बांगलादेशातील तथाकथित विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तथाकथित अशासाठी की, तो ३२ वर्षांचा होता. या वयात विद्यार्थी अवस्था पुष्कळ मागे पडलेली असते आणि सांसारिक दायित्व चालू झालेले असते. अर्थात् कन्हैया कुमारसारख्या आणि गावावरून ओवाळून टाकलेल्या साम्यवाद्यांना कुठलेही दायित्व घेण्याची सवय नसल्यामुळे ते या नियमाला अपवाद असतात. हा हादीसुद्धा याच कंपूतला होता; पण ५५ वर्षांचे काँग्रेसचे राहुल गांधी जर ‘युवा नेता’ असू शकतात, तर हादीने ‘विद्यार्थी नेता’ असायला काहीच हरकत नसावी. असो.

१. हादीच्या मृत्यूमागे भारतविरोधी शक्तींचा डाव !
भारतविरोधात प्रक्षोभक भाषणे करणारा हा हादी ईशान्य भारतातील ७ राज्ये, बंगाल आणि बिहार यांचा काही भाग कह्यात घेऊन ‘आम्ही ‘ग्रेटर बांगलादेश’ची निर्मिती करू’, अशी उघड वल्गना करत होता. अर्थात् असे स्वप्नरंजन शेख मुजीब यांच्यापासून अनेक बांगलादेशी वारंवार करत आले आहेत. ‘भारताच्या विरोधात गरळ ओकणार्या हादीला पाकिस्तानातील आतंकवाद्यांना ७२ हुरांकडे पाठवणार्या ‘अज्ञात व्यक्तींनी’च संपवले असावे’, असे भारतात अनेकांना वाटले. बांगलादेशात तर ‘हादीची हत्या भारतानेच केली’, या भावनेतून संतापाची लाटच उसळली आणि नेहमीप्रमाणे हिंदूंवर अमानुष अत्याचार चालू झाले.
थोडक्यात काय, तर भारतविरोधी शक्तींना हवे ते नेपथ्य बरोबर रचले गेले, म्हणजे असे की, भारतविरोधात काहीही बरळला म्हणून एका भुक्कड विद्यार्थी नेत्याला मारण्याची उठाठेव करण्याइतक्या भारतीय गुप्तहेर संघटना मूर्ख नाहीत; कारण त्याला मारून साध्य करण्यासारखे भारताकडे काहीही नव्हते. मग त्याच्या मृत्यूमुळे कुणाचा लाभ होणार होता ?

२. चीनमध्ये ‘डीप स्टेट’ला मिळालेल्या धड्यातून त्याने भारताच्या विरोधासाठी बांगलादेशात घडवलेली उलथापालथ
(‘डीप स्टेट’ : जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाचे सरकार आणि त्या देशाची अर्थव्यवस्था स्वतःच्या मुठीत ठेवण्यासाठी धडपडणारा प्रभावशाली लोकांचा गट)
शेख हसीना यांचे बांगलादेशातील सरकार पाडण्यामागे अनेक शक्तींचा सहभाग होता. यातील काही लिंबू टिंबू शक्ती होत्या. उदाहरणार्थ शेख हसीना यांनी ज्यांचा वारंवार पराभव केला, त्या खालिदा झिया यांची ‘बांगलादेश नॅशनल पार्टी (बी.एन्.पी.)’ आणि आंदोलनासाठी ज्यांना पुढे करण्यात आले, ते साम्यवादी विद्यार्थी. हसीना यांना घालवणारी खरी महाशक्ती होती अमेरिकन ‘डीप स्टेट, तसेच शेख हसीना हे एक प्यादे होते, ज्याला हटवून त्यांनी शह दिला होता भारताला ! अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे यांनी स्वतःचे उत्पादन क्षेत्र चीनला हलवून प्रचंड लाभ कमावण्याच्या नादात चीनला पुष्कळ मोठे केले. त्यांचा असा समज होता की, समृद्धी आणि सुबत्ता आली की, चीनही पाश्चात्त्य राष्ट्रांची लोकशाही, खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण ही मूल्ये स्वीकारून त्यांच्या कंपूत सामील होईल; पण चीनने स्वतंत्र मार्ग चोखाळून आर्थिक शक्तीसह सैन्य, भूराजकीय अन् तंत्रज्ञान यांची शक्तीही वाढवली आणि आज तो अमेरिकेचा स्पर्धक म्हणून उभा राहिला आहे. ‘चीन पाश्चात्त्य जीवनदृष्टीचा स्वीकार करील’, ही अपेक्षाही फोल ठरली असून त्यांच्या प्राचीन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोग तिथे चालू झाला आहे.
‘सांस्कृतिक क्रांती’च्या काळात मोडकळीला आलेली ‘कन्फ्युशिअस’ची मंदिरे चीनच्या प्राचीन संस्कृतीची केंद्रे ठरत आहेत आणि इतिहासातील ‘मिडल किंग्डम’ पुन्हा उभे करण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली आहे. या उदाहरणावरून धडा घेतलेल्या ‘डीप स्टेट’ने आता भारताच्या वाढत्या प्रगतीला पायबंद घालणे महत्त्वाचे आणि तातडीचे असल्याचे ठरवले आहे. चीनच्या वाढत्या शक्तीचा धोका आपण वेळीच ओळखला नाही आणि पश्चिमेच्या वर्चस्वाला एक मोठे आव्हान उभे राहू दिले. ‘भारताविषयी मात्र हे होऊ नये, याची खबरदारी आता घेतलीच पाहिजे’, हा विचार प्रबळ झाला आहे.
म्हणूनच भारताची आर्थिक, सैन्य, भूराजकीय, तंत्रज्ञान यांच्याविषयीची शक्ती वाढत असतांनाच सांस्कृतिक पुनरुत्थानाचा निर्धार केलेल्या मोदींना हटवून ‘रेजीम चेंज’चा (शासन पालटाचा) स्वतःचा हातखंडा प्रयोग भारतात करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
बांगलादेशाला पाकच्या विळख्यात ओढून ‘इस्लामी संघराज्य’ निर्माण करण्याचे मनसुबे !

या प्रकारात लाभ-हानी कुणाची आहे ? बांगलादेशाचा जन्मच मुळी भाषिक अस्मितेने धार्मिक अस्मितेवर मात केल्यामुळे झाला. हा घाव पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्यांच्या, विशेषतः सैन्याच्या मनात ताजा आहे. तिथे जितकी भारतविरोधी भावना भडकत जाईल, तितका जिहादी धार्मिक उन्माद प्रक्षोभक होऊन जिहादी इस्लामचा प्रभाव टोकाला नेणे ‘जमात ए इस्लामी’ला शक्य होईल. मग ‘बांगलादेशाला पाकिस्तानच्या विळख्यात ओढून ‘इस्लामी संघराज्य’ निर्माण करावे आणि वर्ष १९७१ चा प्रतिशोध घेऊन नायक बनावे’, अशी मुनीरची योजना असावी. त्याला ‘डीप स्टेट’ खतपाणी घालू शकते. बांगलादेशात जितकी हिंसा भडकेल, तितक्या तिथे योजलेल्या निवडणुका घेणे अशक्य होईल, म्हणजेच आयतेच मिळालेले सत्तापद यापुढेही सुखेनैव भोगत रहाणे, हे महंमद युनूस यांना शक्य होईल. ‘डीप स्टेट’लाही स्वतःचे प्यादे सत्तापदी रहाणे सोयीचे असेल. निवडणुकीत ज्यांना सत्ता मिळणे अपेक्षित आहे त्या बांगलादेश नॅशनल पार्टीची मात्र निराशा होईल. ‘हादीची हत्या महंमद युनूस यांनीच घडवून आणली’, हा त्याच्या भावाने केलेला आरोप आणि या प्रकरणापासून ‘बी.एन्.पी’ने राखलेले अंतर लक्षात घेण्यासारखे आहे.
– श्री. अभिजित जोग
३. भारतविरोधी षड्यंत्राचे टप्पे
अ. पाकला हाताशी धरून युद्धज्वर निर्माण करणे आणि बांगलादेशातील आतंकवाद्यांना मोकळे रान देणे : बांगलादेशात विद्यार्थ्यांना भडकवून महंमद युनूससारखे प्यादे पुढे करून जे जमले, ते भारतात शेतकरी आंदोलन, शाहीन बाग यांसारखे अनेक प्रयोग करून आणि केजरीवाल, राहुल गांधी, वांगचुक यांसारखी प्यादी पुढे करूनही साध्य होत नाही म्हटल्यावर एक वेगळा प्रयोग केला जात आहे. ‘फील्ड मार्शल’ असीम मुनीरला हाताशी धरून पाकिस्तानात नव्याने युद्धज्वर निर्माण करायचा आणि बांगलादेशातील भारताशी मैत्री राखणारे शेख हसीना सरकार घालवून पाकिस्तानवादी ‘जमात ए इस्लामी’सारख्या इस्लामी आतंकवाद्यांना मोकळे रान देऊन तिथे भारतविरोधाचा आगडोंब उसळवायचा, हा होता या प्रयोगाचा पहिला टप्पा !
आ. भारताला एकाच वेळी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या युद्धात अडकवण्याची योजना ! : आता दुसरा टप्पा चालू झाला आहे, ज्यात भारताला एकाच वेळी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही आघाड्यांवर युद्धात अडकवण्याची योजना आखली गेली आहे. हे युद्ध भारताने चालू करावे, म्हणजे ‘युद्धखोर’ आणि ‘हुकूमशाही’ भारतावर आर्थिक निर्बंध लादता येतील आणि पाकिस्तान अन् बांगलादेश यांना प्रचंड आर्थिक, तसेच सैन्य साहाय्य देऊन हे युद्ध प्रदीर्घ काळ चालेल, याची खात्री करता येईल. परिणामी भारताच्या अर्थव्यवस्थेला अनेक दशके मागे ढकलून भारताच्या प्रगतीचा धोका कायमचा संपवता येईल. रशिया-युक्रेन युद्धाचीच ही ‘टेम्पलेट’ (साचा) भारताविरुद्ध वापरण्याची ही योजना आहे. भारत आणि चीन यांनी निर्बंध धुडकावून रशियाकडून तेल घेतले नसते, तर रशियाच्या अर्थव्यवस्थेची पार वाताहात झाली असती, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
हादीनंतर दुसर्या एका विद्यार्थी नेत्यावर तसेच आक्रमण झाले. या प्रत्येक आक्रमणासह भारतविरोधी भावना अधिकाधिक भडकत जातील. हिंदूंवरील अत्याचार वाढत जातील आणि बांगलादेशविरुद्ध सैन्य कारवाई करण्यासाठी मोदींवर येणारा दबावही टिपेला जाईल. याच वेळी पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या माध्यमातून एखादी मोठी घटना घडवण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो. अशा प्रकारे भारताने युद्धाला प्रारंभ करावा, यासाठी हा सापळा लावण्यात येत आहे.
४. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाळगलेला संयम लक्षात घ्या !

या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून देशहिताचे रक्षण करण्यासाठी मोदी, शहा, राजनाथ सिंह, डॉ. जयशंकर, अजित डोवाल हा चमू समर्थ आहे. देशाने भावनेच्या भरात वहावत जाऊन अवाजवी दडपण न निर्माण करता नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभे रहायला हवे; कारण हा सगळा प्रकार ‘मोदी की शिकार के लिये हिंदुओं पर अत्याचार’ (मोदींच्या शिकारीसाठी हिंदूंवर अत्याचार), असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळीतून बाहेर पडावे, यासाठी अफझलखानाने श्री तुळजाभवानीची मूर्ती फोडली, तरी महाराजांनी संयम पाळला होता, हे विसरता कामा नये. ज्यांचा जन्मच हिंदुद्वेषाचे राजकारण करण्यात गेला, त्यांनाही आता हिंदूंच्या प्रेमाचे उमाळे येऊ लागतील. यामागचे विषारी कारस्थान ओळखायला हवे. योग्य वेळ येताच सगळे हिशेब चुकते केले जातील, हे नक्की !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !