पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त

  • अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यव्यापी मोहीम

  • १०२ जणांना अटक, ८६ आस्थापने बंद केली

  • अन्न पदार्थांच्या दर्जाविषयी तक्रार नोंदणीसाठी टोल-फ्री क्रमांक घोषित


मुंबई – राज्यातील प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थ यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभर ७ दिवस धडक मोहीम राबवत १ कोटी ५८ लाख २८ सहस्र ६७७ रुपयांचा साठा जप्त केला असून १०२ व्यक्तींना अटक केली. एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई केली. तसेच ८६ आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले. (या आस्थापनांविषयी कुणालाही काहीच ठाऊक नव्हते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यांच्यावर कारवाई होणार का ? – संपादक)

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ (सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे आणि सुरक्षित महाराष्ट्र) या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणार्‍या अन्न व्यवसायिकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. भेसळयुक्त पदार्थाांमध्ये आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की, तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांचा समावेश होता.

नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन आणि विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. अन्नपदार्थांच्या दर्जाविषयी शंका असल्यास नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी प्रशासनाने तक्रार नोंदणी ॲप विकसित केले आहे. नागरिकांना १८००२ २२३६५ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तक्रार करतांना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनाचा अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ होत आहे ?, याची माहिती नमूद करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

 

संपादकीय भूमिका

  • शासनाला मोहीम राबवून अवैध गोष्टी नष्ट कराव्या लागतात. कायदाचे भय नसल्याचे आणि भ्रष्टाचार मुरला असल्याचेच हे लक्षण आहे. अवैध गोष्टींची निर्मिती, व्यवसाय, विक्री होणारच नाही, अशी ठोस उपाययोजना काढायला हवीे !
  • दूरचित्रवाहिन्यांसह सर्वत्र दिसणारी गुटखा आणि पान मसाला सदृश उत्पादनांची शासनाने विज्ञापने प्रथम बंद करायला हवीत. एकीकडे विज्ञापनांच्या माध्यमातून ग्राहकांना उद्युक्त करायचे आणि आणि दुसरीकडे अशा धाडी घालयच्या, हे कितपत योग्य ?