Islam Friendly Gym : केरळम्‌मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद

इस्लामी नियमांचा वापर

कोच्ची (केरळम्) – केरळम्‌मधील पलक्कड जिल्ह्यातील पुथुनगरम येथे एका व्यायामशाळेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्यायामशाळेला ‘इस्लाम-फ्रेंडली’ असे संबोधले जात आहे. ‘ही व्यायामशाळा इस्लाममधील नियमांनुसार चालवली जाईल’, अशी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामी नियमांनुसार प्रशिक्षण, लिंगाधारित विभागणी आणि वेशभूषा लागू असणार आहे. अनेकांनी या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या व्यायामशाळेचा विज्ञापनाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात याचे मालक नवाझ मुथू टी यांनी म्हटले आहे की, या व्यायामशाळेत मोठ्याने संगीत लावले जाणार नाही, तसेच पुरुष आणि महिला यांच्यासाठी वेळ अन् जागा स्वतंत्र असेल.

ही व्यायामशाळा १५ वर्षांपासून चालू असल्याचे सांगितले जात आहे. आता त्यात धर्माच्या आधारे पालट करण्यात येत आहे.

व्यायामशाळेचे नवीन नियम

१. आत कोणतेही संगीत किंवा गाणी लावली जाणार नाहीत.

२. पुरुष आणि महिला एकत्र व्यायाम करणार नाहीत.

३. पुरुष आणि महिला यांच्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित केली जाईल.

४. महिलांन इस्लामी कपडे घालावे लागतील. यात शरीर झाकून ठेवणे आणि हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालणे अपेक्षित आहे.

५. इतर धर्मांचे लोकही व्यायामशाळेत येऊ शकतात; मात्र त्यांना या नियमांचे पालन करावे लागेल.

नियम केवळ मुसलमानांसाठीच नाही, तर सर्वांसाठी ! – मालकाचे स्पष्टीकरण  

व्यायामशाळेचे मालक नवाझ यांनी सांगितले की,

आम्ही अशी व्यायामशाळा चालू करत आहोत, जी इस्लामला अनुकूल आहे आणि मला वाटते की, केरळम्‌मधील ही अशा प्रकारची पहिलीच व्यायामशाळा असेल. ज्यांना यात रस आहे, ते माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि प्रत्यक्ष येऊन पाहू शकतात. बरेच लोक म्हणत आहेत की, ही मुसलमानांची व्यायामशाळा आहे किंवा ‘केवळ मुसलमानांसाठी’ आहे. मी कधीही असे म्हटले नाही की, ही व्यायामशाळा केवळ मुसलमानांसाठी आहे. ‘इस्लाम-फ्रेंडली’ या शब्दाचा अर्थ काही विशिष्ट पद्धतींनी काम करणे, असा आहे; कुणाला प्रवेश नाकारणे असा नाही. अनेक लोक जे इस्लामी नियमांचे काटेकोरपणे पालन करतात, ते सहसा व्यायामशाळेमध्ये जाणे टाळतात; कारण त्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा मोठ्या आवाजातील संगीताच्या आवाजात व्यायाम करणे सोयीचे वाटत नाही. माझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकही अशा कारणांमुळे व्यायामशाळेमध्ये जाणे टाळत होते. ही सुविधा अशा लोकांसाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

देशात ‘जिम जिहाद’ चालू असतांना मुसलमानांसाठी जर कुणी स्वतंत्र व्यायामशाळा काढत असेल, तर ती चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. ‘हिंदूंच्या व्यायामशाळेतही मुसलमानांना आता प्रवेशबंद करावा’, अशी कुणी मागणी करत असेल, तर चुकीचे ठरू नये !