धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !

राजापूरमध्ये धोकादायक इमारतींविषयी नगर परिषदेची ५४ इमारतमालकांना नोटीस


राजापूर, ४ जून (वार्ता.) – शहरामध्ये दाटीवाटीने वसलेली बाजारपेठ आणि लोकवस्तीमध्ये अनेक ठिकाणी धोकादायक इमारती उभ्या आहेत. कधीही कोसळण्याच्या स्थितीमध्ये असलेल्या या इमारती कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडण्यात याव्यात किंवा इमारतीचा धोकादायक भाग काढून टाकण्यात यावा, अशी इमारतमालकांना नगर परिषदेकडून नोटिसा बजावण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील तब्बल ५४ इमारतमालकांचा समावेश असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

या नोटिसीत म्हटले आहे की,

१.  धोकादायक इमारती कधीही खाली कोसळून पडण्याची शक्यता आहे. तेथून ये-जा करणार्‍या पादचार्‍यांसह लगतच्या इमारतीतील रहिवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १९५ चे प्रावधानानुसार आपले मालकी वहिवाटीखालील सदर इमारत ही जीर्ण अवस्थेत असल्यामुळे चालू पावसाळी हंगाम विचारात घेता अतीवृष्टी आणि वादळी वार्‍यांमुळे तिचा भग्नावस्थेतील भाग केव्हाही पडण्याच्या स्थितीत आहे.

३. सदर इमारतीजवळून जाणार्‍या-येणार्‍या कोणत्याही नागरिकांस, शेजारचे रहिवासी यांना तिच्यापासून कोणत्याही रितीने धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे सदर इमारतीचा भग्नावस्थेतील भाग त्वरित काढून टाकण्यात यावा. सदर इमारतीमधील रहिवासी वापर बंद करण्यात यावा.

४. योग्य ती कार्यवाही न झाल्यास धोकादायक इमारतीचा भाग पडल्यास आणि त्यापासून धोका उद्भवून शेजारचे रहिवाशांची-नागरिकांची जीवित वा वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी तुम्हीच उत्तरदायी राहाल, याची नोंद घ्यावी, तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल.

धोकादायक झाडांच्या मालकांनाही नगर परिषदेकडून नोटीस

धोकादायक इमारतींप्रमाणे शहरामध्ये लोकवस्तीमध्ये धोकादायक झाडेही उभी आहेत. वादळी वार्‍यामध्ये ही झाडे मोडून कोसळून हानी होण्याचती शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे झाडांपासून होणारे पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेवून या झाडांच्या मालकांनाही नगर परिषदेकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. संभाव्य जीवितहानी वा वित्तहानी होवू नये   या दृष्टीने धोकादायक झाडांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, असेही नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.