SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रासह भारतात बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यासाठी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता ! – Bangladeshi Infiltrators

  • २ वर्षांत मुंबईत ८० हून अधिक ठिकाणी ८६८, तर महाराष्ट्रात १ सहस्र २३७ बांगलादेशी घुसखोर सापडले !

  • घुसखोरांकडे आढळली भारतीय नागरिकत्वाची प्रमाणपत्रे !

श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक सनातन प्रभात

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि इतरत्र सापडत असलेले बांगलादेशी घुसखोर !

मुंबई, २४ जानेवारी (वार्ता.) : वर्ष २०२४ आणि २०२५ मध्ये मुंबईत वेगवेगळ्या ८० हून अधिक ठिकाणी ८६८, तर नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल, नागपूर, नाशिक, पुणे आणि नांदेड येथे ७२३ बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. या २ वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात १ सहस्र २३७ बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. या सर्व घुसखोरांना पोलिसांनी कह्यात घेतले असले, तरी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकत्वाची प्रमाणपत्रे सापडणे, ही गोष्ट आणखी चिंताजनक आहे.

श्री. प्रीतम नाचणकर

यावरून महाराष्ट्रासह देशभरात बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यासाठी एक मोठी टोळी कार्यरत असून प्रशासनातील काही अधिकारीही त्यांना सहकार्य करत असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील अन्य भागांच्या तुलनेत मुंबईच्या कानाकोपर्‍यात सापडलेल्या बांगलादेशी घुसखोरांची आकडेवारी पहाता मुंबई हे घुसखोरांचे प्राधान्य असल्याचे दिसून येत आहे. अन्वेषण यंत्रणांनी या सर्व प्रकारांचा गांभीर्याने शोध घेण्याची आवश्यकता आहे.

पकडण्यात आलेल्या सर्व बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणी ७२६ गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत. हे घुसखोर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत का ?, याची पडताळणी करण्यासाठी राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने आरोग्य विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, गृहनिर्माण विभाग, महसूल विभाग आदी शासकीय विभागांना घुसखोरांच्या नावांची सूची पाठवली आहे. याविषयी पडताळणी चालू आहे.

मुंबईतील गल्लीबोळात बांगलादेशी घुसखोर !

नागपाडा, वरळी, कुर्ला, धारावी, नेहरूनगर, मानखुर्द, चुनाभट्टी, घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी, भांडुप, विलेपार्ले, वर्साेवा, वांद्रे, जुहू, सांताक्रूझ, खार, अंधेरी, साकीनाका, जोगेश्वरी, गोरेगाव, मालवणी, मालाड, बोरिवली, चारकोप, दहिसर, वडाळा, माहीम आदी मुंबईतील ८० हून अधिक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. ही सूची पहाता मुंबईतील गल्लीबोळात बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत.

नागरिकत्वाचे प्रमाण असलेली ही कागदपत्रे घुसखोरांकडे सापडली !

जन्मप्रमाणपत्र, मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड आदी भारतीय नागरिकत्वाची प्रमाण मानली जाणारी ही महत्त्वाची कागदपत्रे बांगलादेशी घुसखोरांकडे सापडली आहेत. ही प्रमाणपत्रे बनावट कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करण्यात आली आहेत.

आतंकवादविरोधी पथकाने व्यक्त केली भीती !

या बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले असले, तरी त्यांनी प्राप्त केलेली सर्व बनावट कागदपत्रे अद्यापही पोलिसांच्या हाती आलेली नाहीत. त्या प्रमाणपत्रांच्या आधारे हे घुसखोर विविध शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याची शक्यता आतंकवादविरोधी पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक नवल बजाज यांच्या स्वाक्षरीने विविध शासकीय विभागांना घुसखोरांच्या नावाची सूची पाठवण्यात आली असून याविषयीची पडताळणी चालू आहे.

प्रशासनाचा संथ कारभार !

आतकंवादविरोधी पथकाकडून मे २०२५ मध्ये ही सूची विविध शासकीय विभागांना पाठवण्यात आली आहे; परंतु संबंधित विभागाकडून चालवल्या जाणार्‍या योजनांमध्ये घुसखोरांच्या नावाचा समावेश आहे का ?, याची पडताळणी करण्याची गती अतिशय संथ आहे. ८ मास झाले, तरी काही शासकीय विभागांकडून त्याचा आढावा गृहविभागाला देण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.

एकूणच मागील काही वर्षांत सातत्याने सापडत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या पहाता महाराष्ट्रात घुसखोरांचे प्रमाण लाखोंच्या घरात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक पातळीवर घुसखोरांना मिळणारे साहाय्य आणि प्रशासनाकडून मिळालेली प्रमाणपत्रे हे दोन्ही प्रकार गंभीर असून यासाठी सरकार, पोलीस, प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे.

बांगलादेशी घुसखोरांची यादी –


संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर सापडणे, हे एकप्रकारे अन्वेषण यंत्रणांचे अपयश आहे, तसेच घुसखोरांकडे भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रे मिळणे हे प्रशासनातील भ्रष्टाचाराचे द्योतक आहे. देशाला पोखरणार्‍या अशा अधिकार्‍यांवर सरकारने कडक कारवाई करावी !