विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम

विद्यार्थ्याला पारितोषिक देतांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, त्यांच्या उजव्या बाजूला सद्गुरु सत्यवान कदम आणि अन्य मान्यवर

पाचल, ११ जानेवारी (वार्ता.) – आजकाल विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे; मात्र हे धर्मशिक्षण घरात वा अन्य कुठेही दिले जात नाही. मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नैतिकता, चांगले संस्कार मिळत असतात. यांमधूनच भविष्यात चांगली आणि सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. यासाठी विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.
पितांबरी कृषी पर्यटन, तळवडे यांच्या वतीने मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात सद्गुरु सत्यवान कदम बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरीचे कार्यकारी अधिकारी श्री. माधव पुजारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद भारद्वाज, तळवडे गावाच्या सरपंच सौ. गायत्री साळवी, पाचल केंद्रप्रमुख श्री. अनाजी मासये, श्री. आप्पा साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले की, रामायणामध्ये मारुतीरायाचे स्थान फार महत्त्वाचे आहे. आपणास यापासून बर्‍याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपण मारुतीरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले जीवन उज्ज्वल करावे.  या वेळी त्यांनी ‘प्रत्येक शाळेत बालसंस्कारवर्ग चालू करणार आहोत, असेही  सांगितले.
श्री. गोविंद भारद्वाज यांनी बालसंस्कार वर्गांसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याविषयी आश्वस्त केले. या स्पर्धेत एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  ४० विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.