आसंदीचे ‘सीट’ कसे असावे ?

अर्गाेनॉमिक्स

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १०९

टीप – अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.

‘सध्या आपल्याला ‘अर्गोनॉमिक्स’च्या नावाखाली आसंद्यांचे बरेच प्रकार बघायला मिळतात. यांमध्ये ‘आसंद्यांच्या ‘सीट’चा आकार, त्याची खोली, मऊपणा, ‘अँगल’, हे सर्व निराळे असते. त्यामुळे आसंदीची निवड करतांना आपण थोडे गोंधळून जातो. आसंदीवर बसतांना मांड्यांच्या स्थितीचे महत्त्व आणि आसंद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ‘सीट’चे उपयोग आपण आजच्या अन् पुढील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.            

(भाग ९)

भाग ७ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/990014.html

१. सीटचा आकार किती असावा ? 

१ अ. रुंदी 

१ अ १. आसंदीच्या सीटची आदर्श रुंदी : आपण बसल्यावर आपल्या सीटच्या दोन्ही बाजूंनी १ इंच, फार तर २ इंच इतकी मोकळी जागा असावी. असे नसल्यास पुढील अडचणी येऊ शकतात.

१ अ २. सीटची रुंदी योग्य नसल्यास निर्माण होणार्‍या समस्या 

१ अ २ अ. सीट अधिक रुंद असणे 

१. आसंदीचे हात दूर गेल्याने खांदे शरिरापासून दूर रहातात. ही स्थिती नैसर्गिक नसल्याने खांदे दुखू लागतात.

२. व्यक्ती बर्‍याचदा सरळ न बसता थोडी तिरकी बसते. त्यामुळे मणक्यावर ताण येतो.

३. ‘ॲप्लाईड अर्गोनॉमिक्स’च्या संशोधनानुसार सीट अधिक रुंद असलेल्या आसंदीवर बसणार्‍या २३ ते २९ टक्के लोकांना पाठदुखीचा आणि ३२ टक्के लोकांना खांदेदुखीचा त्रास चालू झाला. (लेखात दिलेले चित्र पहा.)

श्री. निमिष म्हात्रे

१ अ २ आ. सीट अल्प रुंदीची असणे

१. मांडी आणि सीट यांचे स्नायू आखडतात.

२. व्यक्ती थोडे पुढे सरकून बसू लागते. त्यामुळे तिचे पाय, मांड्या, पाठ, अशा सर्वच भागांवर परिणाम होतो.

३. आखूड आसंदीचा मांड्या आणि कुल्हे यांवर दाब पडत असल्यामुळे ‘पायांना मुंग्या येणे आणि बधीरपणा जाणवणे’, असे त्रास होतात.

१ आ. लांबी किंवा खोली : सीटची लांबी किंवा खोली ही व्यक्तीच्या मांड्यांची लांबी किंवा व्यक्तीची उंची यांवर अवलंबून असते.

१ आ १. सीटची लांबी योग्य नसल्यास निर्माण होणार्‍या समस्या 

१ आ १ अ. सीटची लांबी अधिक असणे : सीटची लांबी अधिक असेल, तर सीटची पुढील कड गुडघ्यांच्या मागे टेकते. त्यामुळे पायांकडे जाणारा रक्तप्रवाह खंडित होतो आणि ‘पायांना मुुंग्या येणे, पाय अन् पोटर्‍या दुखणे, ‘व्हेरिकोज व्हेन्स’ (‘व्हेरिकोज व्हेन्स’ म्हणजे शरिरातील, विशेषतः पायांच्या शिरा फुगणे आणि पिळवटल्यासारख्या होणे), यांसारखे आजार होतात. त्यामुळे आपल्या पायांचे आरोग्य बर्‍याच प्रमाणात सीटच्या खोलीवर अवलंबून असते.

सीटची लांबी पालटणे शक्य नसल्यास आपण पाठीमागे एक उशी उभी ठेवू शकतो. त्यामुळे आपले शरीर थोडे पुढे येईल आणि गुडघ्यांमागे थोडी मोकळी जागा निर्माण होईल.

१ आ १ आ. सीटची लांबी अल्प असणे : सीटची लांबी अल्प असेल, तर आपले पाय सीटच्या बाहेर येतात आणि शरिराचे स्थैर्य न्यून होते. यावर उपाय म्हणून सीट किंवा आसंदी पालटणे आवश्यक असते.

१ इ. सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध असलेल्या आसंद्यांच्या सीटचा आकार : लांबी १८ – १९ इंच आणि रुंदी १८ ते २० इंच.

२. सीट किती कडक किंवा मऊ असावे ? 

आसंद्यांच्या सीटच्या कडकपणावर बरेच संशोधन झाले आहे. कडक सीट असलेल्या आसंद्या चांगला आधार देतात; पण त्यांवर अधिक वेळ बसल्यास मांड्यांतील नसा दबल्या जाऊन रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. सीट कडक असले, तर नसा दबण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यावर थोडा वेळच बसू शकतो. सोफ्याप्रमाणे मऊ आसंद्या आरंभी आरामदायक वाटतात; पण सीट मऊ असल्यामुळे ते आत दबले जाते आणि मांड्यांची स्थिती बिघडून कमरेवर ताण येतो. सीटचा कडकपणा मध्यम असावा. त्यामुळे आधार आणि आराम दोन्ही मिळतात; पण व्यक्तीच्या वजनाप्रमाणे मध्यम कडकपणाची व्याख्या पालटते. वजन अल्प असणार्‍या हडकुळ्या व्यक्तीला थोडे मऊ सीट लाभदायक ठरते. लठ्ठ व्यक्तींना थोडे कडक सीट उपयोगी ठरते. असे असले, तरीही आसंदीवर प्रत्यक्ष बसून आणि शक्य असेल, तर काही दिवस आसंदी वापरून पाहिल्यावर अंदाज घेऊनच याची निश्चिती करावी.

३. सीटचे मटेरियल कसे ठरवावे ? 

आजकाल आपल्याला अनेक प्रकारचे सीट बघायला मिळतात, उदा. फोम, मेमरी फोम, लेटेक्स आणि जाळी. याविषयी जाणून घेऊया.

३ अ. फोम : फोमचे सीट घ्यायचे असेल, तर त्याची घनता (density) महत्त्वाची असते. ते प्रत्यक्षात पाहून ठरवावे.

३ आ. मेमरी फोम : हा फोमचाच प्रकार आहे; पण तो बसल्यावर आपल्या शरिराचा आकार घेतो आणि उठल्यावर पुन्हा पूर्वस्थितीत येतो. त्यामुळे आपल्याला अधिक आराम मिळतो. फोम आणि मेमरी फोम यांमुळे उष्णता अधिक जाणवते.

३ इ. लेटेक्स : लेटेक्स हे झाडांपासून निर्माण होणारे एक नैसर्गिक द्रव्य असते. त्यावर थोडी प्रक्रिया करून त्याच्या गाद्या बनवण्यात येतात. लेटेक्सचे सीट योग्य प्रमाणात आधार आणि आराम देतात, तसेच त्यांवर बसल्यावर उष्णता होत नाही. हे सीट थोडे महाग असतात.

३ ई. जाळी : सध्या बाजारात ‘जाळी’च्या बर्‍याच ‘अर्गोनॉमिक चेअर्स’ उपलब्ध आहेत. जाळीच्या घट्टपणावर त्यांचे आधार आणि आराम देण्याचे प्रमाण अवलंबून असते. जाळीच्या आसंद्यांमध्ये उष्णता होत नाही. या लेटेक्सपेक्षा स्वस्त असतात.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (११.११.२०२५)

भाग १० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/995237.html

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷