सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर विराजमान झाल्याची ध्वनीचित्र-चकती पहातांना उत्तरप्रदेशातील साधकांना आलेल्या अनुभूती !

२९.९.२०२५ या दिवशी उत्तरप्रदेशातील साधकांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर विराजमान झाल्याची ध्वनी-चित्रचकती दाखवण्यात आली. ती पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

भाग १

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. सौ. प्राची जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६२ वर्षे), वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश.

१ अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये अद्वैताची अनुभूती येणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची ध्वनीचित्र-चकती पहातांना ‘संपूर्ण कार्यक्रम एका वेगळ्याच लोकात होत आहे आणि आमची पात्रता नसतांनाही आम्हाला या दैवी कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे’, असे मला वाटले. त्यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. माझे मन निर्विचार झाले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे जेव्हा एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करत होते, तेव्हा ‘त्या सर्वांचे स्थूलदेह वेगळे आहेत; पण ते सर्व जण आतून एकच आहेत’, असे वाटत होते. ‘त्यांच्यामध्ये द्वैत नसून अद्वैत आहे’, असे जाणवले.’

२. सौ. आशा प्रसाद, गया, बिहार.  

२ अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ सभागृहात प्रवेश करताच पांढराशुभ्र प्रकाश दिसणे आणि तो वाढत जाणे : ‘ध्वनी-चित्रचकती पहातांना ‘आम्हीही प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात उपस्थित आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद होऊन माझा भाव जागृत झाला. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या रूपात गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सदैव आमच्या समवेत आहेत’, असे वाटले. सद्गुरु दादांनी सभागृहात प्रवेश करताच एकदम पांढराशुभ्र प्रकाश दिसला आणि तो वाढत होता. या अनुभूतीसाठी मी गुरुदेव आणि सद्गुरु दादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

३. श्री. हरीश सहाय, प्रयागराज, उत्तरप्रदेश. 

अ. ‘पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदी विराजमान झाल्याचा कार्यक्रम पाहून माझा भाव जागृत होऊन माझ्या देहाच्या पेशीपेशींतून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

आ. ‘गुरुसेवा कशी करायला पाहिजे ?’, याचा आदर्श मला शिकायला आणि पहायला मिळाला. सद्गुरु दादांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता !

‘सद्गुरु दादांना जशी अपेक्षित आहे, तशीच सेवा माझ्याकडून करून घ्यावी’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

४. कु. श्रेजल पटेल (वय १४ वर्षे), नटवा, वाराणसी, उत्तरप्रदेश. 

४ अ. ‘श्रीहरि जसे आपले वडील सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती कृतज्ञभावात रहातात, तसेच ‘मलाही रहायला हवे’, असे वाटणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची ध्वनीचित्र-चकती कृतज्ञताभावात पहातांना ‘श्रीहरिदादा (श्री. सोहम् सिंगबाळ, त्यांचा मुलगा) जसे आपल्या वडिलांच्या प्रती कृतज्ञभावात रहातात, तसेच ‘मलाही रहायचे आहे’, असे वाटले. गुरुदेवांची माझ्यावर पुष्कळ कृपा असल्यामुळेच मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि मला साधना करण्यासाठी संपूर्ण मोकळीक देणारे चांगले आई-वडीलही लाभले आहेत.’

५. कु. साक्षी गुप्ता (वय १४ वर्षे), वाराणसी, उत्तरप्रदेश. 

५ अ. ‘आजचा कार्यक्रम पाहून माझे मन भावविभोर झाले होते. जेव्हा सद्गुरु नीलेशदादांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना नमस्कार केला, तेव्हा मला जाणवले, ‘ते प्रत्यक्ष रामसीताच आहेत.’

६. श्री. सुनील कुमार गुप्ता, शिवपूर, वाराणसी, उत्तरप्रदेश. 

६ अ. ध्वनी-चित्रचकती आरंभ झाल्यावर अंतर्मनातून ‘सद्गुरु दादा हेच आजच्या आनंदाचा केंद्रबिंदू आहेत’, असे जाणवणे : ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या कृपेने जेव्हा मी आश्रमात प्रवेश केला, तेव्हा येथील ‘वातावरण एकदम भावपूर्ण आहे’, असे मला वाटत होते. माझा नामजप आपोआप चालू झाला होता. जेव्हा ध्वनीचित्र-चकती चालू झाल्यावर मला अंतर्मनातून जाणवले, ‘सद्गुरु दादा हेच आजच्या आनंदाचा केंद्रबिंदू आहेत.’ संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून सतत अश्रूधारा वहात होत्या. माझे शरीर २ वेळा थरथरले.

(साधकाचे सात्त्विक भाव जागृत झाल्याने असे झाले. – संकलक)

६ आ. प्रेमभाव : सद्गुरु दादांचे प्रेम एवढे अपार आहे की, जेव्हा ते मला भेटतात, तेव्हा माझी साधना आणि व्यवहार अशा सर्व गोष्टींची विचारपूस करतात. ते व्यवहाराच्या संदर्भातही मला आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. त्यामुळे कोणतीही अडचण असली, तरी ती दूर होते.

६ इ. सद्गुरु दादांमध्ये वात्सल्यभाव एवढा आहे की, त्यांच्याकडे कधीही पाहिले, तरी माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात. 

६ ई. जेव्हा पू. नीलेशदादांचा सन्मान होत होता, तेव्हा मला त्यांच्यामागे त्रिदेव (ब्रह्म, विष्णु आणि महेश) दिसले. ते सद्गुरु दादांवर ब्रह्मकमळाच्या पुष्पांचा वर्षाव करत होते. 

(सर्व सूत्रांचा दिनांक २१.९.२०२५)

या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998240.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक