कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.
(लेखांक १३)
कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग आचरणारे महान भारतीय संत !

यापूर्वीच्या लेखांतून आपण देवीदेवतांपासून ऋषिमुनींपर्यंतच्या संगीताच्या दैवी परंपरेविषयी जाणून घेतले. याच परंपरेतील पुढील पुष्प, म्हणजे ईश्वराचे देहधारी रूप असलेले संत ! संत नामदेव महाराज म्हणतात, ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।।’, म्हणजे ‘कीर्तनात रंगून जाऊया आणि त्या माध्यमातून संतांचा उपदेश संपूर्ण जगभर पोचवूया.’ संतांचे अभंग, ओव्या, दोहे, अशा प्रकारच्या ईश्वरभक्तीत डुंबवणार्या रचनांवर समाजच काय, तर ईश्वरही डोलतो आणि नाचतो ! ही किमया आहे संतांनी रचलेल्या काव्यांची आणि गायन अन् नर्तन या माध्यमांतून ईश्वराला आळवणार्या संत-विभूतींची !
भारत ही संतांची भूमी आहे. संगीताचे माध्यम वापरून संतांनी स्वतः ईश्वराची आराधना तर केलीच; परंतु त्यांनी संगीत आणि नृत्य यांच्या माध्यमातून समाजालाही भगवद्भक्तीचा मार्ग दाखवला. भारतात संगीतातून ईश्वरप्राप्ती करणारी अनेक संतांची मांदियाळी आहे, उदा. महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत कान्होपात्रा इत्यादी; राजस्थानमधील संत मीराबाई, उत्तरप्रदेशातील स्वामी हरिदास आणि संत सूरदास; गुजरातमधील संत नरसी मेहता; बंगालमधील संत चैतन्य महाप्रभु अन् स्वामी विवेकानंद, कर्नाटकातील संत पुरंदरदास, तसेच तमिळनाडूतील संत त्यागराज, संत आंडाळ इत्यादी.
या लेखमालेतून आपण संतांनी केलेल्या संगीत-साधनेविषयी जाणून घेणार आहोत.
(भाग १)

१. महाराष्ट्रातील संत
१ अ. अभंगांतून भगवद्भक्तीत रममाण होणारे संत तुकाराम महाराज ! : संत तुकाराम महाराज म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर प्रपंचात राहून विठ्ठलभक्तीत दंग असलेली चैतन्यमय मूर्ती उभी रहाते. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।’, असे म्हणतात. संत तुकाराम महाराज यांनी अभंग आणि कीर्तन यांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात समाजप्रबोधन केले. जेव्हा संत तुकाराम महाराज अभंग गात, तेव्हा त्यांचे अभंग ऐकणारे लोक देहभान विसरून नाचू आणि डोलू लागत. सगळे श्रोते संत तुकाराम महाराजांच्या भजनांतून उच्च भावावस्था अनुभवत असत. एवढे सामर्थ्य त्यांच्या रचना आणि गायन यांत होते. एवढेच काय, तर साक्षात् पांडुरंग तुकोबारायांच्या भक्तीपूर्ण कीर्तनामध्ये नाचू-डोलू लागायचा ! ‘भक्तीपूर्ण गायन आणि नृत्य काय असते ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण, म्हणजे संत तुकाराम महाराज ! त्यांनी संगीताचे सामर्थ्य जाणले होते. संगीताचा महिमा वर्णितांना ते म्हणतात,
गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ।। १ ।।
तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ।। ३।।
या कलियुगात तरून जाण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणात गाणे, नाचणे इत्यादींसारखे निर्वाणीचे दुसरे साधन नाही. संगीताच्या माध्यमातून भक्तीरसात डुंबण्यासारखे दुसरे उत्तम शस्त्र नाही.
१ आ. इतर संत : महाराष्ट्राच्या संत परंपरेत संगीताच्या माध्यमातून ईश्वराला आळवणारी अनेक संत मंडळी होऊन गेली. साक्षात् विठ्ठल ज्यांच्या कीर्तनात नाचू लागतो, ते संत नामदेव महाराज असो, नृत्य आणि गायन यांतून विठ्ठलाची आराधना करणारी संत कान्होपात्रा असो किंवा जात्यावर दळण दळतांना पांडुरंगाच्या भक्तीपूर्ण ओव्या गाणारी संत जनाबाई असो, या सर्व संत मंडळींनी संगीताचा उपयोग भगवंताला आळवण्यासाठी केला. कलेतून साकारलेल्या त्यांच्या भक्तीमुळे साक्षात् भगवंतच त्यांना आधीन झाल्याचे त्यांच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळते.
२. भजनांतून श्रीकृष्णाला आर्ततेने आळवणारे गुजरातमधील संत नरसी मेहता !

‘वैष्णव जन तो तेने कहिये जे…’, या गीताचे जनक संत नरसी मेहता हे गुजरातचे महान कवी आणि कृष्णभक्त होते. त्यांचा जन्म साधारण १५ व्या शतकात झाला. ‘मंदिरात कीर्तन आणि भजन यांच्या माध्यमातून देवाची भक्ती करणे, देहभान विसरून भजनांतून देवाला आळवणे’, हाच त्यांचा ब्रह्मानंद होता. भजन आळवतांना ‘केदार’ या रागात ते रंगून जात. या एका रागाच्या रसमोहिनीने प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्यांना अंकित झाला होता. त्यांच्या संदर्भातील एक कथा प्रचलित आहे.
एका गरीब ब्राह्मणाच्या साहाय्यासाठी संत नरसी यांनी त्यांचा श्रीकृष्णाला परम प्रिय असलेला ‘केदार’ राग सावकाराकडे गहाण ठेवला होता. केदार रागावाचून संत नरसी मेहता यांचे भजन आणि कीर्तन चालू राहिले; पण त्यात रस येईना. देवाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी त्यांचे हृदय व्याकुळ झाले; पण पैसे न मिळाल्याने सावकाराचे देणे फिटेना आणि त्यामुळे भगवंतासाठी ‘केदार’ राग आळवता येईना. संत नरसी यांना चैन पडेना.
एका निंदकाच्या सांगण्यावरून राजाने संत नरसी यांच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. राजवाड्यातील एका दालनात श्रीकृष्णाची एक मूर्ती ठेवून त्या मूर्तीच्या हाती एक पुष्पहार देण्यात आला. ‘त्या मूर्तीपुढे संत नरसींनी आपले भजन आणि कीर्तन करावे अन् श्रीकृष्णाने सजीव होऊन नरसींच्या गळ्यात पुष्पहार घालावा. असे विशिष्ट कालावधीत घडले नाही, तर संत नरसी यांना शासन केले जाईल’, अशी राजाज्ञा संत नरसींना ऐकवण्यात आली. संत नरसी यांनी प्रभूची इच्छा म्हणून ती स्वीकारली.
संत नरसी यांनी श्रीकृष्णापुढे भजन म्हणणे चालू केले. भजनातून श्रीकृष्णाला आळवत असतांना संत नरसी यांच्या रूपात साक्षात् भगवान श्रीकृष्ण सावकाराच्या घरी येऊन सावकाराचे कर्ज फेडून गेला आणि त्याने सावकाराला ‘केदार’ राग मोकळा झाला’, अशी पावती द्यायला सांगितले.
इकडे भजन करतांना संत नरसी यांनी सहज डोळे उघडून कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिले. तेवढ्यात एक कागद त्यांच्या समोर आला. व्याज आणि मुद्दल पोचल्याची सावकाराची स्वाक्षरी असलेले ते करारपत्र पाहून श्रीकृष्णाच्या अगाध लीलेचे त्यांना दर्शन झाले. त्यांचा ‘केदार’ राग मुक्त झाला होता.
संत नरसींनी केदार रागात भजन आळवण्यास आरंभ केला. त्यांच्या भक्तीपूर्ण केदार रागाच्या स्वरांनी एक वेगळेच दिव्य स्वरभावविश्व निर्माण झाले. श्रीकृष्णाच्या मूर्तीभोवती एक तेजोवलय निर्माण झाले. संत नरसींच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. इतका वेळ अचेतन असलेली श्रीकृष्णमूर्ती सजीव झाली आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला घातलेली पुष्पमाला संत नरसी यांच्या गळ्यात पडली.
संत नरसी मेहता यांच्या भक्तीपूर्ण गायनात केवढे अगाढ सामर्थ्य होते ! त्यांचे उदाहरण कलाकारांसमोर आदर्श आहे. ‘आपल्या कलेच्या माध्यमातून संत नरसी मेहता यांच्यासारखे ईश्वराला आळवले, तर ईश्वर आपल्यापासून दूर नाही’, हेच खरे !
३. बंगालमधील संत

३ अ. भगवंताचे नामसंकीर्तन करत भावनृत्यातून भावसमाधी अनुभवणारे संत चैतन्य महाप्रभु ! : बंगालमध्ये जन्म झालेल्या चैतन्यला लहानपणापासून नृत्याची आवड होती. हरिनाम उच्चारताच ते नृत्य करत. त्यांचे ते बाल नृत्य सर्वांना मोहक वाटे. चैतन्य यांनी युवावस्थेतच गृहस्थाश्रम सोडून संन्यासदीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु’, असे नाव धारण केले आणि याच नावाने ते प्रख्यात झाले.
चैतन्य महाप्रभु श्रीहरीचे ध्यान आणि स्मरण करत त्याच्या भेटीसाठी तळमळू लागले. ‘माझा कृष्ण मला भेटवा’, असे म्हणत ते हिंडू लागले. त्यात ते तहान-भूकही विसरले. चैतन्य महाप्रभु त्यांच्या अनुयायांसह कृष्णाचे नामसंकीर्तन करत नाचू लागले. १५०८ मध्ये चैतन्य महाप्रभु यांना भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. त्यांनी हरिनाम आणि भजन-कीर्तन यांचा केवळ बंगालमध्येच नव्हे, तर संपूर्ण उत्तर भारतात प्रचार केला.
ते स्वतःला राधा (कृष्णभक्तीत रममाण असलेली) समजत आणि कृष्णाच्या भेटीसाठी तळमळत भजन करत. ते भगवंताचे नामसंकीर्तन करत नृत्यात स्वतःचे देहभान हरपून जात. ते त्यांचे भगवद्भक्तीत रममाण असलेले भावनृत्य होते. या नृत्यातून ते भावसमाधीतही जात असत.
‘चैतन्य महाप्रभु यांच्यासारखे देवाच्या अखंड अनुसंधानात होणारे भावनृत्य’, हेच खरे आध्यात्मिक स्तरावरील नृत्य होय. हाच खरा नृत्ययोग ! चैतन्य महाप्रभु यांचे भावनृत्य कलाकारांसाठी प्रेरणादायक आहे.

३ आ. भगवद्भक्तीसाठी धृपद गाणारे स्वामी विवेकानंद ! : बंगालच्या परंपरेतील असेच एक महान संत, म्हणजे महाकालीचे भक्त रामकृष्ण परमहंस यांचे परम शिष्य स्वामी विवेकानंद. आपल्याला स्वामी विवेकानंद यांची राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम ठाऊकच आहे; परंतु ‘संगीतातील तज्ञ असणे’, हेही विवेकानंदांचे वैशिष्ट्य होते. स्वामी विवेकानंद हे स्वतः धृपदिये (धृपद गाणारे) आणि वादकही होते. त्यांनी भगवद्भक्तीसाठी उपयुक्त अशा काही धृपदाच्याही (टीप) रचना केल्या आहेत. स्वामी विवेकानंद यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस गायन करण्यास सांगत. ‘स्वामी विवेकानंद यांनी गायन चालू करताच रामकृष्ण परमहंस यांची गाढ भावसमाधी लागत असे’, असा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळून येतो.
टीप – धृपद : भारतीय संगीतातील ही एक गायनशैली आहे. धृपदाचे काव्य वीर, शांत, तसेच भक्ती या रसांनी युक्त असते.
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६ ७८१७८
ईमेल : [email protected]

‘कलेचे सादरीकरण करतांना देहभान विसरून ‘स्व’ला विसरणे’, ही खरी कला आहे. संत तुकाराम महाराजांसारख्या अनेक संतांनी कर्तेपण देवाचरणी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे अभंग ऐकणार्यांनाही उच्च भावावस्था अनुभवता येते. कलाकारांनी कर्तेपणा ईश्वरचरणी समर्पित केला, तर कलाकार आणि श्रोते या दोघांनाही कलेतील आध्यात्मिक स्तरावरील उच्च अनुभूती घेता येईल.
वरील संतांच्या उदाहरणांवरून लक्षात येईल की, संतांनी साधनेसाठीच संगीत आणि नृत्य या माध्यमांचा उपयोग केला. कलेच्या माध्यमातून भगवद्भक्ती ही कलाकाराला ईश्वराकडे नेते.’
(क्रमशः)
– सौ. भक्ती कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्याय, फोंडा, गोवा. (८.१.२०२६)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !