पाश्चात्त्य देशांमध्ये मुली, महिला आणि अल्पवयीन मुले यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना प्रत्येक काही दिवसांनी उघड होतात. यातून चर्च संस्थाही सुटलेली नाही. अमेरिकी सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या ‘एपस्टीन फाइल्स’च्या धारिकांमधून ‘अमेरिकेत धनाढ्य गुन्हेगार कशा प्रकारे अल्पवयीन मुली, महिला यांच्या लैंगिक शोषणाची यंत्रणा निर्माण करतो ? त्यांची तस्करी करतांना लोकप्रतिनिधी, श्रीमंत उद्योगपती, समाजातील प्रतिष्ठित यांना सहभागी करून घेतो, मुलींना लैंगिक गुलाम बनवून त्यांची तस्करी करतो’, ही सर्व भयावह स्थिती उघड करण्यात आली आहे.
१. कोण आहे जेफ्री एपस्टीन ?
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक गर्भश्रीमंत अर्थपुरवठादार होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषण यांचा आरोप होता. वर्ष २०१९ मध्ये कारागृहात असतांना त्याचा मृत्यू झाला; पण त्याच्याशी संबंधित ‘फाइल्स’ आता उघड करण्यात येत आहेत. त्याचा मृत्यू झाला कि त्याची हत्या झाली ? हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. त्याच्याकडून प्रतिष्ठितांचे पितळ उघडे पडू नये; म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जाते.
जेफ्री एपस्टीन प्रकरण हे गेल्या काही वर्षांतील जगातील सर्वांत वादग्रस्त आणि धक्कादायक प्रकरणांपैकी एक आहे. अलीकडेच अमेरिकेतील न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे (फाइल्स) सार्वजनिक केली आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
२. ‘फाइल्स’मधील प्रमुख नावे आणि खुलासे
या कागदपत्रांमध्ये केवळ गुन्हेगारांचीच नावे नाहीत, तर एपस्टीनच्या संपर्कात आलेले त्याचे मित्र, ओळखीचे लोक, कर्मचारी आणि पीडित यांचीही नावे आहेत. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याचे नाव या फाइल्समध्ये असणे, म्हणजे तो गुन्हेगार आहेच, असे नाही. यामध्ये काही प्रसिद्ध नावांचा उल्लेख आढळतो.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे. कागदपत्रांनुसार एपस्टीनने क्लिंटन यांच्याविषयी अनेकदा उल्लेख केला होता; मात्र क्लिंटन यांनी कोणत्याही गैरकृत्यात सहभाग असण्याला नकार दिला आहे.
ब्रिटनच्या शाही कुटुंबातील सदस्य प्रिन्स अँड्र्यू यांचेही नाव आहे. त्यांच्यावर थेट आरोप झाले होते आणि त्यांना या प्रकरणामुळे अनेक पदे सोडावी लागली होती.
या सूचीत बिल गेट्स, जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड आणि अनेक मोठे उद्योगपती यांच्या नावांचा उल्लेख संदर्भासह आला आहे.
या फाइल्स नेमक्या काय आहेत ?
या फाइल्स, म्हणजे वर्ष २०१५ मध्ये ‘व्हर्जिनिया जुफ्रे’ या महिलेने एपस्टीनची साथीदार आणि मैत्रीण गिस्लेन मॅक्सवेल यांच्याविरुद्ध प्रविष्ट (दाखल) केलेल्या मानहानीच्या खटल्यातील कागदपत्रे आहेत. न्यूयॉर्कच्या न्यायाधिशांनी या कागदपत्रांवरील गोपनीयतेचा शिक्का हटवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणात सहभागी सुमारे १५० हून अधिक महत्त्वाची नावे समोर आली आहेत.
– श्री. यज्ञेश सावंत
३. एपस्टीनचे ‘लिटिल सेंट जेम्स’ आयलंड (बेट)
एपस्टीनकडे ‘लिटिल सेंट जेम्स’ नावाचे एक खासगी बेट होते, ज्याला लोक ‘पाप बेट’ म्हणू लागले. आरोपानुसार या बेटावर जगातील शक्तीशाली लोकांना बोलावले जायचे आणि तिथे अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असे. या फाइल्समधून या बेटावरील व्यवहारांची सविस्तर माहिती समोर येत आहे.
४. एपस्टीनच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण बाहेर कसे आले ?
या प्रकरणाचा प्रारंभ वर्ष २००५ मध्ये फ्लोरिडामध्ये झाला. एका १४ वर्षांच्या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. तिच्या म्हणण्यानुसार एपस्टीनने ‘मसाज’च्या नावाखाली तिच्या मुलीला स्वत:च्या अलिशान घरात बोलावले आणि तिथे तिचे लैंगिक शोषण केले.
पोलीस अन्वेषणात असे लक्षात आले की, हे एकच प्रकरण नव्हते. पुढील अन्वेषणात अनुमाने ५० अल्पवयीन मुलींनी एपस्टीनच्या विरोधात तक्रारी केल्या. एपस्टीनच्या मॅनहॅटन आणि पाम बीच येथील आलिशान व्हिला अन् खासगी जेट ‘लोलिता एक्सप्रेस’ यांचा या गुन्ह्यांसाठी वापर केल्याचे समोर आले. एपस्टीन मुलींना पैसे आणि दागिने यांचे आमीष दाखवत असे अन् प्रसंगी धमक्याही देत असे. या सर्व प्रकारात त्याची मैत्रीण गिस्लेन मॅक्सवेल त्याला साहाय्य करत होती.
व्हर्जिनिया रॉबर्ट्स जुफ्रे या पीडितेने वर्ष २०१५ मध्ये तिचे शोषण करण्यात आल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर काही घटना उघड झाल्या. त्यात जेफ्री एपस्टीन आणि त्याची साथीदार गिस्लेने मॅक्सवेल यांच्या विरोधात मानहानीचा अन् शोषण यांसंबंधीचा एक कायदेशीर खटला चालवण्यात आला. मॅक्सवेल हिला वर्ष २०२१ मध्ये ‘सेक्स ट्रॅफिकिंग’ प्रकरणात २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ‘एपस्टीन फाइल्स’ ही न्यायालयीन कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांवरील गोपनीयता हटवण्यात आली. या सार्वजनिक कागदपत्रांमध्ये कायदेशीर युक्तीवाद, दावे-प्रतिदावे, पुरावे, ई-मेल्स यांच्यासह ९५ सहस्र छायाचित्रे आहेत, तर जगभरातील जवळपास २०० हून अधिक व्यक्तींची नावे आहेत. आता या ‘सेक्स रॅकेट’मध्ये त्यातील कुणाचा काय संबंध आहे ? हे मात्र हा अहवाल आणि त्यातील पुरावे यांवरूनच समोर येईल.
५. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून कागदपत्रे उघड
या धक्कादायक धारिका आणि छायाचित्रे प्रसिद्ध करण्याचे उत्तरदायित्व अमेरिकेचा न्याय विभाग पार पाडत आहे. ही अधिकृत आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकी काँग्रेसने ‘एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ संमत केला. या कायद्यावर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. या कायद्यानुसार सर्व संघीय यंत्रणांना एपस्टीन अन्वेषणाशी संबंधित गुपिते सार्वजनिक करणे बंधनकारक झाले आहे. पहिल्या टप्प्यात अनुमाने ३ लाख कागदपत्रे आणि ४ सहस्र छायाचित्रे सरकारी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. याला अधिकृतपणे ‘एपस्टाईन डिजिटल लायब्ररी’, असे नाव देण्यात आले आहे.
‘एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ या कायद्याचा मुख्य उद्देश ‘जेफ्री एपस्टीन’ याने केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणांशी संबंधित सर्व गुप्त माहिती जगासमोर आणणे’, हा आहे. जेफ्री एपस्टीन याने अनेक दशके जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या साहाय्याने लैंगिक शोषणाचे रॅकेट चालवले होते. वर्ष २०१९ मध्ये त्याच्या मृत्यूनंतरही अनेक गुपिते गुलदस्त्यात होती. ही माहिती सार्वजनिक करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढला होता, त्यातूनच या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यानुसार अमेरिकेच्या सर्व संघीय अन्वेषण यंत्रणांना एपस्टीन प्रकरणाशी संबंधित सर्व ‘गैरवर्गीकृत’ कागदपत्रे, पुरावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करणे बंधनकारक झाले आहे. यापूर्वी ही माहिती अन्वेषणाच्या नावाखाली गोपनीय ठेवली जात होती.
‘सेक्स स्कँडल’ समोर कसे आले ?

वर्ष २००५ मध्ये फ्लोरिडा पोलिसांनी जेफ्री एपस्टीन याच्या विरोधात चौकशी आणि अन्वेषण चालू केले होते. एका मुलीच्या आई-वडिलांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यांच्या १४ वर्षीय मुलीचे एपस्टीनने लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर अन्वेषणात एपस्टीनवर काही मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले. या प्रकरणात वर्ष २००८ मध्ये तो दोषी ठरला. त्याला १३ मासांची शिक्षा झाली. कारागृहातून बाहेर आल्यावरही त्याचे कारनामे थांबले नाहीत. वर्ष २०१५ मध्ये पुन्हा एक पीडिता समोर आली. जुलै २०१९ मध्ये त्याला अटक करण्यात आली. पुढे ऑगस्ट २०१९ मध्ये त्याने कारागृहात आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला.
– श्री. यज्ञेश सावंत
६. आताच कागदपत्रे उघड का ?
या कायद्याची सर्वांत महत्त्वाची अट, म्हणजे ‘वेळ’ ही होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये या कायद्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर अन्वेषण यंत्रणांना ३० दिवसांच्या आत महत्त्वाची कागदपत्रे प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच कारणामुळे सध्या लाखो पानांचे रेकॉर्ड्स आणि सहस्रो छायाचित्रे एकामागून एक समोर येत आहेत.
या कायद्यांतर्गत अमेरिकेच्या न्याय विभागाने एक अधिकृत डिजिटल पोर्टल किंवा ‘ग्रंथालय’ सिद्ध केले आहे. यामुळे कोणतीही सामान्य व्यक्ती किंवा पत्रकार या पुराव्यांची पडताळणी करू शकतो. या कायद्याचा आणखी एक मुख्य हेतू, म्हणजे ‘पीडितांची ओळख पटवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे’, हा आहे. आतापर्यंत या धारिकांमधून १ सहस्र २०० हून अधिक पीडितांची माहिती समोर आली आहे, ज्यांना यापूर्वी भीतीपोटी किंवा दबावामुळे समोर येता आले नव्हते.
७. ट्रम्प यांच्याशी एपस्टीनचा घरोबा !
खरेतर डॉनल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन हे एकमेकांचे खास मित्र होते. ट्रम्प राजकारणात येण्यापूर्वी या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. दोघेही उद्योगपती आणि आर्थिक क्षेत्रात नावाजलेले होते. दोघे अनेकदा सार्वजनिकरित्या एकाच मंचावर आले होते. दोघांच्या कुटुंबियांचेसुद्धा घनिष्ठ संबंध असल्याचे जुन्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते; पण या लैंगिक शोषण प्रकरणात अथवा मानवी तस्करीमध्ये काहीही संबंध असल्याचे सर्व आरोप आणि दावे डॉनल्ड ट्रम्प यांनी फेटाळले आहेत.
८. ‘मी टू’ चळवळीत एपस्टीनचे नाव !
वर्ष २००९ मध्ये कारागृहातून सुटल्यानंतर एपस्टीन काही काळ शांत राहिला; मात्र वर्ष २०१७ मध्ये चालू झालेल्या ‘मी टू’ चळवळीने त्याचे गुन्हे पुन्हा जगासमोर आणले. हार्वे वाइंस्टीन प्रकरणानंतर महिलांनी धाडसाने स्वत:चे अनुभव मांडायला प्रारंभ केला.
याच काळात वर्जिनिया जुफ्रे नावाच्या महिलेने एपस्टीनच्या विरोधात गंभीर आरोप केले. तिच्या म्हणण्यानुसार तिचे ३ वर्षे लैंगिक शोषण करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास ८० महिलांनी एपस्टीनच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट केल्या.
या सगळ्या घडामोडींमुळे एपस्टीन प्रकरण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
९. या प्रकरणाचे महत्त्व !
जगातील बहुचर्चित आणि शक्तीशाली लोकांचे चेहरे समोर आल्यामुळे हे सिद्ध होते की, उच्चभ्रू वर्तुळातील गुन्हे कशा प्रकारे दडपले जातात. अनेक पीडितांनी अनेक वर्षे न्यायासाठी लढा दिला आहे. या कागदपत्रांमुळे दोषींना शिक्षा होण्याची शक्यता वाढली आहे.
१०. काँग्रेसची चमकोगिरी !
‘एपस्टीन फाइल्स’चे हादरे भारतातही बसणार असल्याचा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन केला आहे. ‘देशाचा पंतप्रधान पालटणार’, असा (फुकाचा) दावा त्यांनी केला. ‘मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी बसू शकतो’, अशी हवेतील विधाने त्यांनी केली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने थोडी खळबळ उडाली. त्यांच्या मते या ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणात भारतातील २ विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश आहे. त्यामुळे सध्याचे सरकार अडचणीत येऊ शकते.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाच्या निमित्ताने चमकोगिरी करण्याची संधी सोडली नाही. ‘अमेरिकेतील ‘एपस्टीन फाइल्स’ या १९ डिसेंबर या दिवशी तेथील संसदेत खुल्या होणार आहेत. त्यातून समोर येणारी माहिती ही जगाला हादरवणारी असेल’, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (२४.१२.२०२५)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993949.html

(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?