प्रेमळ आणि देवाच्या अनुसंधानात सतत असणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) प्रभावती शिंदे !

आज कै. (श्रीमती) प्रभावती गजानन शिंदे यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

‘९.१.२०२६ या दिवशी श्रीमती प्रभावती शिंदेआजी यांचे निधन झाले. माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(कै.) श्रीमती प्रभावती गजानन शिंदे

१. शिंदेआजींशी बोलल्यावर बहिणीची आठवण येणे 

‘वर्ष २०१७ पासून श्रीमती प्रभावती शिंदेआजी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होत्या. माझी त्यांच्याशी आश्रमात जाता-येता आणि भोजनकक्षात भेट होत असे. तेव्हा त्या मला नमस्कार करत असत. त्या मला ‘भाऊ’ अशी हाक मारून माझ्याशी २ – ४ वाक्ये बोलून प्रेमाने विचारपूस करत असत. तेव्हा मला माझ्या प्रेमळ बहिणीची आठवण येत असे.

२. शिंदेआजी पुष्कळ संघर्षमय जीवन जगल्या आहेत. त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळे सनातन संस्था आणि माझ्यासारख्या शेकडो साधकांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या रूपात सद्गुरुरत्न मिळाले.

पू. शिवाजी वटकर

३. मला शिंदेआजींकडून बरेच काही शिकता आले. त्यांच्यात ‘नम्रता, प्रेमभाव, शिकण्याची वृत्ती, विचारण्याची वृत्ती, सतत नामजप करणे’, हे गुण होते. त्यांच्यातील या गुणांमध्ये उत्तरोत्तर वृद्धी होत गेली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने शिंदेआजींची आध्यात्मिक प्रगतीही झाली.

४. शिंदेआजींचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे

अ. शिंदेआजींचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता.

आ. ‘त्यांच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होऊन ते दूरवर पसरत आहे आणि वातावरणाची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले.

इ. त्यांना नमस्कार करतांना ‘त्या प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत आणि त्यांचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.

ई. त्यांचे अंतिम दर्शन घेतांना मला वातावरणात हलकेपणा जाणवत होता.

उ. ‘गुरुकृपेने त्यांची कसलीच इच्छा राहिली नाही’, असे मला जाणवले.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१.२०२६)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कै. (श्रीमती) प्रभावती शिंदे यांच्या छायाचित्राकडे पाहून खूप आनंद जाणवतो. त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची अनुभूती येते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आनंदी, हसतमुख आणि सतत भावस्थितीत असलेल्या कै. (श्रीमती) प्रभावती शिंदे ! (वय ९० वर्षे)

(श्रीमती) प्रभावती शिंदे या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मातोश्री असून त्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहात होत्या. सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. सदाशिव (भाऊ) परब

‘श्रीमती शिंदेआजी मला कधीच चिंतेत आणि निराशेत दिसल्या नाहीत. त्या नेहमी आनंदी आणि भावस्थितीत असायच्या. जेव्हा मी श्रीमती आजींची खुशाली विचारण्यासाठी कधी कधी त्यांच्या खोलीत जायचो, तेव्हा त्या हसत उठून बसत असत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यावर त्या ‘प्रकृती चांगली आहे’, असे सांगून मला माझ्या प्रकृतीबद्दल विचारत असत. त्या वेळी मला त्यांच्या हसर्‍या चेहर्‍यावर पुष्कळ चैतन्य जाणवत असे.

मी आमच्या गोवा येथील मूळ गावच्या देवी केळबाईची जत्रा करून देवद आश्रमात आल्यावर आठवणीने पहिल्यांदा शिंदेआजींना प्रसाद द्यायचो. त्या वेळी त्यांचा भाव जागृत होऊन त्यांचा चेहरा आनंदी होत असे. तेव्हा मला त्यांच्यात माझी आई दिसायची. देवीचा प्रसाद घेतल्यावर आजी आवर्जून माझ्या कुटुंबाची खुशाली विचारायच्या. मी त्यांच्या स्मृती कधीच विसरू शकत नाही.

‘आजींना सद्गती मिळो आणि त्यांची साधना पुढे चालू राहो’, अशी मी ईश्वराला कळकळीने प्रार्थना करतो आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी हे विचार सुचवून ते माझ्या माध्यमातून लिहून घेतले’, याबद्दल मी त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

इदं न मम ।

– (पू.) सदाशिव (भाऊ) परब (सनातनचे २६ वे संत, वय ८५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१.२०२६)


सकारात्मक, प्रेमळ आणि देवाच्या अनुसंधानात असणार्‍या देवद (पनवेल) येथील श्रीमती प्रभावती गजानन शिंदे !

‘वर्ष २०२४ पासून मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात माझ्या सासूबाई श्रीमती प्रभावती शिंदेआजी (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मातोश्री) यांच्या सेवेत आहे. २२.६.२०२५ या दिवशी त्या पडल्या. त्यामुळे त्यांना पनवेल येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार झाल्यानंतर त्या थोड्या बर्‍या झाल्या; पण वाढत्या वयामुळे त्यांना अशक्तपणा आला. सध्या त्या फारशी हालचाल करू शकत नाहीत. त्यांची सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

सौ. मीनल शिंदे

१. आजी आपल्या क्षमतेनुसार शक्य त्या कृती स्वतः करण्याचा मनापासून प्रयत्न करतात.

२. त्यांना प्रसाद आणि महाप्रसाद भरवण्यासाठी साधिका येतात. तेव्हा आजी त्यांची प्रेमाने आणि आपुलकीने विचारपूस करतात.

३. सकारात्मकता

रुग्णाईत असल्यामुळे आजींना विविध प्रकारच्या औषधांच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्या गोळ्या घेतांना त्यांचा ‘मला लवकर बरे व्हायचे आहे’, असा सकारात्मक विचार असतो. त्यामुळे त्या गोळ्या सहजतेने घेतात.

४. परिस्थिती स्वीकारणे  

आजी पडल्यामुळे त्यांच्या सर्वच सेवा पलंगावरच कराव्या लागतात, उदा. त्यांचे अंग ओल्या फडक्याने पुसणे, त्यांना महाप्रसाद आणि प्रसाद भरवणे इत्यादी. आरंभी ते स्वीकारणे आजींना अवघड जात होते; परंतु नंतर त्यांनी परिस्थिती मनापासून स्वीकारली. आजींचे दातांचे दुखणे चालू झाल्यावर आधुनिक वैद्यांनी त्यांना महाप्रसादामध्ये द्रवपदार्थ घेण्यास सांगितले. त्यांनी ते त्वरित स्वीकारले.

५. सर्व प्रकारचे त्रास आनंदाने सहन करणे  

आजींना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, असे तिन्ही प्रकारचे त्रास होत आहेत. त्यांचे संपूर्ण अंग दुखत असते. अंथरुणावर पडून असल्याने कधी कधी त्यांना जखमा (बेडसोर्स) होतात. त्यांच्या दातांचे दुखणे वाढते. आहार न्यून झाल्याने त्या अशक्त झाल्या आहेत. त्यांचे असंबद्ध बोलणे चालू असते. त्यांना पुरेशी झोप लागत नाही. त्यांचा आध्यात्मिक त्रासही वाढत आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्या हे सर्व त्रास केवळ गुरुकृपेमुळे आनंदाने सहन करत आहेत.

६. इतरांची काळजी घेणे  

मेंदूला रक्तपुरवठा अल्प होत असल्यामुळे आजींना काही गोष्टी आठवत नाहीत, तरीही मला कधी बरे वाटले नाही, तर त्या मला म्हणतात, ‘‘तू विश्रांती घे. मला आता काही लागणार नाही.’’

७. साक्षीभाव  

त्यांना नातेवाइकांविषयी दुःखद किंवा चांगली वार्ता सांगितली, तरी आजींच्या चेहर्‍यावर शांत आणि स्थिर भाव दिसतात. ‘प्रत्येक घटना त्या साक्षीभावाने पहात आहेत’, असे मला जाणवते.

८. देवाच्या अनुसंधानात असणे 

अ. आजी अनेक वेळा पलंगावर शांत पडून असतात. तेव्हा ‘त्या देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवते.

आ. सद्गुरु राजेंद्रदादा (आजींचे चिरंजीव) भेटायला आल्यावर ते आजींना नामजप करण्याची आठवण करून देतात. तेव्हा आजी म्हणतात, ‘‘माझा नामजप चालू आहे.’’

इ. दुपारी मी ध्यानमंदिरात नामजपासाठी जाते. त्या वेळी श्रीमती दुसानेआजी आजींजवळ बसतात. दुसानेआजी नामजपाच्या माळा बनवण्याची सेवा करता करता मोठ्याने ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा नामजप करतात. त्या वेळी आजीही त्यांच्या समवेत नामजप करतात आणि म्हणतात, ‘‘मला चांगले वाटते.’’ सकाळी मी तोच नामजप करते. तेव्हा आजी भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अनुसंधानात असल्याचे मला जाणवते.

९. कृतज्ञताभावात रहाणे 

अ. काही वेळा देवद आश्रमातील आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी किंवा वैद्या (सुश्री) माया पाटील आजींना पहायला येतात. तेव्हा आजी त्वरित हात जोडून त्यांना नमस्कार करतात.

आ. सद्गुरु राजेंद्रदादा (आजींचे चिरंजीव) किंवा आश्रमातील कोणी संत त्यांना भेटायला आले की, आजी लगेच हात जोडून नमस्कार करतात. त्या वेळी ‘आजी कृतज्ञताभावात असतात’, असे मला जाणवते.

१०. ‘आजींचे मन शांत, स्थिर आणि निर्विचार आहे’, असे मला जाणवते. 

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, ‘केवळ तुमच्या कृपेमुळे मी ही सेवा करू शकते’, याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.१२.२०२५)

(हा लेख कै. (श्रीमती) प्रभावती शिंदे यांच्या निधनापूर्वी लिहिलेला असल्याने लेखातील वाक्यरचना पालटलेली नाही.)


६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) प्रभावती शिंदे यांच्या निधनानंतर साधकांना जाणवलेली सूत्रे !

कै. (श्रीमती) प्रभावती शिंदे यांच्या निधनानंतर देवद आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. शुभांगी पात्रीकर आणि श्री. नितीन चुरी

१. सौ. शुभांगी पात्रीकर (वय ७२ वर्षे)

अ. ‘श्रीमती शिंदेआजींचे अंत्यदर्शन घेतांना आश्रमात मुळीच दाब जाणवत नव्हता.’

२. श्री. नितीन चुरी (वय ६४ वर्षे)

अ. ‘शिंदेआजींच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन नमस्कार केल्यावर मला त्यांच्या देहाच्या ठिकाणी काही हालचाली जाणवल्या.

आ. नंतर त्यांच्या पार्थिवाचे रूपांतर एका पांढर्‍या गोळ्यात झाले आणि पुन्हा मला पार्थिव देह दिसला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १७.१.२०२६)


कै. (श्रीमती) प्रभावती शिंदे यांच्या निधनाविषयी साधिकेला मिळालेली पूर्वसूचना !

सौ. सुषमा नाईक

‘७.१.२०२६ या दिवशी रात्री मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करून चारचाकी गाडीने निवासस्थानी जात असतांना माझे लक्ष खिडकीच्या बाहेर गेले. त्या वेळी अकस्मात् मला सौ. मीनल शिंदे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या पत्नी) यांची आठवण येऊन ‘त्या परत गोव्याला कधी येणार ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी मी मनात म्हटले, ‘त्या त्यांच्या रुग्णाईत सासूबाईंच्या (श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या) सेवेसाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेल्या आहेत.’ तेव्हा देवाने आतून उत्तर दिले, ‘शिंदेआजींचे लवकरच देहावसान होईल.’ नंतर मी त्या विचाराकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजे ९.१.२०२६ या दिवशी दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी श्रीमती प्रभावती शिंदे यांचे देवद आश्रमात निधन झाल्याचे समजले. त्या वेळी ‘देवाने दिलेले उत्तर म्हणजे श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या निधनाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना होती’, हे माझ्या लक्षात आले.’

– सौ. सुषमा सुनील नाईक (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (११.१.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आणि संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक