कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.
(लेखांक १२)

भारतीय कलांना शास्त्रीय आधार देणारे महान ऋषीमुनी !
भारतीय सांस्कृतिक परंपरेत वेद आणि उपनिषदे यांपासून निर्माण झालेल्या भारतीय संगीताला दैवी अधिष्ठान आहे. या महान परंपरेचा विकास घडवून आणणार्या ऋषिपरंपरेत नारदमुनी, भरतमुनी आणि तण्डुमुनी यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. नारदमुनींनी भक्तीसंगीत आणि नादब्रह्म यांचा प्रसार केला. तण्डुमुनींनी भगवान शिवाच्या तांडव नृत्य परंपरेला शास्त्रीय स्वरूप दिले, तर भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्र’ या ‘पंचम वेदा’च्या माध्यमातून संगीत, नृत्य आणि नाट्य यांना एकत्रित अन् शास्त्रबद्ध केले. अशा थोर ऋषिमुनींनी त्यांच्या लिखाणातून केलेल्या मार्गदर्शनामुळेच आजही आपल्याला भारतीय कलांमध्ये सात्त्विकता दिसून येते. या ऋषिमुनींमुळेच कलांना शास्त्रशुद्ध परंपरा लाभली आहे. आजच्या लेखात आपण ‘नारदमुनी, तण्डुमुनी आणि भरतमुनी यांनी भारतीय शास्त्रीय संगीतासाठी दिलेले योगदान’ जाणून घेणार आहोत.
१. भक्तीसंगीताचे आद्य प्रवर्तक नारदमुनी

‘नारदमुनी हे भारतीय आध्यात्मिक परंपरेतील संगीताचे ‘आद्य उपासक’, ‘प्रचारक’ आणि ‘दैवी संदेशवाहक’ मानले जातात. संगीत परंपरेत नारदमुनी हे केवळ एक ऋषी नसून संगीताला आध्यात्मिक उंचीवर नेणारे आणि संगीताच्या माध्यमातून भक्तीपूर्ण ईश्वरी गुणगान करण्यास शिकवणारे महान देवतुल्य विभूती आहेत. त्यांना ‘देवर्षि’, असेही म्हटले जाते. नारदमुनी हे ज्ञान, भक्ती आणि संगीत यांचा त्रिवेणी संगम होते. नारदमुनींचा संबंध गंधर्व विद्यांशीही जोडला जातो. गंधर्वांना ‘दैवी गायक’ मानले जाते आणि नारदमुनी हे त्या दैवी संगीत परंपरेचे मार्गदर्शक आहेत.
१ अ. नारदमुनी आणि भक्तीसंगीत : नारदमुनींना ‘भक्तीसंगीताचे जनक’ मानले जाते. त्यांचे सतत ‘नारायण, नारायण’, हे नामस्मरण आपल्याला भगवद्भक्तीचा मार्ग दाखवते.
१ आ. योगमार्ग आणि नारदमुनी करत असलेले नामस्मरण : ‘योगमार्गामध्ये मनुष्याच्या ‘इडा’, ‘पिंगळा’ आणि ‘सुषुम्ना’, अशा ३ नाड्या सांगितल्या आहेत. ‘साधकाची सुषुम्ना नाडी चालू होणे’, म्हणजे ‘साधकाचा प्रवास ईश्वरप्राप्तीच्या दिशेने किंवा कुंडलिनीचा प्रवास ऊर्ध्व दिशेने चालू होणे’, असे आहे. नारदमुनी हे ‘नारायण, नारायण’, असे २ वेळा म्हणायचे. त्यांनी २ वेळा ‘नारायण’ म्हणण्यामुळे त्यांच्या प्राणशक्तीवहनाचा प्रवास सहजतेने इडा आणि पिंगळा या नाड्यांमधून थेट सुषुम्ना नाडीमध्ये होत असे. ‘नारायण, नारायण’, या नामस्मरणाने ते सहजतेने सुषुम्ना नाडीमध्ये स्थिरावून भगवंताच्या अनुसंधानात असायचे.’ – प.पू. देवबाबा, संस्थापक, शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी, कर्नाटक.
१ इ. नारदमुनींची वीणा : नारदमुनींच्या हातात नेहमी वीणा असते. त्यांची वीणा ‘महती’, या नावाने ओळखली जाते.
२. भगवान नटराजाचा प्रिय शिष्य ‘तण्डु’, म्हणजे ‘तण्डुमुनी’

२ अ. तण्डुमुनी आणि नृत्य : भारतीय नृत्य परंपरेत तण्डुमुनींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना ‘भगवान शिवाच्या तांडव नृत्य परंपरेचे प्रथम शास्त्रीय प्रवर्तक’ मानले जाते. या तांडव नृत्याच्या प्रसारात तण्डुमुनींचे नाव अग्रणी आहे.
२ आ. भगवान शिव आणि तण्डुमुनी : भगवान नटराजाने केलेले प्रलयकारी; परंतु सत्-चित्-आनंदाची अनुभूती देणारे नृत्य, म्हणजे ‘तांडव’. ‘तांडव नृत्याचा आद्य (प्रथम) शिष्य’ म्हणून तण्डुमुनींचा उल्लेख आढळतो. ‘तण्डु’ या नावावरून या नृत्याला ‘तांडव’ हे नाव पडले असावे. भगवान शिवाच्या आदेशानुसार तण्डुमुनींनी भरतमुनींना नृत्यातील भाग शिकवल्याचे वर्णन नाट्यशास्त्रात आहे.
नाट्यशास्त्रातील चौथ्या अध्यायात ‘तांडवलक्षणम्’मध्ये तण्डुमुनींचा उल्लेख आढळतो.
प्रयोगमङ्गहाराणामाचक्ष्व सुरसत्तम ।
ततस्तण्डुं समाहूय प्रोक्तवान् भुवनेश्वरः ।। – नाट्यशास्त्र, अध्याय ४, श्लोक १७
प्रयोगमङ्गहाराणामाचक्ष्व भरताय वै ।
ततो ये तण्डुना प्रोक्ताः तु अङ्गहाराः महात्मना ।। – नाट्यशास्त्र, अध्याय ४, श्लोक १८
नानाकरणसंयुक्तान् व्याख्यास्यामि सरेचकान् । – नाट्यशास्त्र, अध्याय ४, श्लोक १९
अर्थ : (ब्रह्मदेवाने भगवान शंकराला विनंती केली,) ‘हे देवाधिदेवा, अंगहारांच्या प्रयोगाविषयी सांगा.’ तेव्हा त्रिभुवनाधिपती भगवान शिवाने तण्डुमुनींना बोलावून सांगितले, ‘‘भरतमुनींना अंगहारांच्या प्रयोगाविषयी सांगा.’’ तेव्हा तण्डुमुनींनी विविध करण (टीप १), तसेच रेचक (टीप ३) यांनी युक्त जे अंगहार सांगितले, त्यांची व्याख्या मी करतो.
टीप १ – करण : नृत्यात गतीमान नृत्त (टीप २) आणि विलासपूर्ण पदन्यासादी हालचाली (पायांच्या लालित्यपूर्ण हालचाली) यांना ‘करण’, असे म्हणतात. ‘या करणांची निर्मिती साक्षात् शिवाच्या तांडव नृत्यापासून झाली आहे’, असे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात सांगितले आहे.
टीप २ – नृत्त : नर्तनाचे नृत्त, नाट्य आणि नृत्य असे तीन प्रकार आहेत. नृत्त म्हणजे भाव आणि अभिनय विरहित ताल-लय यांच्याशी समन्वय साधत आंगिक हालचाली अन् पदन्यास एकत्रितपणे करणे.
टीप ३ – रेचक : ‘वेगवेगळ्या क्रियांनी अंग वळवणे’, यास ‘रेचित’, ही संज्ञा दिली जाते. ‘वर उचलणे’, ‘वेगवेगळ्या क्रिया करणे’ आणि ‘चलन करणे’, यांमुळेसुद्धा त्या हालचालींना ‘रेचक’, असे म्हटले जाते.’
(साभार : नाट्यशास्त्र, अध्याय ४, श्लोक २४८)
३. नाट्यशास्त्राचे रचयिता भरतमुनी

अ. ब्रह्मदेवाने पंचम वेद, म्हणजे ‘नाट्यवेद’ याची निर्मिती करून तो भरतमुनींना दिला. भरतमुनींनी या नाट्यवेदाची शास्त्रोक्त रचना करून ‘नाट्यशास्त्र’, हा ग्रंथ लिहिला. नाट्यशास्त्रात एकूण ३६ अध्याय असून ६,००० श्लोक आहेत.
आ. भरतमुनींचा ‘रस सिद्धांत’ प्रसिद्ध आहे. दृश्य पहातांना आपण अंतर्मनातून जो अनुभवतो तो ‘रस’. भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये अष्टरसांची संकल्पना दिली आहे. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात ‘नृत्य आणि नाट्य यांच्या रसनिष्पत्तीसाठीचे भाव, तसेच अभिनयाचे प्रमुख प्रकार’, यांचे शास्त्रोक्त विवेचन दिले आहे, तसेच ‘आदर्श नाट्यगृह कसे असावे ? त्याचे परिमाण कसे असावे ? नाट्यगृहाचे प्रकार’, यांविषयीही वर्णन केले आहे.
इ. भरतमुनी रचित ‘नाट्यशास्त्र’ हा एक परिपूर्ण ग्रंथ असून नाट्यासहित आठही भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींसाठी हा प्रमाणभूत ग्रंथ आहे. ‘नाट्यशास्त्रा’सारख्या महान ग्रंथाची रचना करून भरतमुनींनी नृत्य आणि नाट्य या कलांचे संपूर्ण सार मानवजातीला देऊन ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’चा उपदेश केला आहे.
सारांश : वरील उदाहरणांतून लक्षात येते की, प्राचीन काळापासून गायन, वादन, तसेच नृत्य यांना शास्त्राचा आधार लाभण्यामागे या महान ऋषिमुनींचे योगदान आहे. ऋषिमुनींच्या उच्च भगवद्भक्तीमुळेच त्यांनी कलांना ईश्वरी आराधनेचे एक माध्यम बनवले. ऋषिमुनींमुळेच आजवर भारतीय गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कला ‘शास्त्रीय कला’ म्हणून गौरवल्या जात आहेत. ‘अशा ऋषींची परंपरा लाभणे’, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ऋषिमुनींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
संग्राहक : कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३.१.२०२६)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1002608.html
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ईमेल : [email protected]
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?