वाढदिवस किंवा कुठलाही विशेष कार्यक्रम करतांना आजकाल फुग्यांची सजावट करण्याची पद्धत अधिकच लोकप्रिय होत आहे. मागच्या मासात मी एका लहान मुलाच्या वाढदिवसाला गेले होते. तिथे शेकडो फुग्यांची सजावट केली होती. दुसर्या दिवशी त्या फुग्यांचे गुच्छ त्यांनी घराबाहेर फेकून दिले. लग्नकार्यात तर संपूर्ण परिसर आणि व्यासपीठ शेकडो फुगे लावून सजवले जाते.
फुग्यांचे ‘लँटेक्स बलून’, ‘फॉईल मायलर बलून’, ‘हॉट एअर बलून’ आणि ‘स्पेशालिटी बलून’, असे मुख्यत्वे ४ प्रकार असतात. या ४ प्रकारांच्या फुग्यांविषयी आणि फुग्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी यांविषयीची माहिती येथे देत आहे.

फुग्यांमुळे होणारे प्रदूषण
आपण सजावटीसाठी जी वस्तू वापरतो तिचे विघटन होत आहे कि नाही ? याचा विचार केला पाहिजे. फेकून दिलेले फुगे नंतर माती आणि जलस्रोत यांमध्ये अडकून पडतात. ‘फॉइल फुगे’ तुटत नाहीत, तर ‘लँटेक्स फुगे’ प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये विघटित होतात, जे ‘मायक्रोप्लास्टिक्स’ बनतात. परिणामी ते माती आणि पाणी प्रदूषित करतात. – अमृता खंडेराव
१. लँटेक्स बलून
नैसर्गिक रबरामध्ये रंग आणि काही पदार्थ घालून हे फुगे सिद्ध केले जातात. त्यातील ‘कंपोझिशन’ (घटक)नुसार त्याचे ‘डीग्रेडेशन’ (र्हास) होण्यासाठी काही मासांपासून ४ वर्षांपर्यंत वेळ लागू शकतो. त्याचे तुकडे पडून ते निसर्गात तसेच साठून राहू शकतात.
२. फॉईल बलून
नायलॉनवर मेटॅलिक कोटिंग करून सिद्ध केले जातात आणि हे अजिबात ‘बायोडिग्रेडेबल’ (नैसर्गिकरित्या कुजणारे) नसतात. यांचे १०० वर्षांपर्यंतसुद्धा विघटन होत नाही, म्हणजे तुमच्या एक दिवसाच्या हौसेसाठी तुम्ही पृथ्वीचे १०० वर्षांचे काम वाढवून ठेवणार.
३. हॉट एअर बलून
‘लाईटवेट’ (हलक्या) नायलॉनपासून सिद्ध होतात. तंबू किंवा मोठी पाकिटे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या नायलॉनपासून हे फुगे सिद्ध होतात.
४. स्पेशल बलून
हे फुगे ‘पॉलीक्लोरोप्रेन’पासून (एक प्रकारच्या कृत्रिम रबरापासून) सिद्ध केले जातात.

५. फुगे पर्यावरणासाठी हानिकारक
फुगे जेव्हा सोडले जातात, तेव्हा ते पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक असतात. फुग्यांपासून धोकादायक कचरा बनतो. हे फुगे वन्यजीव, पक्षी, कासव आणि सागरी सस्तन प्राणी यांच्या अन्नातून पोटात गेले, तर त्यांच्यासाठी फार धोकादायक असते. प्राण्यांनी गिळलेल्या फुग्यामुळे त्यांच्यामध्ये जीवघेणे अंतर्गत अडथळे निर्माण होतात. घनकचर्यातून हे फुगे चरणार्या ढोरांच्या तोंडातून पोटात जाऊ शकतात. फुगे स्वस्त आहेत; म्हणून सजावटीसाठी वापरले जातात; परंतु ते पर्यावरणासाठी किती मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहेत ?, याचा विचार केला जात नाही. फुग्यांऐवजी पाने-फुले वापरली, तर ती सजावट निसर्गात पुन्हा कुजून जाईल आणि तिचा पर्यावरणाला धोका होणार नाही.
६. भारतीय पद्धतीने सुशोभीकरण करा !
कुणीतरी एक चुकीची पद्धत चालू करतो आणि बाकीचे सगळे ती कार्यवाहीत आणतात. सुशिक्षित आणि अशिक्षित सगळे सारखेच चुकीच्या आहारी जातात. चांगल्या-वाईटाचा कुणीच विचार करत नाही. भारतीय सुशोभन पद्धतीत फुगे वापरण्याची प्रथा नव्हती आणि नाही. भारतीय सुशोभन पर्यावरणपूरक आहे. पाने, फुले, डहाळ्या, धान्य, रांगोळ्या आदी वापरून आपण सजावट करत आलो आहोत. आंब्याच्या पानांची तोरणे, केळीचे खांब, गवत, आंब्याच्या डहाळ्या, कागदी पताका लावून सजावट करण्याची भारतीय पद्धत सर्वांत उत्तम आहे; कारण या पद्धतीत वापरले जाणारे साहित्य विघटनशील आहे. ते पर्यावरणाला कसलाही धोका पोचवत नाही.
७. भारतीय संस्कृती अंगीकारा !
कुणाचीही नक्कल करण्यापूर्वी पर्यावरणाचा आधी विचार केला पाहिजे. नवीन पिढीसाठी आपण आधीच प्रचंड प्रदूषित भूमी, पाणी आणि हवा निर्माण करून ठेवली आहे. त्यात वेगवेगळ्या चुकीच्या पद्धती वापरून आणखी भर घालू नये. ‘वापरातील कुठल्याही गोष्टींचा विनाकारण नाश करणे’, ही भारतीय परंपरा नाही. ‘संसाधनांचा पुरेपूर वापर’, ही हिंदु संस्कृती आहे. ‘कार्यक्रम संपल्यानंतर पटापट फुगे फोडायचे आणि विकृत आनंद घ्यायचा’, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.
प्रदूषणाचा महाराक्षस सर्व बाजूंनी पृथ्वीला वेढत आहे. त्यात आता ही फुगेबहार आली आहे. आपल्या क्षणिक हौसेसाठी आपण केवढे मोठे प्रदूषण निर्माण करत आहोत, याचे सुशिक्षित लोकांना तरी भान आहे का ? लोकांचे मन राखण्यापेक्षा पृथ्वीचे पर्यावरण अधिक महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी पर्यावरणपूरक नाहीत, त्यांना कडाडून विरोध केला पाहिजे.
– अमृता खंडेराव, यवतमाळ (७.१२.२०२५)
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता