संगणकावर काम करतांना मांड्यांची स्थिती कशी असावी ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १०७

अर्गाेनॉमिक्स

टीप – अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.

‘सध्या आपल्याला ‘अर्गोनॉमिक्स’च्या नावाखाली आसंद्यांचे बरेच प्रकार बघायला मिळतात. यांमध्ये ‘आसंद्यांच्या सीटचा आकार, त्याची खोली, मऊपणा, अँगल’, हे सर्व निराळे असते. त्यामुळे आसंदीची निवड करतांना आपण थोडे गोंधळून जातो. आसंदीवर बसतांना मांड्यांच्या स्थितीचे महत्त्व आणि आसंद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सीटचे उपयोग आपण आजच्या अन् पुढील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

(भाग ७)

भाग ६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/985638.html

१. मांड्यांवर सीटचा दाब पडल्याने निर्माण होणार्‍या समस्या

संगणकासमोर बसतांना मांड्यांविषयी आणखी एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यायला हवे आणि ते म्हणजे मांड्यांवर पडत असलेला सीटचा दाब ! मांड्यांवर सीटचा दाब पडत असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण पायावर होतो.

श्री. निमिष म्हात्रे

१ अ. मांड्यांतील रक्तवाहिन्या दाबल्या गेल्यामुळे

१. पाय गार पडतात.

२. पायांना सूज येते.

३. पायांच्या बोटांचा रक्तप्रवाह खंडित होऊ शकतो. यामुळे ते काळे-निळे पडू शकतात.

४. दीर्घकाळानंतर ‘व्हेरिकोज व्हेन्स’ (टीप) होऊ शकतात.

टीप – व्हेरिकोज व्हेन्स : शरिरातील, विशेषतः पायांच्या शिरा फुगणे आणि पिळवटल्यासारख्या होणे

१ आ. मांड्यांतील नसा दाबल्या गेल्यामुळे

१. पायांत मुंग्या येतात.

२. पायांना सुया टोचल्याप्रमाणे संवेदना होतात.

३. कधी कधी पायांना भाजल्यासारखे होते.

४. पाय बधीर होतात.

१ इ. मांड्यांच्या मागील भागाचे स्नायू दबल्यामुळे  

१. स्नायू घट्ट होतात.

२. त्यांचे बळ न्यून होऊन दैनंदिन कामे करतांना अशक्तपणा जाणवतो.

३. कंबरदुखी, गुडघेदुखी असे त्रास निर्माण होतात.

२. वरील समस्या टाळण्यासाठी करायची उपाययोजना

पुढीलप्रमाणे प्रयोग करून आपल्या मांड्यांची स्थिती योग्य करून घ्या. आसंदीवर गुडघे काटकोनात ठेवून बसा आणि आपला हात मांड्यांखाली घालण्याचा प्रयत्न करा.

अ. हात सहज सरकला, तर ती स्थिती योग्य आहे. आपले पाय भूमीला नीट टेकत असल्यास असे होऊ शकते.

आ. हात सहज सरकत नसेल, तर याचा अर्थ मांड्यांवर बराच दाब पडत आहे. आपले पाय भूमीला पूर्णपणे टेकत नसल्यास असे होऊ शकते. यासाठी पायथळ (फूटरेस्ट) वापरून आपली पावले थोडी वर घ्या. त्यामुळे मांडी आणि सीट यांमध्ये फट रहाणार नाही; पण तेथून हात सहज सरकेल.

(क्रमशः पुढच्या बुधवारी)

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (११.११.२०२५)

भाग ९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/992483.html

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷