महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात भावाच्या स्तरावर आणि आनंदात पार पडलेले प्रथम ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !

‘२ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रामध्ये ‘ईश्वप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ घेण्यात आले. संगीत विभागाचे हे पहिलेच शिबिर होते. या शिबिराचा लाभ महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील एकूण २९ शिबिरार्थींनी घेतला. हे शिबिरार्थी गायन, वादन आणि नृत्य या कला शिकणारे होते. ‘या शिबिरातील क्षणचित्रे, तसेच शिबिरार्थींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

संगीतयोग
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

१. शिबिरात घेतलेले विविध विषय

शिबिराचा आरंभ संगीताची आराध्य देवता सरस्वतीदेवीच्या ‘जय शारदे वागीश्वरी..’, या स्तवनाने झाला. आरंभी शिबिराचा उद्देश सांगण्यात आला. शिबिराच्या ३ दिवसांत संगीत-साधनेच्या अनुषंगाने विविध विषय घेण्यात आले.

अ. शिबिराच्या वेळी संगीताच्या संदर्भात केलेले विविध संशोधनात्मक प्रयोग दाखवण्यात आले. ‘संगीताला साधना कशी जोडावी ? स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, कलेच्या माध्यमातून साधना करतांना भावजागृतीचे महत्त्व, सात्त्विक आणि असात्त्विक संगीत यांचा अभ्यास कसा करावा ? साधना चांगली होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व, समाजातील लोक करत असलेल्या नामजपांच्या तुलनेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार सिद्ध केलेल्या नामजपांचे महत्त्व’ इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच गटचर्चेचेही आयोजन करण्यात आले होते.

आ. ‘कलेचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास कसा करावा ? कलेला साधनेची जोड देणे का आवश्यक आहे ?’, हे समजण्यासाठी शिबिरात २ प्रायोगिक भाग घेण्यात आले. यांमध्ये पहिल्या दिवशी ‘कलेचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास कसा करावा ?’, हे सांगण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन प्रस्तुत केले आणि त्यांना श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर साथ केली.

इ. दुसर्‍या दिवशी ‘कलेला साधनेची जोड दिल्यावर कलेचे सात्त्विक सादरीकरण कशा प्रकारे होते ?’, हे सांगण्यासाठी शिबिरार्थींपैकी दोन साधकांचे अनुक्रमे नृत्य आणि तबलावादन यांचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. ‘या दोन्ही प्रात्यक्षिकांच्या वेळी काय जाणवले ?’, याची अचूक उत्तरे शिबिरार्थींनी दिली. त्यांच्या उत्तरांतून ‘सूक्ष्मातील स्पंदने समजण्याची शिबिरार्थींची क्षमता चांगली होती’, हे लक्षात आले.

ई. संगीत विभागातील पूर्णवेळ साधना करत असलेल्या साधकांनी ‘ते संगीतातून करत असलेली साधना आणि त्यांना आलेल्या अनुभूती’, यांचे कथन केले.

उ. शिबिराची सांगता ‘धन्य धन्य हम हो गए गुरुदेव… (म्हणजे गुरुदेव, आम्ही धन्य धन्य झालो)’, या भावपूर्ण गीताने झाली. या गीतामुळे शिबिरातील वातावरण भावपूर्ण झाले होते. तेव्हा अनेक शिबिरार्थींची भावजागृती झाली. या शिबिराचा शिबिरार्थींनी भावाच्या स्तरावर लाभ करून घेतल्याचे लक्षात आले.

सौ. अनघा जोशी

२. शिबिरातील क्षणचित्रे

अ. ‘शिबिराच्या आरंभी म्हटलेल्या सरस्वती स्तवनाच्या वेळी साक्षात् सरस्वतीदेवीचे तत्त्व शिबिराच्या ठिकाणी कार्यरत होऊन देवी सर्वांना आशीर्वाद देत आहे’, अशी अनुभूती आल्याचे एका शिबिरार्थीने सांगितले.

आ. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यामध्ये सर्व शिबिरार्थींचा सहभाग चांगला होता. शिबिरात घेण्यात आलेल्या विविध प्रयोगांची उत्तरेही सर्वांनी चांगल्या प्रकारे दिली.

इ. संगीताच्या संदर्भात केलेली संशोधनपर चलचित्रे (व्हिडिओ) पाहिल्यावर शिबिरार्थींनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.

ई. कलेच्या माध्यमातून साधना करतांना साधनेचा पाया पक्का होण्यासाठी शिबिरात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, हा विषय घेण्यात आला. हा विषय समजायला जड आहे, तरीही शिबिरार्थींची शिकण्याची स्थिती चांगली असल्याने त्यांनी मनमोकळेपणाने स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सांगितले. त्यांनी हा विषय साधनेचे प्रयत्न करण्याच्या दृष्टीने सहजतेने आणि जिज्ञासू वृत्तीने समजून घेतला.

उ. शिबिरात ‘भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न’ हा विषय घेतांना संगीत विभागातील साधिका कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे) हिने भावजागृतीचा प्रयोग घेतला. त्या वेळी सगळ्यांची भावजागृती झाली. शिबिरार्थींपैकी काही जणांची भावावस्था दुसर्‍या दिवसापर्यंत टिकून होती.

ऊ. ‘संगीत विभागातील पूर्णवेळ साधकांनी केलेल्या अनुभव कथनातून कलेच्या माध्यमातून साधना करण्याची प्रेरणा मिळाली’, असे काही शिबिरार्थींनी सांगितले.

ए. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया समजण्यास काही अडचणी असतील, तर त्या जाणून घेण्यासाठी शिबिरामध्ये २ दिवस गटचर्चा घेण्यात आली. गटचर्चेमध्ये याविषयी शिबिरार्थींशी संवाद साधल्यावर त्यांनी स्वतःच्या चुका मनमोकळेपणाने सांगितल्या, तसेच त्यांनी स्वतःच्या स्वभावदोषांची सूची बनवली. एका शिबिरार्थीने तर स्वतःचे ३६ स्वभावदोष लिहिले होते.

या गटचर्चेचा लाभ झाल्याचे शिबिरार्थींनी सांगितले. ९० टक्के शिबिरार्थींना या प्रक्रियेची तोंडओळख होती; परंतु त्यांच्याकडून ही प्रक्रिया गांभीर्याने राबवली जात नव्हती. ‘या गटचर्चेच्या माध्यमातून आणि शिबिरातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आता ही प्रक्रिया नियमित आणि गांभीर्याने राबवणार’, असे शिबिरार्थींनी सांगीतले.

ऐ. ‘सूक्ष्मातील स्पंदनांचा अभ्यास कसा करावा ?’, या दृष्टीने एक प्रयोग करण्यात आला. यामध्ये ‘नामजप न करता केलेले नृत्य आणि तबलावादन अन् नामजप केल्यानंतर केलेले नृत्य आणि तबलावादन, यांतील भेदाविषयी अभ्यास करण्यास शिबिरार्थींना सांगण्यात आले. नामजप न करता केलेल्या प्रस्तुतीच्या तुलनेत नामजप केल्यानंतर केलेल्या प्रस्तुतीत अधिक सकारात्मक पालट सर्वांच्या प्रकर्षाने लक्षात आले. नामजपानंतरच्या कलाप्रस्तुतीमध्ये सर्व शिबिरार्थींना विविध प्रकारच्या अनुभूती आल्या. या प्रात्यक्षिकांमुळे शिबिरार्थींच्या मनावर कलेला साधनेची जोड देण्याचे महत्त्व बिंबले.

ओ. समाजातील लोक करत असलेला २ प्रकारचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार केलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप शिबिरार्थींना ऐकवण्यात आला अन् त्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यास सांगितले. त्यावर सर्वांनी सांगितले, ‘‘समाजातील लोकांनी केलेले नामजप ऐकतांना आमचे मन विचलित होत होते. त्या नामजपामध्ये वाद्यसंगीत असल्याने ताल आणि सूर यांकडे आपले लक्ष जाते. त्यामुळे अंतर्मुखता साधता येत नाही. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार केलेला नामजप ऐकल्याने मन लगेच एकाग्र होते आणि भाव जाणवतो.’’

औ. शिबिराच्या समारोपाच्या वेळी शिबिरार्थींनी ‘कलेला साधना कशी जोडणार ? पुढे काय प्रयत्न करणार ?’, याविषयीचे चिंतन करून ते सांगितले.

३. शिबिरार्थींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

अ. सर्व शिबिरार्थींनी घरी जाण्यासाठी निघण्यापूर्वी त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिली. शिबिरार्थींनी हे लिखाण एकाग्रतेने केले.

आ. शिबिरार्थी त्यांना सांगितलेली सूत्रे लगेच कृतीत आणत होते. काही जण ‘फलकावर स्वतःच्या चुका लिहिणे, चुका लिहून ते कागद खोक्यामध्ये ठेवणे’, असे प्रयत्न करत होते.

इ. काही शिबिरार्थींनी ‘आता पूर्णवेळ साधनाच करावी’, असे वाटते’, असे मत व्यक्त केले. ८ – १० शिबिरार्थींना ‘शिबिर संपल्यावर घरी जाऊ नये’, असे वाटले आणि निघतांना त्यांना अश्रू अनावर झाले.

या शिबिरामध्ये शिबिरार्थींना आलेल्या अनुभूती आणि शिबिराची सेवा करतांना साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा याविषयीचे लिखाण लवकरच प्रकाशित करणार आहोत.

– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए. संगीत), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.११.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.