सरस्वतीदेवीची मूर्ती दरवाजाबाहेर काढली.

भाजपकडून तीव्र निषेध !

या घटनेचा भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी समाजमाध्यमांवर प्रश्न उपस्थित केला की, बंगाल आता बांगलादेश बनत आहे का ? हिंदु अल्पसंख्यांक झाले, तर त्यांच्याशी कसा व्यवहार होतो ?, हे या घटनेतून दिसून येते, असे त्यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका

यावरून ‘बंगाल दुसरा बांगलादेश बनला आहे’, हे पुन्हा स्पष्ट होते !