शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. शहरी नक्षलवादाचे स्वरूप

‘नक्षलवादी हे जंगलात आणि डोंगराळ भागात रहातात. हिंसात्मक कारवायांनी देशाच्या सर्वसाधारण १८ राज्यांमधील १५० जिल्ह्यांमध्ये त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला, तसेच सरकारच्या व्यवस्था अस्ताव्यस्त केल्या. त्यांना संपवण्यासाठी अनेक रणनीती बनवल्या गेल्या, तरीही त्यांनी वर्ष २०१४ पर्यंत देशात उघडपणे हिंसाचार केला. वर्ष २०१४ मध्ये भारतात केंद्रीय सत्तेमध्ये परिवर्तन झाले. त्यानंतर नक्षलवादाच्या विरोधात विशेष नीती बनवण्यात आली. त्यानुसार नक्षलवादाला ओहोटी लागली; पण दुसरीकडे त्याच्या समांतर ‘शहरी नक्षलवाद’ वाढू लागला. या नक्षलवाद्यांच्या हातात स्थुलातून दिसणारे शस्त्र नाहीत. त्याऐवजी प्रचार-प्रसार, लेखणी आणि प्रसारमाध्यमांशी लढण्याची शक्ती ही शस्त्रे आहेत. दूरवर जंगलात रहाणार्‍या नक्षलवाद्यांचे समर्थन करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे.


डॉ. रेणुका तिवारी यांचा परिचय

डॉ. रेणुका तिवारी

रांची (झारखंड) येथील डॉ. रेणुका तिवारी या ‘रांची सिटीझन फोरम’च्या उपाध्यक्षा आहेत. त्यांनी शहरी नक्षलवादावर ‘अलविदा लाल सलाम’ हे पुस्तक लिहिले आहे. भारताच्या ‘नीती आयोगा’ने हे पुस्तक त्यांच्या ग्रंथालयात ठेवले असून ‘राष्ट्राला समर्पित हे पुस्तक निश्चितपणे नीती निर्मिती करणार्‍यांना साहाय्यभूत होईल’, अशा शब्दांमध्ये त्याचा गौरव केला आहे.

२. शहरात राहून देशविरोधी कारवाया

वर्ष २००४ मध्ये विविध साम्यवादी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या रूपात एकत्र आले. त्यांनी एका पत्रकाद्वारे घोषणा केली, ‘प्रामुख्याने जंगलात रहाणार्‍या नक्षलवाद्यांचे राजकीय आणि कायदेशीर स्तरावर समर्थन केले पाहिजे. आता शहरांमध्ये रहाणारे बुद्धीजीवी, अधिवक्ते, प्राध्यापक, विद्यार्थी, महिला, दलित, अल्पसंख्यांक समुदायाचे लोक यांच्यापैकी नेतृत्व शोधायचे आहे.’ त्यानुसार त्यांनी त्यांचे काम करण्यास आरंभ केला. त्यात त्यांना बरेचसे यश मिळाले. शहरी नक्षलवादी शहरात राहून लेखन आणि प्रचार यांच्या माध्यमातून देशविरोधी कारवाया करतात. त्यांना अनुकूल नसणार्‍या कायद्याला विरोध करणे आणि हिंदु धर्मावर आघात करणे, हे काम ते प्रामाणिकपणे करतात. त्यासाठी त्यांनी सर्व देशविरोधी संघटनांशी हात मिळवणी केली आहे. सरकारला हे दिसत असूनही त्यांना थेट हात लावण्याचे धाडस त्यांच्याकडे नाही.


शहरी नक्षलवाद्यांची खोटी कथानके

 

वर्ष २०१७ मध्ये कोरेगाव भीमा प्रकरणात शहरी नक्षलवाद समोर आला. त्यानंतर पाद्री स्टेन स्वामी आणि एक महिला कार्यकर्ती दयामनी बार यांना अटक करण्यात आली. त्यांना आधीच काहीतरी आजार होता. त्यामुळे पाद्री स्टेनचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याविषयी दुष्प्रचार करण्यात आला आणि खोटे कथानक रचण्यात आले. सध्या पाद्री स्टेन स्वामीला झारखंडच्या शहरी नक्षलवाद्यांनी एका हुतात्म्याचा दर्जा दिला आहे. झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना विविध घोटाळ्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्यांच्यासाठीही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. जमशेदपूरमध्ये इरफान नावाचा चोर गावकर्‍यांच्या मारहाणीत मारला गेला. त्यालाही हुतात्मा ठरवण्यात आले. त्यानंतर त्याला आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी ५ ते १० लाख रुपयांचे साहाय्य केले. झारखंडमध्ये धर्मांधांच्या संघटना आणि ख्रिस्ती प्रचारक उघडपणे देशविरोधी कारवाया करत आहेत. – डॉ. रेणुका तिवारी

३. ख्रिस्ती प्रचारक आणि शहरी नक्षलवादी यांची युती 

वर्ष २०००-२००१ मध्ये झारखंड राज्य अस्तित्वात आले, तेव्हाच झारखंडमधील शहरी नक्षलवादाचा आरंभ झाला. त्या वेळीही ख्रिस्ती प्रचारक धर्मांतर करण्यात कार्यरत होते. झारखंडमधील शहरी नक्षलवाद्यांना ख्रिस्ती प्रचारकांचा विशेष पाठिंबा आहे. ते त्यांना पैसा आणि साधने पुरवतात. या शहरी नक्षलवादी संघटना शहरातील विविध स्वयंसेवी संस्थाच्या समवेत कार्य करतात. आतापर्यंत त्यांनी शहरात असलेले साम्यवादी विचारवंत, लेखक आणि पत्रकार यांच्या सहकार्याने मोठमोठे विकास प्रकल्प बंद पाडले आहेत. त्यात ‘कोयल कारु प्रोजेक्ट’ एक फार मोठा प्रकल्प होता. हा प्रकल्प सर्वाधिक धर्मांतर होणार्‍या आदिवासीबहुल क्षेत्रात होणार होता. यासवमेतच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून होणारी ‘देतरहाट फील्ड फायरिंग रेंज योजना’ही शहरी नक्षलवाद्यांनी बंद पाडली. वर्ष २०१७ मध्ये महाराष्ट्रात कोरेगाव भीमाची दंगल झाली. त्यामध्ये संपूर्ण देशातील शहरी नक्षलवादी मिळून केंद्र सरकारच्या विरोधात षड्यंत्र रचत होते. त्यात झारखंड येथील शहरी नक्षलवाद्यांचा संबंध समोर आला. पाद्री स्टेन स्वामी यांनी हिंदु कायद्यांना विरोध करण्याविषयी ख्रिस्ती प्रचारकांना चिथावणी दिली. त्यांचे रांचीमधील बगैचा नावाचे केंद्र हे केवळ देशविरोधी हालचालींचेच केंद्र बनले होते.

५. आदिवासींचे ‘डी लिस्टिंग’ अभियान

ख्रिस्ती प्रचारकांनी दक्षिण छोटा नागपूर प्रमंडलाचे पूर्णतः ख्रिस्तीकरण केल्यामुळे तेथे एकप्रकारे मणीपूरसारखीच स्थिती होणार आहे. धर्मांतराच्या विरोधात मूळ आदिवासींनी दंड थोपटले आहे. धर्मांतरित आदिवासी लोकांना अनुसूचित जमातीच्या सूचीतून वगळण्यासाठी आदिवासींच्या ‘जनजाती सुरक्षा मंच’ या संघटनेने राष्ट्रीय स्तरावर ‘डी लिस्टिंग’ अभियान चालू केले आहे. ‘धर्मांतरितांच्या सर्व सरकारी सुविधा काढून घ्याव्या आणि त्यांना या सूचीतून काढावे’, अशी ही मागणी आहे. या अभियानाला ख्रिस्ती प्रचारक आणि शहरी नक्षलवादी विरोध करत आहेत. त्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी एक परिपूर्ण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.’

– डॉ. रेणुका तिवारी, उपाध्यक्ष, रांची सिटीझन फोरम, झारखंड.