विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्‍या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !

‘माझी आई कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८७ वर्षे) ही मोझांबिक या देशात रहात होती. तिला फुप्फुसाचा कर्करोग झाला होता. २०.६.२०२६ या दिवशी तिचे निधन झाले. तिच्या निधनापूर्वी ५ आठवडे मी तिच्या समवेत होते. ती रुग्णाईत असतांना आणि तिच्या निधनानंतर मला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी

 १. व्यवस्थितपणा 

‘माझ्या आईला व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा यांची आवड होती. तिच्या शेवटच्या आजारपणातही ती नीटनेटकी रहात होती.

२. सहनशील

आईला झालेला फुप्फुसाचा कर्करोग चौथ्या टप्प्यापर्यंत पोचल्यामुळे तिच्यावर उपचार करणे कठीण होते. तिला शेवटचे २ मास मान खाली करून झोपणेही पुष्कळ कठीण झाले होते. त्यामुळे ती संपूर्ण रात्र बसून असे. तेव्हा तिला असह्य वेदना होत असत; पण तिने त्याविषयी कधीही गार्‍हाणे केले नाही.

३. इतरांचा विचार करणे 

आईला त्रास होत असतांना तिला एखाद्या व्यक्तीचा भ्रमणभाष आला, तर आई त्या व्यक्तीची विचारपूस करत असे.

४. विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही साधना करून जीवनाचे सार्थक करणे

माझ्या आईने संपूर्ण जीवनात पुष्कळ कष्ट सहन केले. मोझांबिकसारख्या रज-तमप्रधान देशात राहूनही तिने भक्ती आणि साधना करून जीवनाचे सार्थक केले. तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. तिला कर्करोग झाल्यावर त्या कठीण स्थितीतही ती जपमाळ घेऊन नामजप करत होती. शेवटी तिला हातात जपमाळ घेणे कठीण झाले होते. तेव्हा ती जप करण्याचे यंत्र घेऊन नामजप करत असे.


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि त्यांची साधकांवरील प्रीती !

डॉ. मनोज सोलंकी

‘माझ्या सासूबाई कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी या मोझांबिक या देशात रहात होत्या. वर्ष २०१९ मध्ये एका संतांनी आम्हाला (मी आणि पत्नी सौ. नीता यांना) सासूबाईंना भारतात आणण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही सासूबाईंना भारतात आणले. एकदा आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका सत्संगाला गेलो होतो. तेव्हा माझ्या सासूबाईंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असल्याचे घोषित करण्यात आले. या प्रसंगातून असे लक्षात येते की, ‘एखादा साधक जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असला, तरीही गुरुदेवांचे त्या साधकाकडे बारकाईने लक्ष असते.’

– डॉ. मनोज वसंतलाल सोलंकी (कै. (श्रीमती) रघुवंशी यांचा धाकटा जावई, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६० वर्षे), मडगाव, गोवा. (२८.६.२०२६)

५. मृत्यूची चाहूल लागणे 

आईची आणि माझी पुष्कळ जवळीक होती. ती रुग्णाईत झाल्यावर माझी आठवण काढत होती. मी गोव्याहून मोझांबिक येथे तिच्या घरी गेल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला आणि तिच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. तिला ‘तिचा शेवटचा क्षण जवळ आला आहे’, असे लक्षात आले होते. तिने मला शेवटचे २ दिवस तिच्याजवळ थांबायला सांगितले.

६. आईला आलेल्या अनुभूती

सौ. नीता सोलंकी

६ अ. शरिरावर दैवी कण आढळणे : आईच्या शेवटच्या काही दिवसांत तिचे डोके, पाय आणि शरीर यांवर सोनेरी रंगाचे दैवी कण आढळत होते. तिचे निधन होण्याच्या आदल्या दिवशी तिचे कपाळ आणि पाय यांवर पुष्कळ दैवी कण आले होते.

६ आ. डोक्याला सुगंध येणे : आईला थकवा असल्यामुळे तिला अंघोळ करणे कठीण झाले होते. आम्ही तिचे शरीर पाण्याने पुसत होतो आणि आठवड्यातून एकदा तिला डोक्यावरून अंघोळ घालत होतो. तिच्या डोक्याला सुगंध येत असे.

६ इ. आईच्या केसांना सोनेरी छटा आली होती. 

७. आईचे निधन झाल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. आईचे निधन झाल्यानंतर तिच्या चेहर्‍यावर शांतता जाणवत होती. आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या लोकांनाही तसा अनुभव आला आणि त्यांनी तसे बोलून दाखवले.

आ. आईच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘आई आता काहीतरी बोलेल’, असे मला वाटत होते.

इ. तिच्या खोलीत पुष्कळ थंडावा आणि शांतता जाणवत होती, तसेच तिच्या खोलीत ‘शिव, शिव’ असा नामजप ऐकू येत होता. आई शिवभक्त होती आणि ती भगवान शिवाचा जप करत असे.

ई. आईचे निधन झाल्यानंतर १२ घंट्यांनंतरही तिचे पार्थिव कडक न होता त्यात लवचिकता जाणवत होती. आम्ही पार्थिवाला अंघोळ घालत असतांना आम्हाला तसे जाणवले.

उ. आईचे निधन झाल्यावर तिच्या छायाचित्राकडे पाहून मला चांगले वाटत होते. दुसर्‍या दिवशी तिच्या छायाचित्रात मला आणखी सकारात्मक पालट जाणवला. आईचे छायाचित्र लाकडी चौकटीत (फ्रेममध्ये) बसवल्यावर दुसर्‍या दिवशी त्यात चांगली स्पंदने जाणवत होती.

आईने लहानपणापासून माझ्यावर भक्तीचे संस्कार केले. त्यामुळे मी साधना करू शकत आहे. अशा आईच्या पोटी मला जन्म मिळाल्याबद्दल मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. नीता मनोज सोलंकी (कै. (श्रीमती) रघुवंशी यांची धाकटी मुलगी), मडगाव, गोवा. (२८.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक