SK-34 Lottery Ticket : चित्रातील शिवलिंगावर मासिक पाळीतील रक्त वहातांना दाखवल्याचा आरोप !

केरळ सरकारच्या ‘सुवर्ण केरळम्’ लॉटरी तिकिटावर शिवलिंगाचे चित्र !

शिवलिंगावर मासिक पाळीतील रक्त वहातांना दाखवल्याचा हिंदु संघटनांचा आरोप !

थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळ सरकारच्या ‘सुवर्ण केरळम्’ (एस्.के.३४) या लॉटरी तिकिटावरील शिवलिंगाच्या चित्रावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या शिवलिंगावर मासिक पाळीतील रक्त वहातांना दाखवल्याचा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे. हिंदु संघटना आणि भाजप यांनी ‘हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार आहे’, असे सांगत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. केरळ ललितकला अकादमीच्या संग्रहातून घेतलेले हे चित्र हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करणारे आहे. या प्रकरणी ‘हिंदु ऐक्य वेदी’चे प्रदेशाध्यक्ष आर्.व्ही. बाबू यांनी थिरूवनंतपूरम् शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

१. आर्.व्ही. बाबू आणि  भाजपचे राज्य सरचिटणीस अधिवक्ता एस्. सुरेश म्हणाले की, ‘एस्.के.३४’ या मालिकेतील सोडत तिकिटावरील चित्रामध्ये शिवलिंगाची आकृती, तीन पाकळ्यांचे कमळ आणि टपकणारा लाल रंग दिसतो. त्यामध्ये मासिक पाळीतील रक्त जणू देवतेला अर्पण केल्याप्रमाणे अश्लीलता दर्शवण्यात आली आहे.

भाजपचे राज्य सरचिटणीस अधिवक्ता एस्. सुरेश

(चित्रावर क्लिक करा)

२. केरळममधील पिनराई विजयन् सरकार सतत हिंदु श्रद्धांचा अपमान करत असल्याचा आरोप आर्. व्ही. बाबू यांनी केला आहे. हिंदु समाज जागृत न झाल्यास त्याचे परिणाम त्याची हानी होण्यात होईल, अशी चेतावणी त्यांनी दिली.

३. केरळमधील साम्यवादी सरकारकडून हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर वारंवार होणारे आक्रमण रोखण्याची वेळ आली आहे, असे अधिवक्ता एस्. सुरेश यांनी म्हटले आहे.

४. हा वाद सामाजिक माध्यमांवर झपाट्याने पसरला असून अनेक राजकीय नेते आणि धार्मिक नेते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वादग्रस्त लॉटरी तिकिटांवर बहिष्कार घालण्याची आणि ती जाळण्याची मागणीही अनेकांनी केली आहे.

५. केरळ राज्य लॉटरी विभागाच्या संचालकांनी या विषयाची नोंद घेत तपास चालू केल्याचे सांगितले.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

संपादकीय भूमिका

  • अन्य पंथीय सजग असल्याने त्यांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे कुणी विडंबन करण्यास धजावत नाही. हिंदू मात्र निद्रिस्त आणि स्वाभिमानशून्य असल्यानेच केरळमधील साम्यवादी सरकारचे हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात इतक्या खालच्या थराला जाऊन असे कृत्य करण्याचे धाडस होते. हे १०० कोटी हिंदूंना अत्यंत लज्जास्पद !
  • शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश नसण्याची मंदिराची प्राचीन परंपरा याच केरळमधील साम्यवादी सरकारने मोडून या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा हिंदुद्वेषी निर्णय घेतला होता. यावरून साम्यवादी सरकार जाणूनबुजून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे, हे सिद्ध होते. अशा साम्यवाद्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी आता हिंदूंनी सिद्ध व्हावे !