संगणकावर काम करतांना पायांची स्थिती कशी असावी ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १११

अर्गाेनॉमिक्स

(टीप : अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.)

‘बहुतेक लोकांना वाटते, ‘बसतांना केवळ पाठ सरळ ठेवल्यास सगळे ठीक होते; पण खरेतर आपले पाय आणि टाचा हा आपल्या बसण्याचा पाया आहे. जसा इमारतीला भक्कम पाया हवा असतो, तसा शरिरासाठी पायांची स्थिती योग्य ठेवणे आवश्यक असते. पाय योग्य पद्धतीने ठेवले, तर शरीर आपोआप सरळ आणि स्थिर रहाण्यास साहाय्य होते अन् स्नायूंना अनावश्यक ताण घ्यावा लागत नाही. जर पाय चुकीच्या स्थितीत, उदा. हवेत लोंबलेले, केवळ बोटांवर टेकलेले किंवा एकमेकांवर ठेवलेले असतील, तर हा ताण शरिराच्या वरच्या भागांपर्यंत पोचतो आणि मग गुडघे, कंबर, पाठीचा कणा, खांदे अन् शेवटी मान या सर्व ठिकाणी अस्वस्थता जाणवू लागते.

(भाग १०)

भाग ९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/992483.html

१. पायांची योग्य स्थिती कशी असावी ? 

पायांची योग्य स्थिती कशी असावी ?

(लेखात दिलेले चित्र पहा.)

अ. पाय भूमीवर पूर्णपणे सपाट असावेत. आसंदी अधिक उंचीची असल्यास पायथळ (‘फूटरेस्ट’) वापरावा.

आ. घोटे साधारण ९० – १०० अंश कोनात असावेत.

इ. शरिराचे वजन पावलावर समान पसरले पाहिजे, केवळ बोटे किंवा टाचा यांवर नको.

ई. पाय पुढे सरळ किंवा थोडे बाहेर (अधिकाधिक १५ अंश कोनात) असावेत.

उ. दोन्ही पायांना आधार हवा. एक पाय आत दुमडणे, पाय एकावर एक ठेवणे किंवा हवेत सोडणे टाळावे. हे लहान वाटणारे; पण महत्त्वाचे सूत्र बसण्याचे संतुलन राखते.

शेवटी हे लक्षात ठेवा की, योग्य पद्धतीने बसणे पाठीपासून नाही, तर पायांपासून चालू होते. जेव्हा पाय भूमीवर स्थिर असतात, तेव्हा गुडघे स्थिर रहातात, कंबर नैसर्गिक स्थितीत येते, पाठीचा कणा योग्य आकारात रहातो, श्वासोच्छ्वास चांगला होतो आणि मेंदूला पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो. त्यामुळे काम करतांना त्याविषयीचे विचार स्पष्ट होतात, एकाग्रता वाढते आणि काम अधिक प्रभावीपणे करता येते.

२. पाय योग्य पद्धतीने ठेवल्याने होणारे लाभ 

श्री. निमिष म्हात्रे

अ. शरिराला भूमीवर एक भक्कम पाया मिळाल्यामुळे बसण्याची स्थिती स्थिर रहाते.

आ. कंबर आणि पोट यांचे स्नायू सक्रीय रहातात. त्यामुळे शरिराला आधार मिळतो आणि ते तिरके रहात नाही.

इ. श्रोणी (पेल्विस) नैसर्गिक स्थितीत रहाते. त्यामुळे कमरेचे वळणही योग्य रहाते.

ई. पाय आणि टाचा यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे थकवा, पाय सुजणे किंवा मुंग्या येणे न्यून होते.

उ. आपण घंटोन्‌घंटे संगणकावर काम केले, तरीही शरिरावर अल्प ताण येतो.

३. पायांच्या योग्य पद्धतीविषयी केलेल्या अभ्यासातून लक्षात आलेली सूत्रे ! 

अ. वर्ष २०२२ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू (University of Waterloo)’ यांनी केलेल्या अभ्यासात आढळले आहे की, पायांना योग्य आधार मिळाल्यास पाठीच्या स्नायूंवरील ताण ३२ टक्के न्यून होतो.

आ. ‘जर्नल ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ – २०२१ (Journal of Occupational Health -2021)’मधील अभ्यासानुसार पाय चुकीच्या स्थितीत असल्यास गुडघे आणि कंबर यांवर अधिक ताण येतो अन् पायांतील रक्तप्रवाह न्यून होतो.

इ. ‘एन्.आय.ओ.एस्.एच्. २०२२ (NIOSH -2022)’च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट सांगितले आहे, ‘पाय भूमीवर सपाट असतील, तरच योग्य बसण्याची रचना टिकून रहाते.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.  (३०.१२.२०२५)

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷