जालना येथील नवनिर्वाचित हिंदुत्वनिष्ठ नगरसेवक श्री. श्रीकांत पांगारकर यांनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केला मानस
हिंदु धर्माप्रती अतूट प्रेम आणि अभिमान निर्माण झाला की, ती व्यक्ती वैयक्तिक जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, तरी जीवनभर धर्मरक्षणार्थ कार्यरत असते. असंख्य धर्मनिष्ठांच्या धर्मासाठीच्या या असामान्य त्यागामुळेच आक्रमकांपासून हिंदु धर्माचे सातत्याने रक्षण होत आले आहे. सध्याच्या काळातील असे एक उदाहरण म्हणजे जालना येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आलेले श्री. श्रीकांत पांगारकर. त्यांना व्यवस्थेने गौरी लंकेश या एका साम्यवादी पत्रकाराच्या हत्येच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला, ८ वर्षे कारागृहात डांबून त्यांचे हाल केले; परंतु त्यांच्या मनातील धर्मप्रेम आणि हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठीची त्यांची तळमळ यत्किंचितही अल्प झाली नाही. समाज आणि धर्म कार्य करण्यासाठी ते पुन्हा एकदा जालना येथे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ‘सनातन प्रभात’ने जालना येथील या हिंदुत्वाच्या शिलेदाराची भ्रमणभाषवरून घेतलेली मुलाखत प्रसिद्ध करत आहोत.

१. प्रश्न : प्रथम तुमचे ‘सनातन प्रभात’कडून अभिनंदन ! एवढ्या कठीण काळातून पुष्कळ कष्ट सहन करून तुम्ही येथपर्यंत आला आहात, तुम्हाला याविषयी काय वाटते ? तुमच्या भावना काय आहेत ?
श्री. श्रीकांत पांगारकर : माझ्यावर ही ईश्वराची कृपाच आहे की, या कठीण काळातही मला स्थिर रहाता आले. माता जगदंबेच्या कृपेने मला सर्वकाही भोगण्याची शक्ती मिळाली. देवानेच माझ्यात ते सहन करण्याची क्षमता निर्माण केली आणि सर्वकाही सुकर होत गेले. आजचे चित्र पाहिले, तर माझ्या प्रभागातील जनता माझ्यासोबत उभी राहिली.
२. प्रश्न : गौरी लंकेश हत्या प्रकरणात तुम्हाला कारावासात रहावे लागले. या अन्यायाकडे तुम्ही कसे पहाता ?
श्री. श्रीकांत पांगारकर : मी वर्ष २०१८ ते २०२४ अशी ६ वर्षे कारागृहात होतो. मी पूर्णपणे निर्दाेष असतांनाही मला यात गोवण्यात आले. मला वाटते की, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कारागृहात ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. १-२ वर्षांत सुनावणी चालवून निकाल तरी द्यायला हवा. न्यायालयात प्रकरण न चालवता ६ वर्षे कारागृहात ठेवणे हे अत्यंत चुकीचे आहे. माझ्या आयुष्यातील ६ वर्षे वाया गेली. ती मला परत मिळणार आहेत का ?
३. प्रश्न : गौरी लंकेश प्रकरणाच्या काळ्या अध्यायानंतरही लोकांनी तुमच्यावर प्रेम केले; तुम्हाला निवडून दिले. हे प्रेम तुम्ही कसे साध्य केले ?
श्री. श्रीकांत पांगारकर : माझ्यावर आरोप करून अलीकडेच मला अटक झाली. मुळात मी वर्ष २००१ ते २०११ या कालावधीत शिवसेनेचा नगरसेवक राहिलो आहे. माझ्या प्रभागातील जनतेला माझा स्वभाव ठाऊक आहे. गौरी लंकेश प्रकरणात माझे नाव येऊन मला अटक झाल्यानंतरही जनतेला माहिती होते की, ‘मी निर्दाेष आहे !’ त्यामुळे जनतेने मला पुन्हा विजयी केले.
४. प्रश्न : साम्यवाद्यांनी खोटा प्रचार करून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याला तुम्ही कसे पुरून उरलात ?
श्री. श्रीकांत पांगारकर : मुळात दोष नसतांना मला अटक करण्यात आली होती. आम्हाला यातना भोगण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता; परंतु आतून ईश्वरी प्रेरणा होती. अधिवक्त्यांकडून आम्हाला वैध मार्गाने लढण्यासाठी दिशादर्शनही होत होते. यामुळेच मी हे सगळे भोगू शकलो.
५. प्रश्न : तुम्ही हिंदुत्वासाठी एवढे भोगले. या सगळ्यातून तुम्ही तावून-सुलाखून निघाला आहात. तरी आज तुमची मनाची धारणा काय आहे – एक राजकीय नेता म्हणून, एक हिंदुत्वनिष्ठ म्हणून ?
श्री. श्रीकांत पांगारकर : मला माझे दायित्व लक्षात आले. लोकांचा विश्वास संपादन करणे आणि तो टिकवणे यासाठी सातत्याने सजग राहून प्रयत्न करत राहिले पाहिजे, याची मला जाणीव झाली.
६. प्रश्न : नगरसेवक म्हणून तुमच्या पुढील योजना काय आहेत ?
श्री. श्रीकांत पांगारकर : नगरसेवक म्हणून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आणि अत्यावश्यक सुविधा पुरवणे, हे मी करत राहीनच. उदा. वीजपुरवठा, पाणीव्यवस्था, पथदिव्यांची व्यवस्था आदी. यासमवेतच गुन्हेगारीच्या मुळाशी अमली पदार्थ असल्याने त्यांच्या विरोधात मी मोहीम उघडणार आहे. यासह स्त्रियांचे रक्षण होण्यासाठीही मी प्रयत्नरत असीन.
७. प्रश्न : लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासाठी आज हिंदूंमधून मागणी होत आहे. तर यावर आपण आपल्या प्रभागात काय प्रयत्न करणार आहात ? एकूणच हिंदूंमध्ये धर्मजागृतीसाठी तुमची काही योजना आहे का ?
श्री. श्रीकांत पांगारकर : हो, मीही लव्ह जिहादविरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुली आणि महिला यांच्यात सातत्यपूर्ण जागृती करण्यासाठी मी योजना आखणार आहे. यात त्यांना स्वत:चे रक्षण करण्यास सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची मी व्यवस्था करणार आहे. या समवेतच युवकांना शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी पुन्हा व्यायामशाळा, तालमी चालू करण्याचे पहाणार आहे. हिंदूंमध्ये सातत्य रूपाने जागृती करण्यासाठी प्रयत्न करीन. समाजाला चांगले-वाईट याची जाणीव करून देऊन त्यांना चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करीन. एकूणच हिंदूसंघटन काळाची आवश्यकता आहे. यासाठी मी माझ्या प्रभागात प्रयत्न करणार आहे.
८. प्रश्न : राजकीय पक्षांमध्ये फूट पडणे, पक्षांतर, बंडखोरी आदी समस्यांनी राजकीय क्षेत्राला विशेषत: महाराष्ट्राला ग्रासले आहे. याविषयी आपले विचार ?
श्री. श्रीकांत पांगारकर : आज अशी परिस्थिती आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला तत्त्व राहिलेले नाही. जनता सर्व जाणून आहे. एके दिवशी जनतेचा विस्फोट होणारच आहे.
९. प्रश्न : आपण अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. हिंदुत्वाच्या व्यापक हितासाठी तुमचा हा त्याग आहे, अशी आमची धारणा आहे. साम्यवाद्यांच्या षड्यंत्राचे आपण बळी ठरला. या कालावधीत आपल्याला व्यवस्थेमधील काय त्रुटी लक्षात आल्या ?
श्री. श्रीकांत पांगारकर : आम्हा हिंदुत्वनिष्ठांना ज्याप्रमाणे अटक करण्यात आली, त्याच प्रमाणे काही शहरी नक्षलवाद्यांनाही अटक करण्यात आली होती. तथापि प्रसारमाध्यमे त्यांच्या संदर्भातील बातम्या प्रकाशित करतांना त्यांचे सकारात्मक चित्रण करत होती, तर आम्हा हिंदुत्वनिष्ठांच्या बातम्या अयोग्य आणि नकारात्मकपणे प्रकाशित करत असत. या दृष्टीकोनातून हिंदूंनी सजग होऊन कुणाची पाठराखण करायची, याचा विवेक निर्माण केला पाहिजे.
१०. प्रश्न : ‘द कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांतून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली. कोट्यवधी हिंदूंपर्यंत काश्मिरी हिंदूंचा विषय पोचला; परंतु आजही पाहिले, तरी काश्मिरी हिंदूंचा प्रश्न लढणारी केवळ ‘पनून कश्मीर’सारखी संघटना आणि तिला साहाय्य करणार्या मूठभर हिंदुत्वनिष्ठ संघटनाच आहेत. तर हिंदूंमध्ये जागृती कशा प्रकारे केली पाहिजे, असे तुम्हाला वाटते ?
श्री. श्रीकांत पांगारकर : ‘द कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांच्या माध्यमांतून हिंदूंवरील आघातांचा विषय हिंदु समाजात क्षणिक भावना उत्पन्न करतो. कालांतराने हिंदु समाज स्वत:च्या उद्योग-व्यापारात गुंतून जातो आणि त्यांचा हिंदुजागृतीचा विचार पुसट होऊन जातो. खरेतर अशा चित्रपटांनंतर त्यांना सातत्याने प्रेरित करून, त्यांच्यात जागृती करणे आवश्यक आहे.
११. प्रश्न : एक हिंदुत्वनिष्ठ नगरसेवक म्हणून स्थानिक ठिकाणी हिंदुत्वाचे कार्य वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात ?
श्री. श्रीकांत पांगारकर : मी ‘कोदंड प्रतिष्ठान’ नावाची संघटना स्थापन करणार आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्या माध्यमातून हिंदूंमध्ये धर्मजागृती करणे, समाजाला निर्व्यसनी बनवण्यासाठी प्रयत्न करणे, स्त्रीरक्षणासाठी मोहीम राबवणे, तसेच ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळणे आदी प्रयत्न करण्याचा आमचा मानस असणार आहे.

डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !