‘एपस्टीन फाइल्स’ : लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी यांविषयी पाश्चात्त्यांचे धक्कादायक वास्तव !

पाश्चात्त्य देशांमध्ये मुली, महिला आणि अल्पवयीन मुले यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना काही दिवसांनी उघड होतात. यातून चर्च संस्थाही सुटलेली नाही. अमेरिकी सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या ‘एपस्टीन फाईल्स’च्या धारिकांमधून अमेरिकेत धनाढ्य गुन्हेगार कशा प्रकारे अल्पवयीन मुली, महिला यांच्या लैंगिक शोषणाची यंत्रणा निर्माण करतो ? त्यांची तस्करी लोकप्रतिनिधी, श्रीमंत उद्योगपती आणि समाजातील प्रतिष्ठित यांना सहभागी करून घेतो, मुलींना लैंगिक गुलाम बनवून त्यांची तस्करी करतो, ही सर्व भयावह स्थिती उघड करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण जेफ्री एपस्टीन प्रकरणाची व्याप्ती, या प्रकरणांना प्रारंभ कधी आणि कुठे झाला ? जेफ्री एपस्टीन याची पार्श्वभूमी ही सूत्रे पाहिली. या लेखात पुढील भाग पाहू.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/991345.html

‘एपस्टीन फाइल्स’

११. नवीन कागदपत्रे प्रकाशित

श्री. यज्ञेश सावंत

‘एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’नुसार अमेरिकी न्याय विभागाला १९ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व कागदपत्रे प्रसिद्ध करायची होती; मात्र शेवटच्या क्षणी न्याय विभागाने सांगितले की, त्यांना आणखी १० लाख नवीन कागदपत्रे सापडली आहेत, ज्यांची पडताळणी करण्यासाठी त्यांना काही आठवड्यांचा वेळ लागेल. आतापर्यंत सहस्रो पाने सार्वजनिक करण्यात आली आहेत, ज्यात ई-मेल, ‘फ्लाईट लॉग’ (विमान प्रवासाचे दाखले), छायाचित्रे आणि साक्षीदारांचे जबाब यांचा समावेश आहे. ६८ नवीन छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ज्यात बिल गेट्स, सर्गे ब्रिन (गूगलचे संस्थापक), नोम चॉम्स्की (अमेरिकी प्राध्यापक) आणि स्टीव्ह बॅनन (वरिष्ठ पत्रकार) यांसारख्या दिग्गज व्यक्ती एपस्टीनसह किंवा त्याच्याशी संबंधित कार्यक्रमांत दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याविषयीची माहिती नवीन धारिकांमध्ये आहे. ट्रम्प यांचा उल्लेख अनेकदा आला आहे. वर्ष १९९० मध्ये एका विमान प्रवासाचा आणि लिमोझिन चालकाच्या जबाबाचा उल्लेख आहे; मात्र न्याय विभागाने ‘यातील काही सनसनाटी आरोपांची निश्चिती केलेली नाही’, असे सांगितले आहे.

कागदपत्रांमध्ये अल्पवयीन मुलींच्या तस्करीची साखळी कशी चालायची ? याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. न्याय विभागाचे २०० विश्लेषक दिवस-रात्र या कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. पीडितांची ओळख लपवण्यासाठी अनेक ठिकाणी माहिती ‘ब्लॅक आऊट’ करण्यात आली आहे.

अमेरिकेतील लोकशाहीवादी आणि प्रजासत्ताक पक्षांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. काही खासदारांनी ही माहिती लपवल्यास न्याय विभागावर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. येत्या काही आठवड्यांत उर्वरित १० लाख कागदपत्रे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याविषयीचे उल्लेख !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्पडिसेंबर २०२५ मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या ‘एपस्टीन फाइल्स’ मध्ये ट्रम्प यांच्याविषयी अनेक महत्त्वाचे उल्लेख आणि दावे समोर आले आहेत.

१. विमान प्रवासाचे तपशील

नवीन कागदपत्रांनुसार डॉनल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीनच्या खासगी विमानाने पूर्वी ठाऊक असलेल्या संख्येपेक्षा अधिक वेळा प्रवास केला होता. एका सरकारी अधिवक्त्याच्या ई-मेलनुसार ट्रम्प यांनी वर्ष १९९३ ते १९९६ या कालावधीत किमान ८ वेळा या विमानाने प्रवास केला. यातील ४ प्रवासांमध्ये एपस्टीनची साथीदार गिस्लेन मॅक्सवेलसुद्धा त्यांच्यासमवेत होती. एका विशिष्ट उड्डाणात ट्रम्प, एपस्टीन आणि एक २० वर्षांची अज्ञात महिला (जिची ओळख लपवण्यात आली आहे) हे तिघेच प्रवासी होते.

२. पीडितांचे आरोप आणि साक्ष

कागदपत्रांनुसार एका साक्षीदाराने असा दावा केला आहे की, एपस्टीन एकदा एका १४ वर्षांच्या मुलीला ट्रम्प यांच्या ‘मार-ए-लागो’ रिसॉर्टवर घेऊन गेला होता आणि तिथे तिची ओळख ट्रम्प यांच्याशी करून दिली होती.

३. छायाचित्रे

‘फाइल्स’मध्ये ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, जेफ्री एपस्टीन आणि गिस्लेन मॅक्सवेल यांची एकत्र छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ही छायाचित्रे जुनी असून ती सार्वजनिक क्षेत्रात आधीपासूनच उपलब्ध होती.

४. न्याय विभाग आणि ट्रम्प यांची भूमिका

न्याय विभागाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे, ‘फाइल्स’मधील काही दावे वर्ष २०२० च्या निवडणुकीपूर्वी जाणीवपूर्वक पसरवण्यात आले होते आणि त्यात तथ्य नाही. ट्रम्प यांच्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप या फाइल्समध्ये करण्यात आलेला नाही.

– श्री. यज्ञेश सावंत

१२. मोठ्या मंडळींना शिक्षा नाही !

अनेक मोठी मंडळी ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये दिसतात; मात्र शिक्षा कुणालाच नाही. त्या मोठ्या मंडळींची अल्पशी तात्कालीक हानी होईल; मात्र त्यांच्यावर विशेष परिणाम होणार नाही, असे दिसते. या प्रकरणात सर्वांत मोठी शिक्षा झालेली व्यक्ती, म्हणजे गिस्लेन मॅक्सवेल. ती एपस्टीनची जवळची सहकारी होती. तिला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. अल्पवयीन मुलींची तस्करी करणे आणि त्यांना लैंगिक शोषणासाठी एपस्टीनकडे नेण्यास साहाय्य करणे, या आरोपांखाली तिला वर्ष २०२१ मध्ये दोषी ठरवण्यात आले.

१३. ब्रिटनचे अँड्र्यू यांनी राजकुमाराचे पद गमावणे

ब्रिटनचे अँड्र्यू

ब्रिटनचे राजकुमार अँड्र्यू यांना आता त्यांचे ‘प्रिन्स’ हे पद गमवावे लागणार आहे. त्याचसमवेत विंडसरच्या रॉयल लॉज या महालातूनही त्यांना बाहेर पडावे लागणार आहे. लैंगिक गुन्ह्यातील दोषी जेफ्री एप्स्टीनसमवेतच्या त्यांच्या संबंधांविषयी गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या सखोल चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षानुवर्षे चाललेले अनेक मुलींच्या शोषणाचे हे प्रकरण होते. एकीकडे धनाढ्य व्यक्ती आणि दुसरीकडे अल्पवयीन मुली. यातील बहुतांश मुलींची पार्श्वभूमी ही सारखीच होती. कुणी आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते, कुणाला कौटुंबिक समस्या होत्या, कुणाला मानसिक ! त्यांच्या याच गोष्टीचा कदाचित अपलाभ घेत त्यांचे शोषण करण्यात आलेले दिसते.

१४. गिस्लेन मॅक्सवेल हिची काळी कृत्ये

गिस्लेन मॅक्सवेल

गिस्लेन मॅक्सवेल हिचा गर्भश्रीमंत ते कारागृह हा प्रवास धक्कादायक होता. गिस्लेन हिचे वडील मोठे उद्योजक होते. ती श्रीमंत घराण्यातील होती; मात्र जेफ्री एपस्टीनच्या भेटीनंतर ती त्याच्या काळ्या कृत्यांसाठी साहाय्यक बनली. एपस्टीनच्या मृत्यूनंतर त्याची मैत्रीण गिस्लेन ही चर्चेत आली. तिला जुलै २०२० मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील घरातून अटक करण्यात आली; कारण तिने एपस्टीनला अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात साहाय्य केले, मुलींची निवड आणि त्यांना सिद्ध केल्याचा आरोप होता. डिसेंबर २०२१ मध्ये न्यूयॉर्क सिटीतील ज्युरींनी तिला ६ आरोपांपैकी ५ मध्ये दोषी ठरवले. त्यात सर्वांत गंभीर आरोप म्हणजे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक तस्करीचा होता. त्यामुळे त्यांना २० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या गिस्लेन हिने एपस्टीनची अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली मित्रांशी ओळख करून दिली, ज्यात बिल क्लिंटन आणि अँड्र्यू माऊंटबॅटन विंडसर यांचा समावेश होता. एपस्टीनसाठी मुली शोधण्याची तिची एक ‘ट्रिक’ (क्लृप्ती) होती. ती ज्या मुली शोधायची, त्या गरीब घरातल्या असायच्या, अडचणीत सापडलेल्या असायच्या किंवा कधी कधी आधीच लैंगिक शोषणात फसलेल्या असायच्या. ती याच मुलींना सांगायची, ‘तुमच्यासारख्या आणखी मुली तुम्ही आणल्या, तर तुम्हाला अधिक पैसे मिळतील.’ आधी या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी एपस्टीन आणि गिस्लेन त्या मुलींना भेटवस्तू द्यायचे, शाळेचे शुल्क भरू, असे सांगायचे आणि एपस्टीनचा ‘मसाज’ करण्यासाठी पैसे द्यायचे.

सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले, ‘एपस्टीन हा या मुलींना हात लावायचा आणि गिस्लेन भासवायची की, हे फार सामान्य आहे, असेच चालते.’

कॅरोलिन या साक्ष देणार्‍या महिलेने म्हटले की, तिने अशा प्रकारचा मसाज एपस्टीनला न्यूनतम १०० वेळातरी दिला असेल आणि जेव्हा तिचे वय वाढले अन् ती लहान राहिली नाही, तेव्हा त्यांनी तिचे येणे बंद केले.

१५. शोषणाचे उच्चांक

जेफ्री एपस्टीनच्या विरोधात अनेक पीडित मुलींनी हानीभरपाईची मागणी करत दिवाणी खटलेही प्रविष्ट केले होते. ब्रॅड एडवर्ड्स हे त्यांचे ‘अ‍ॅटर्नी’ म्हणून काम पहात होते. त्यांनी म्हटले, ‘हे इतकी वर्षे अशा प्रकारे एखादी गोष्ट चालू रहाणे, हे अविश्वसनीय होते. हे एखाद्या ‘पिरॅमिड’सारखे होते. एखादी मुलगी चुकून घरात आली आणि तिचे शोषण झाले, असे ते नव्हते. सगळे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने झाले आणि हे आम्हाला न्यायालयात सिद्ध करायचे होते.’

गिस्लेन मॅक्सवेल ही ‘रिक्रूटर’ (मुलींना भरती करून घेणारी) होती. तिच्याखेरीज अजूनही काही जणी होत्या. एका अल्पवयीन मुलीला विचारले, ‘तू येथे कशी पोचलीस ?’ तिने एकीचे नाव सांगितले. तिला विचारल्यावर अजून एकीचे. अनेकींनी ५ ते ६ दुसर्‍या मुलींना आणले होते. हे सगळे एखाद्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे पसरले होते.

एडवर्ड्स यांनी एपस्टीनचे वर्णन एक ‘गूढ व्यक्तीमत्त्व’ म्हणून केले, जो दोन स्वतंत्र आयुष्य जगत होता. एका आयुष्यात तो प्रतिदिन महिला आणि मुली यांवर लैंगिक अत्याचार करत होता, तर दुसर्‍या आयुष्यात तो राजकारणी, राजघराण्याचे सदस्य, उद्योग, शैक्षणिक अन् वैज्ञानिक क्षेत्रांतील दिग्गजांशी उठबस करत होता.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल.

पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996631.html