‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने १०.८.२०२५ या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे तालुकास्तरीय मंदिरांच्या विश्वस्तांचे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे कार्य, तसेच गेल्या २ वर्षांत मिळालेले यश यांची माहिती देण्यासाठी अधिवेशन घेण्यात आले. मंडणगड येथील ग्रामदैवत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या आशीर्वादानेच ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ झाले; कारण प्रथम आमचा केवळ बैठक घेण्याचा विचार झाला होता. ‘मंडणगड तालुक्यात धर्मप्रसार व्हावा’, यासाठी प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु सत्यवानदादा यांचा आशीर्वाद असल्यामुळे ‘गुरुतत्त्व कार्य कसे करते ?’, याची आम्हाला अनुभूती येत होती. चिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. चंद्रकांत महादेव उजाळ यांना प्रसार करतांना त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा येथे दिली आहे.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेनंतर २७ वर्षांनी सद्गुरु सत्यवान कदम यांनी मंडणगड येथे धर्मप्रसारासाठी आरंभ करणे
‘वर्ष १९९८ – १९९९ या काळात प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटची जाहीर सभा येथेच मोठ्या प्रमाणात आणि भावपूर्ण वातावरणात झाली होती’, असे आम्हाला समजले. मंडणगड हा तालुका अतिशय दुर्गम आहे. या तालुक्यात गेल्या १० ते १२ वर्षांत सनातनचे कार्य पोचलेले नाही. केवळ प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या प्रसारानिमित्त काही साधक येथे जातात. असे असले, तरीही अनेक वर्षांपासून जोडलेल्या काही साधिका आणि श्री. शंकर जंगम हे तरुण साधक त्यांच्या क्षमतेनुसार सेवा करतात. प.पू. गुरुदेवांच्या जाहीर सभेनंतर प्रथमच वर्ष २०२५ मध्ये सद्गुरु सत्यवान कदम यांनी येथे साधक आणि धर्मप्रेमी यांची बैठक घेतली अन् ‘धर्मप्रसारासाठी आशीर्वाद दिला’, असे आम्हाला जाणवले.

२. बैठकीचा शुभारंभ मंडणगडचे ग्रामदैवत श्री भैरी जोगेश्वरीदेवीला श्रीफळ वाढवून करण्यात येणे
मंडणगड येथील धर्मप्रेमींना संघटित करण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या माध्यमातून एक बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. बैठकीचा शुभारंभ १९.७.२०२५ या दिवशी मंडणगडचे ग्रामदैवत श्री भैरी जोगेश्वरीदेवीला श्रीफळ वाढवून करण्यात आला. आम्ही काही साधक ग्रामदेवतेला श्रीफळ वाढवण्यासाठी निघालो; पण तेथे जायचा मार्ग ठाऊक नसल्याने आम्ही बसस्थानकाजवळ विचारपूस केली. पुढे ३ दिशांना जाणारे मार्ग होते. ‘त्यांपैकी नेमके कोणत्या दिशेने देवळाकडे जायचे ?’, हे विचारण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी देवळाच्या कुलुपाची किल्ली ठेवतात’, हे आम्हाला नंतर कळले. त्यामुळे देऊळ उघडण्यासाठी किल्ली आणण्यासाठीचा आमचा हेलपाटा वाचला. तेव्हा ‘आम्हाला या कार्यासाठी ग्रामदेवतेचा आशीर्वाद मिळाला’, असे वाटून आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
३. ‘देव्हारे’ येथील मंदिरांच्या प्रमुखांनी तेथून दूर असलेल्या १० गावांत स्वतः जाऊन प्रसार करण्याची सिद्धता दर्शवणे
१०.८.२०२५ या दिवशी मंडणगड येथील लोकनेते ‘गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय’च्या सभागृहात बैठक घेण्याचे ठरवण्यात आले होते. या वेळी तेथील धर्मप्रेमी श्री. उदय गुजर हेही उपस्थित होते. २६.७.२०२५ या दिवशी ‘मंडणगड येथे प्रसाराला जायचे’, असा सर्वांनी निश्चय केला. प्रथम तेथील महाविद्यालयात बैठका घेण्यासाठी अनुमती मागितली. महाविद्यालयाने आम्हाला अनुमती दिली. मग आम्ही ‘देव्हारे’ येथे गेलो. धर्मप्रेमी आधुनिक वैद्य सुहास पवार यांनी तेथील मंदिरांच्या प्रमुखांना एकत्र केले होते. त्या प्रमुखांना सर्व विषय सांगितल्यावर त्यांनी ‘तेथून दूर असलेल्या १० गावांत आम्ही स्वतः जाऊन प्रसार करू’, असे सांगितले.
४. आधुनिक वैद्य सुहास पवार या धर्मप्रेमींनी ‘निगडी’ या दुर्गम भागातील ३ गावांमध्ये अध्यात्मप्रसार करण्याचे दायित्व घेणे
आधुनिक वैद्य सुहास पवार यांनी त्यांचे चिकित्सालय १ दिवस बंद ठेवून ते आम्हाला देव्हारेपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या ‘निगडी’ या दुर्गम गावी घेऊन गेले. तेथे गेल्यावर त्यांनी ७ – ८ मंदिरांच्या प्रमुखांना बोलावून माहिती देण्यास सांगितले. तो अतिशय दुर्गम भाग असतांनाही आधुनिक वैद्य सुहास पवार यांनी तेथील ३ गावांमध्ये अध्यात्मप्रसार करण्याचे दायित्व घेतले.
५. दापोलीत पुष्कळ पाऊस पडूनही मंडणगड येथे साधक प्रसार करत असतांना पाऊस थांबणे
२६.७.२०२५ या दिवशी दापोलीला घरी आल्यावर दापोलीत पुष्कळ पाऊस पडल्याचे कळले; परंतु मंडणगडमध्ये देवाने आमची काळजी घेतली. आम्ही प्रसार करीपर्यंत पाऊस थांबलेला असायचा. आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी थांबल्यावर पुन्हा पाऊस यायचा.
६. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समवेत आहेत’, अशी प्रत्येक क्षणी अनुभूती घेता येत असल्याने कसलाही त्रास न होता आनंद मिळणे
आम्ही प्रसार करत असतांना हळूहळू प्रसाराच्या गतीत वाढ झाली. आम्हाला तहान-भुकेची जाणीव नसायची. आम्ही सर्वांच्या समवेत एकत्रित बसून महाप्रसाद घेत असतांना भगवान श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह शिदोर्या एकत्रित करून केलेल्या काल्याची आठवण आली. आम्हाला घरी पोचायला रात्रीचे १० – ११ वाजायचे; पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. उलट सातत्याने आनंद मिळत होता. तेथील ग्रामदेवता आणि प.पू. गुरुदेव यांची कृपा, तसेच सद्गुरु सत्यवान कदम यांचा आशीर्वाद यांमुळेच सर्व शक्य झाले. गुरुदेव आमच्या समवेत असल्याची प्रत्येक क्षणी आम्हाला अनुभूती घेता येत होती.
७. अनोळखी गावांमध्ये योग्य मार्ग दाखवणार्या व्यक्तीची भेट होत असल्याने मार्ग न चुकणे
गावे अनोळखी असल्यामुळे आम्हाला ‘त्या गावांत कुठून कसे जायचे ?’, असा प्रश्न पडायचा. ‘आम्ही मार्ग चुकणार नाही’, याची काळजी देवच घेत होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी योग्य मार्ग दाखवणार्या व्यक्तीशी आमची भेट होत असे.
८. हिंदु धर्म आणि देवालये यांच्या स्थितीची माहिती दिल्यानंतर धर्मप्रेमी प्रभावित होऊन त्यांनी बैठकीला उपस्थित रहाणार असल्याचे सांगणे
३१.७.२०२५ या दिवशी मंडणगड येथील ‘धुत्रोली ते शिरगाव’ हा मार्ग प्रचारासाठी घेतला होता. धुत्रोली येथे एके ठिकाणी बाराव्या दिवसाचे मृत्यूत्तर विधी चालू होते. त्या ठिकाणी माहिती देण्यासाठी तेथील धर्मप्रेमींनी आम्हा साधकांना बोलावले. त्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातूनही धर्मप्रेमी आले होते. हिंदु धर्म आणि देवालये यांच्या स्थितीची माहिती दिल्यानंतर विधीसाठी आलेल्या व्यक्ती प्रभावित झाल्या आणि त्यांनी ‘आम्ही या अधिवेशनाला उपस्थित रहाणार’, असे सांगितले.
९. ‘हिंदू तरुण मुला-मुलींना गळ्यामध्ये एका पंथियांचे पदक का घालू नये ?’, यासंदर्भात त्यांचे प्रबोधन करता येणे
‘आजही येथील हिंदु तरुण मुले-मुली गळ्यात एका पंथियांचे पदक घालतात. काही गावांत त्या पंथियांच्या धर्मप्रसाराचे कार्य चालू आहे. ‘आजही येथे असे प्रकार चालू आहेत’, असे एका धर्मप्रेमीने सांगितले. त्यामुळे तेथे ‘त्या पंथियांचे पदक का घालू नये ?’, यासंदर्भात प्रबोधन करता आले.
१०. या २ – ३ वर्षांत या भागातील ३० ते ३५ मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या आहेत.
या प्रसंगांवरून ‘प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु सत्यवानदादा यांनी मंडणगड येथे का पाठवले ?’, याची आम्हाला प्रचीती आली.
११. काही कुटुंबांत केवळ महिलाच असतांनाही त्या आमचा पोशाख आणि टिळा पाहून विश्वासाने आमचे आदरातिथ्य करत होत्या. हे केवळ गुरुकृपेनेच शक्य झाले.
१२. अधिवेशनात धर्माभिमान्यांनी विविध सेवांच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग घेणे
२५ गावांतील विविध मंदिरांचे १२० विश्वस्त उपस्थित असल्यामुळे सर्वांच्या मताने ठरवण्यात आलेल्या बैठकीचे रूपांतर एका अधिवेशनात झाले. अधिवेशनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. अनेक धर्माभिमान्यांनी सेवाही केली. ‘आपल्या गावात येणारे विश्वस्त म्हणजे देवाचे भक्तच आहेत’, हा भाव ठेवून मंडणगड शहरातील धर्मप्रेमींनी १५० आसंद्या विनामूल्य दिल्या. काही जणांनी चहा, अल्पाहार आणि महाप्रसाद यांची सोय केली. आम्हाला सभागृहही विनामूल्य मिळाले.
‘हे केवळ ग्रामदेवतांचे आशीर्वाद, तसेच प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु सत्यवानदादा यांची कृपा यांच्यामुळे घडले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. चंद्रकांत महादेव उजाळ, चिखलगाव, ता. दापोली, जि. रत्नागिरी. (९.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !