UK PM Starmer : ज्यूविरोधी ब्रिटीश मुसलमान कार्यकर्त्याची इजिप्तच्या कारागृहातून सुटका झाल्यानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी केले स्वागत !

ब्रिटनच्या नागरिकांकडून पंतप्रधानांवर प्रचंड टीका  

डावीकडून पंतप्रधान स्टार्मर आणि अला अब्द एल्-फत्ताह

लंडन (ब्रिटन) : गेल्या १४ वर्षांपासून इजिप्तच्या कारागृहात अटकेत असणारा ब्रिटीश नागरिक अला अब्द एल्-फत्ताह याची सुटका झाल्यानंतर तो ब्रिटनमध्ये परतला. अला अब्द एल्-फत्ताह याची सुटका व्हावी, यासाठी ब्रिटनच्या अनेक सरकारांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी त्याला क्षमा केली आणि तो लंडनला परतला.  ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी त्याचे स्वागत केले. आता पंतप्रधान स्टार्मर यांच्यावर यावरून टीका होत आहे. अला अब्द एल्-फत्ताह ज्यूविरोधी असून त्याच्या सामाजिक माध्यमांवरील जुन्या पोस्टस समोर येत आहेत.

१. हुजूर पक्षाचे नेते रॉबर्ट जेनरिक यांनी स्टार्मर यांच्यावर टीका करतांना म्हटले की, पंतप्रधानांना फत्ताहच्या हिंसक पार्श्वभूमीविषयी माहिती नव्हती का ? ज्या व्यक्तीने ज्यूविरोधी भाषा वापरली आणि हिंसेला चिथावणी दिली, त्याचे पंतप्रधान सार्वजनिक स्वागत कसे करू शकतात?

२. ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले की, एका ब्रिटीश नागरिकाची सुटका करून त्याची कुटुंबाशी भेट घालून देणे, हे सरकारचे प्राधान्य होते; मात्र याचा अर्थ आम्ही त्याच्या पोस्टसचे समर्थन करतो, असा होत नाही. त्याचे ते जुने विचार अत्यंत घृणास्पद असून सरकार त्याचा निषेधच करते.

कोण आहे अला अब्द एल्-फत्ताह ?

४३ वर्षीय फत्ताह हा ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ आणि लेखक आहे. वर्ष २०११ मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या लोकशाहीवादी क्रांतीचा तो नेता होता. इजिप्त सरकारने त्याच्यावर खोटी माहिती पसरवणे आणि विनापरवाना आंदोलने करणे, या आरोपांखाली अनेकदा कारागृहात डांबले होते. वर्ष २०२१ मध्ये त्याला ५ वर्षांची कारावासाची शिक्षा झाली होती; परंतु आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्याची सुटका करण्यात आली.