आज दिनांकानुसार ‘शिवराज्याभिषेक दिन’ आहे. त्या निमित्ताने…
विश्व वन्दिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था । और पुनराभिषिक्त होनेवाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था ।।
६ जून हा दिवस केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण हिंदु समाजाच्या स्वाभिमानाचा आणि हिंदुत्वाच्या तेजस्वी इतिहासाच्या अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि अनेक वर्षे गुलामी सहन करणार्या हिंदूंना स्वतःचे स्वतंत्र राज्य उभे राहू शकते, हा विश्वास मिळाला. हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्य यांच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ होता; मात्र दुर्दैवाने आज काही लोक इतिहास अभ्यासून बोलण्यापेक्षा चर्चेत रहाण्यासाठी काहीही वक्तव्य करतांना दिसतात. काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘महाराजांना पायाच्या अंगठ्याने गंधटिळा लावण्यात आला’, असे विधान केले. याविषयी त्यांना हा कोणता स्वप्नदृष्टांत झाला होता, हे त्यांनाच माहिती; पण अशा प्रकारची वक्तव्ये करतांना इतिहासाचा आधार मात्र कुठेच घेतलेला दिसत नाही. समाजमाध्यमांवरही अनेक जण अर्धवट माहिती घेऊन शिवराज्याभिषेकावर प्रश्न उपस्थित करतांना दिसतात.
खरेतर शिवराज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ऐतिहासिक क्षण ! त्यामुळे या विषयावर पसरवल्या जाणार्या चुकीच्या गोष्टी, गैरसमज आणि खोट्या दाव्यांचे ऐतिहासिक संदर्भांसह खंडण करणे, हीच काळाची आवश्यकता आहे.
१. छत्रपती शिवाजी महाराज आधीपासूनच स्वराज्य चालवत होते, मग राज्याभिषेकाची आवश्यकताच काय होती ?
आजही अनेक लोक प्रश्न विचारतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे गड होते, सैन्य होते, लाखो लोकांचा पाठिंबा होता, मग राज्याभिषेकाची आवश्यकता काय होती ? पण हा प्रश्न विचारतांना त्या काळाची परिस्थिती समजून घ्यावी लागते. त्या वेळी भारतात मोगल, आदिलशाही, कुतूबशाही, निजाम अशा इस्लामी सत्ता होत्या. हिंदु राजे होते; पण स्वतःला स्वतंत्र ‘हिंदु सम्राट’ म्हणून घोषित करण्याचे धाडस कुणी करत नव्हते. छत्रपती शिवरायांना केवळ काही गड जिंकून राजा बनायचे नव्हते. त्यांना हिंदूंचे स्वतंत्र आणि स्वाभिमानी राज्य उभे करायचे होते. म्हणूनच राज्याभिषेक करणे महत्त्वाचे होते; कारण राज्याभिषेक, म्हणजे हे राज्य आता कुणाच्या गुलामीत नाही, अशी उघड घोषणा होती. हा सोहळा केवळ रायगडापुरता मर्यादित नव्हता, तर त्याचा संदेश दिल्लीच्या बहिर्या कानापर्यंत ऐकू गेला होता.
पहिल्यांदाच एक हिंदु राजा स्वतःच्या शक्तीच्या जोरावर ‘छत्रपती’ बनत होते. राज्याभिषेकानंतर महाराजांना अधिकृतपणे ‘छत्रपती’ ही पदवी मिळाली. स्वतःची मुद्रा, स्वतःचा शिक्का आणि स्वतंत्र राज्यव्यवस्था चालू झाली. हा केवळ सिंहासनावर बसवण्याचा कार्यक्रम नव्हता, तर हिंदवी स्वराज्याच्या स्वातंत्र्याची जगाला दिलेली बुलंद घोषणा होती.
२. खरेच महाराजांना पायाच्या अंगठ्याने गंधटिळा लावला होता का ?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना पायाच्या अंगठ्याने गंधटिळा लावण्यात आला’, असे वक्तव्य केले आणि त्यानंतर समाजमाध्यमांवर चर्वितचर्वण चालू झाले; पण प्रश्न असा आहे की, शिवराज्याभिषेकासारख्या हिंदु समाजाच्या धार्मिक भावना अन् स्वाभिमान यांच्याशी जोडलेल्या संवेदनशील विषयावर इतक्या सहजपणे कुणीतरी असे विधान कसे करू शकते ? इतिहासाचा आधार नसतांना जाणूनबुजून चर्चांमध्ये रहाण्यासाठी आणि वाद निर्माण करण्यासाठी हे सगळे केले जात आहे का, असा प्रश्न सामान्य हिंदूंच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.
आज शिवराज्याभिषेकाविषयी अनेक ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. सभासद बखर, चिटणीस बखर, जेधे शकावली, परमानंद काव्य, तसेच त्या काळातील काही डच, इंग्रज आणि परकीय प्रवासी यांच्या नोंदींमध्येही राज्याभिषेकाचे वर्णन आढळते; पण कुठल्याही विश्वसनीय ऐतिहासिक साहित्यामध्ये ‘महाराजांना पायाच्या अंगठ्याने गंधटिळा लावण्यात आला’, असा उल्लेख सापडत नाही. उलट काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव करत त्यांना स्वतंत्र ‘हिंदु सम्राट’ आणि ‘हिंदु धर्मरक्षक’ म्हणून मान्यता दिली होती. रायगडावर होत असलेला तो राज्याभिषेक, म्हणजे हिंदु स्वाभिमान पुन्हा सिंहासनावर बसल्याचा एकमेव अद्वितीय क्षण होता; मात्र एक सूत्र येथे नक्की विचारावेसे वाटते, ‘अशी वक्तव्ये कायम हिंदूंच्या श्रद्धा, इतिहास आणि महापुरुष यांच्याविषयीच का केली जातात ? हीच भाषा एखाद्या पाद्र्याविषयी किंवा मुल्ला-मौलवींविषयी करण्याचे धाडस आव्हाड किंवा तत्सम पुरोगामी म्हणवणारे लोक कधी दाखवतील का ? कि हिंदु शांत रहातो आणि सहन करतो, म्हणूनच कायम हिंदूंच्याच भावना अन् इतिहास यांना लक्ष्य केले जाते ?’
३. शिवराज्याभिषेक हा धार्मिक विधी होता कि राजकीय क्रांती ?
आजही अनेक लोकांना वाटते की, शिवराज्याभिषेक, म्हणजे केवळ पूजा, मंत्र आणि धार्मिक विधी यांचा मोठा कार्यक्रम होता; पण प्रत्यक्षात शिवराज्याभिषेक हा त्या काळातील सर्वांत मोठा राजकीय संदेश होता; कारण अनेक वर्षे भारतात मोगल, आदिलशाही, निजामशाही अशा इस्लामी सत्ता राज्य करत होत्या आणि हिंदु समाज त्यांच्या अधीन राहून जगत होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून संपूर्ण जगाला अप्रत्यक्ष ठणकावून सांगितले, ‘हिंदु केवळ गुलाम रहाण्यासाठी जन्माला आलेले नाहीत, ते स्वतःचे स्वतंत्र राज्यही उभे करू शकतात.’ राज्याभिषेकामुळे महाराजांनी परकीय सत्तांना थेट दिलेली चेतावणी होती, ‘आता हिंदवी स्वराज्य कुणाच्याही दरबारात मुजरे करण्यासाठी उभे रहाणार नाही.’
याच कारणामुळे औरंगजेबासारख्या बादशहाला छत्रपती शिवाजी महाराज यांची भीती वाटत होती; कारण महाराज केवळ गडदुर्ग जिंकत नव्हते, तर दबलेल्या हिंदूंच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवत होते. म्हणूनच तो दिवस, म्हणजे हिंदु स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि हिंदवी स्वराज्य यांच्या नव्या युगाचा प्रारंभ होता.
४. शिवराज्याभिषेकानंतर नेमके काय पालटले ?
काही लोकांना वाटते, ‘शिवराज्याभिषेक, म्हणजे केवळ एक मोठा सोहळा होता. त्यामुळे काय पालटले ?’; पण प्रत्यक्षात ६ जून १६७४ या दिवशीनंतर केवळ रायगडावरचे सिंहासन पालटले नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानातील राजकारणाची दिशा पालटली होती; कारण अनेक वर्षांनी पहिल्यांदाच एका हिंदु राजाने स्वतःला स्वतंत्रपणे ‘छत्रपती’ म्हणून घोषित केले होते. राज्याभिषेकानंतर स्वराज्य अधिकृतपणे ‘हिंदु साम्राज्य’ म्हणून उभे राहिले. प्रशासन अधिक मजबूत झाले आणि हिंदवी स्वराज्य स्वतःच्या शक्तीवर उभे रहात होते. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकानंतर राजव्यवहार कोश सिद्ध करून घेतला. रघुनाथपंत हणमंते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोश सिद्ध करण्यात आला होता. अनेक वर्षांच्या परकीय सत्तेमुळे प्रशासनात फार्सी आणि उर्दू शब्दांचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. महाराजांनी हे पालटण्याचा निर्णय घेतला. उदाहरणार्थ किल्लाच्या ऐवजी दुर्ग, तलवारच्या ऐवजी खड्ग, हुजूरच्या ऐवजी स्वामी आणि फर्मानच्या ऐवजी आज्ञापत्र, असे मराठी अन् संस्कृत प्रतिशब्द वापरले जाऊ लागले.
फार्सी पत्रांमधील अवघड भाषा पालटून राजव्यवहार कोशानंतर स्वभाषेतील पत्रव्यवहार चालू झाला. त्यामुळे स्वराज्याचा कारभार सामान्य लोकांना अधिक समजू लागला. केवळ राज्यच नाही, तर भाषा आणि संस्कृती हीसुद्धा स्वतंत्र असली पाहिजे, हा विचार त्यामागे होता. मातृभाषा वाचवण्यासाठी आणि स्वराज्याला खर्या अर्थाने सुराज्य बनवण्यासाठी राजव्यवहार कोश सिद्ध करणारे एकमेव राजे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवरायांनी शेतकर्यांच्या जीवनातही मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या. त्या काळात अनेक शेतकरी सावकारांच्या कर्जात अडकलेले होते. यावर उपाय म्हणून महाराजांनी ‘ऐन जिनस कर्जपद्धत’ चालू केली. या पद्धतीमध्ये शेतकर्यांना रोख पैशाच्या ऐवजी थेट बियाणे, बैल, धान्य किंवा शेती यांसाठी लागणारे साहित्य दिले जात होते. त्यामुळे सावकारांकडून होणारी लूट न्यून झाली आणि शेतकर्यांना शेती उभी करण्यासाठी मोठा आधार मिळाला; पण सर्वांत मोठा पालट झाला तो सामान्य हिंदूंच्या मनात. ‘हिंदू केवळ सहन करण्यासाठी नाहीत, तर राज्य करण्यासाठीही जन्माला आले आहेत’, हा आत्मविश्वास शिवराज्याभिषेकाने निर्माण केला.
५. आपण छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत, याची जाणीव ठेवा !
आजच्या अनेक युवकांना असे वाटते की, ६ जूनला रायगडावर जाणे, नगार्यांसमोर तलवारी नाचवणे, घोषणा देणे किंवा समाजमाध्यमांवर छत्रपती शिवरायांची छायाचित्रे ठेवणे, म्हणजेच शिवप्रेम; पण प्रत्यक्षात शिवप्रेम केवळ उत्सव साजरा करण्यात नसते, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या वागण्यात आणि कृतीत आणण्यात असते. अनेक युवक गडदुर्गांवर जातात; पण त्यामागचा इतिहास समजून घेण्याऐवजी ‘ट्रेंड’ (समाजमाध्यमांवरील चर्चा), गडावरील स्वतःचे हावभाव असलेली छायाचित्रे, ‘रिल्स’ (छोटी ध्वनीचित्रफीत) आणि प्रसिद्धी हा उद्देश अधिक दिसतो. ज्या गडदुर्गांसाठी सहस्रो मावळ्यांनी रक्त सांडले, जे स्थापत्य आपल्या पूर्वजांनी जपून ठेवले, ते केवळ छायाचित्र काढण्याचे ठिकाण नाही. तिथे गेल्यावर त्या इतिहासाला समजून घेणे, छत्रपती शिवरायांसह सहस्रो मावळ्यांच्या बलीदानाची जाणीव ठेवणे आणि स्वराज्याचा विचार मनात घेऊन परत येणे महत्त्वाचे आहे.
आज जर युवकांनी इतिहासाचा अभ्यास केला, मातृभाषेचा अभिमान ठेवला, हिंदु समाजाच्या विरोधात पसरवल्या जाणार्या खोट्या कथानकांना पुराव्यांसह उत्तर दिले आणि स्वराज्याचा विचार समाजापर्यंत पोचवला, तरच ते खरे शिवप्रेम ठरेल; कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ घोषणा देणारे किंवा तलवारी नाचवणारे युवक नकोत, तर हिंदवी स्वराज्याच्या विचाराने भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत. त्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी दिलेला वारसा आपण पुढे चालवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करूया… हीच छत्रपती शिवरायांना खरी मानवंदना ठरेल…!
जय भवानी, जय शिवराय ।
– श्री. पार्थ सुनील घनवट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०२६)

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !