आधुनिक भारताच्या जडणघडणीतील काही क्षेत्रे अशी आहेत की, ती एखाद्या प्रतिभावान व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळेच नावारूपाला येतात किंवा ओळखली जातात. संबंधित व्यक्ती त्या क्षेत्राशी एवढी एकरूप झालेली असते की, त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रात असण्यामुळेच त्या क्षेत्राविषयी निश्चिंतता असते, त्या क्षेत्राचे वैभव असते. भारताचे सध्याचे ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ (एन्.एस्.ए. – नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर) अजित डोवाल यांच्याविषयी येथे जाणून घेणार आहोत. एखादे पद भूषवणे आणि राष्ट्रप्रेम म्हणून त्या पदावर राहून पदाची शोभा वाढवणे, यांत भेद आहे. भारताच्या गुप्तचर विभागात काम करून अनेक मोहिमा यशस्वी करून अजित डोवाल हे आधुनिक चाणक्य ठरले असून पाश्चात्त्यांच्या शब्दांमध्ये ते भारताचे ‘जेम्स बाँड’ ठरले आहेत. (जेम्स बाँड हे इंग्लंड येथील प्रसिद्ध काल्पनिक गुप्तहेराचे पात्र आहे.) या लेखात देण्यात आलेली सूत्रे ही केवळ जनजागृती आणि माहिती देण्याच्या उद्देशाने येथे देत आहोत. कोणत्याही गोपनीयतेचा भंग करण्याचा या लेखाचा उद्देश नाही.
३० नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जन्म आणि पार्श्वभूमी, मिझोंशी वाटाघाटी आणि मिझोराम वेगळे राज्य बनणे अन् अजित डोवाल यांचे पाकिस्तानमधील वास्तव्य’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/981992.html

६. कंदहार विमान अपहरण प्रकरणातील भूमिका
पंजाब येथील ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ पूर्ण झाल्यावर अजित डोवाल यांना वर्ष १९९२ मध्ये लंडनच्या दूतावासात पाठवण्यात आले. अजित डोवाल अनेक वर्षे तेथे राहिले आणि वेगवेगळ्या मोहिमांमध्ये भारताला साहाय्य केले. वर्ष १९९८ मध्ये भारतात भाजपचे सरकार केंद्रात आले. २४ डिसेंबर १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सचे ‘आयसी-८१४’ क्रमांकाचे एक विमान नेपाळ विमानतळावरून देहली विमानतळाकडे जात होते. विमानात अनुमाने १७० ते १८० प्रवासी होते आणि हे विमान भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करताच, ‘हरकत-उल-मुजाहिद्दीन’ नावाचा एक आतंकवादी गट ज्याच्या ५ पाकिस्तानी आतंकवाद्यांनी विमानाचे अपहरण केले. त्यानंतर त्या वेळी ते कुठे घेऊन जातील हे स्पष्ट नव्हते; पण विमानाच्या वैमानिकाला पाकिस्तानकडे जाण्यास सांगितले; मात्र पुरेसे इंधन नसल्यामुळे हे विमान अमृतसरमध्ये उतरवले. प्रथम आतंकवाद्यांना वाटत होते की, सरकार त्यांच्याविरुद्ध काही करू शकणार नाही, प्रवासी त्यांच्याकडे ओलीस होते; मात्र तेथे आतंकवाद्यांच्या दृष्टीने भारत सरकारकडून सकारात्मक हालचाली न होता त्यांच्यावर काही कारवाई करू शकते, असे वाटले. त्यामुळे ते विमान अमृतसरमधून नेऊन पाकिस्तानमध्ये उतरवले. पाकचे सरकार त्यांना विमान थांबू देण्यास नकार देते, त्यामुळे विमान दुबईत उतरवतात. मग तेथून इंधन भरतात आणि २५ डिसेंबर १९९९ या दिवशी अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये विमान उतरवण्यात येते.
जेव्हा भारत सरकारला विमान कंदहारमध्ये नेल्याचे समजते, तेव्हा इस्लामाबादमध्ये तैनात असलेले भारतीय दूतावासातील एक अधिकारी ए.आर्. घनश्याम यांना कंदहारला पाठवून अपहरणाची सर्व माहिती एकत्र करण्यास सांगितली जाते. या वेळी आतंकवादी ए.आर्. घनश्याम यांना धमकावून भारत सरकारला एक शिष्टमंडळ बनवून पाठवण्यास सांगतात, जेणेकरून ते त्यांच्या मागण्यांवर चर्चा करू शकतील. तेव्हा भारत सरकार ७ जणांचे एक शिष्टमंडळ सिद्ध करून त्यांना कंदहारला पाठवते. या शिष्टमंडळामध्ये जाणीवपूर्वक अजित डोवाल यांचा समावेश करण्यात येतो. (वर्ष १९७१ ते १९९९ या कालावधीमध्ये अजित डोवाल यांनी १५ हून अधिक अपहरणांमध्ये वाटाघाटी केल्या होत्या. भारत सरकारला डोवाल यांच्यावर पुष्कळ विश्वास होता की, ते कोणतीही परिस्थिती हाताळतील.)

हे शिष्टमंडळ कंदहारला पोचले आणि अजित डोवाल यांनी वाटाघाटी चालू केल्या. आतंकवादी त्यांच्या मागण्या पालटत राहिले, म्हणून प्रथम अजित डोवाल त्यांना ‘एका मागणीवर ठाम रहाण्यास सांगतात, अन्यथा परिस्थिती बिघडेल’, असे सांगतात. यानंतर आतंकवादी त्यांच्या सर्व मागण्या एका कागदावर लिहितात आणि तो कागद विमानाच्या बाहेर फेकतात. त्या कागदावर भारताच्या कारागृहात ठेवलेल्या ३६ आतंकवाद्यांना २०० कोटी डॉलरसह (तत्कालीन ८ सहस्र ६०० कोटी रुपये) सोडण्यात यावे. ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला जातो. भारतावर प्रवाशांचे कुटुंबीय आणि प्रसारमाध्यमे यांचा पुष्कळ दबाव होता. जर सरकारने कोणतीही कारवाई करण्याची योजना आखली, तर ती पार पाडण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करावा लागला असता, तर पाकिस्तान कधीही दगा देऊ शकतो. अफगाणिस्तानचे लोकही सामील होते, त्यामुळे काही योजना आखली असती, तर सर्व तपशील अपहरणकर्त्यांपर्यंत पोचून सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता.
या परिस्थितीत अजित डोवाल यांनी त्यांच्याशी अनेक चर्चा केल्या आणि त्यांना सहमत होण्यासाठी पटवून दिले की, ‘३६ नव्हे, तर केवळ ३ आतंकवाद्यांना सोडले जाईल’ आणि नंतर आतंकवादीही सिद्ध झाले. मग अजित डोवाल यांनी ३ आतंकवाद्यांच्या बदल्यात प्रवाशांना सोडवले; पण हा भारतासाठी मोठा धक्का होता. या घटनेनंतर अजित डोवाल यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणखी भक्कम केली. राष्ट्रीय सुरक्षा आणखी भक्कम करण्यासाठी वेगवेगळी पावले उचलली गेली, ज्यामध्ये त्यांनी ‘मल्टी-एजन्सी सेंटर’ आणि ‘जॉईंट टास्क फोर्स ऑन इंटेलिजेंस’ स्थापन करण्यास प्रारंभ केला.

७. काश्मीरमध्ये नवीन पक्षाची निर्मिती !
काश्मीरमध्ये त्या वेळी २ मुख्य राजकीय पक्ष होते. शेख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स आणि दुसरीकडे मुफ्ती महंमद सईद यांची डेमोक्रॅटिक नॅशनल कॉन्फरन्स. त्याच वेळी काँग्रेसलाही काश्मीरमध्ये स्वत:ची उपस्थिती हवी होती, जेणेकरून ते काश्मीरपासून वेगळे होऊ नये आणि ते राष्ट्रीय सुरक्षेसाठीही महत्त्वाचे होते; पण काँग्रेसला काश्मीरमध्ये जिंकणे कठीण होते, म्हणून त्यांनी मुफ्ती महंमद सईद यांना त्यांच्यात सामील होण्यासाठी पटवून घेतले आणि त्यांना काँग्रेसच्या राज्य विभागाचे अध्यक्षसुद्धा बनवले अन् भविष्यात त्यांना कॅबिनेट मंत्रीपदसुद्धा देण्यात आले. यासह जर काँग्रेस भविष्यात जिंकली, तर त्यांनी मुफ्तींना मुख्यमंत्री बनवण्याचे वचनसुद्धा दिले. त्यामुळे या गोष्टींमुळे मुफ्ती काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांचा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन झाला.
काँग्रेसने मुफ्तींवर कोणत्याही परिस्थितीत पक्षाला काश्मीरमध्ये भक्कम करण्याचे उत्तरदायित्व सोपवले होते, जेणेकरून काँग्रेस सत्तेत येईल आणि त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्री बनवले जाईल. मुफ्ती काँग्रेसला काश्मीरमध्ये भक्कम करण्यासाठी काम करू लागतात. काँग्रेस जिंकल्यास ते मुख्यमंत्री होतील, असे ठरले होते; पण ही प्रक्रिया दीर्घकालीन होती. त्यामुळे याच्या मध्यभागी काँग्रेसने काश्मीरमध्ये आपली उपस्थिती भक्कम करण्यासाठी शेख अब्दुल्ला यांच्याशी हातमिळवणी केली आणि त्यांच्यासह निवडणुकीसाठी लढायला प्रारंभ केला. त्यामुळे मुफ्ती यावर अजिबात खुश नव्हते. जेव्हा भाजपचे सरकार येते, तेव्हा अजित डोवाल यांना काश्मीरमध्ये अनेक वेळा पाठवले जाते. अजित डोवाल यांनी मुफ्तींसह अनेक बैठका घेतल्या आणि पुष्कळ चांगले मित्र बनले. त्यांच्या मैत्रीनंतर आणि काही काळानंतर मुफ्तींनी काँग्रेससह दीर्घकालीन थांबण्याचा दृष्टीकोन नाकारला अन् काँग्रेस सोडून जनमोर्चात सहभागी झाले. त्या वेळी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदसुद्धा देऊ केले गेले. नंतर भविष्यात मुफ्तींनी तेथून त्यागपत्र देऊन ‘पीडीपी’ (पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) पक्षसुद्धा बनवला, ज्यामुळे काश्मीरचे संपूर्ण राजकीय समीकरण पालटले आणि काँग्रेसला ते अजिबात आवडले नाही. यामुळे काँग्रेस अजित डोवाल यांच्यावर खुश नव्हती. ‘आयबी’चे (‘इंटेलिजन्स ब्युरो’चे) माजी संचालक आणि ‘रॉ’चे माजी सचिव यांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेखसुद्धा केला आहे, ‘अजित डोवाल हे याचे ‘मास्टरमाईंड’ होते आणि ते काश्मीरमध्ये ‘पीडीपी’च्या निर्मितीसाठी उत्तरदायी होते.’
८. काँग्रेसकडून डोवाल यांच्यावर अन्याय

‘आयबी’ला नवीन संचालक निवडायचा होता; कारण जे अधिकारी कर्तव्यावर होते, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. अजित डोवाल नवीन संचालक बनणे निश्चित होते; कारण ज्येष्ठतेनुसारसुद्धा अजित डोवाल यांची नियुक्ती झाली असती; पण ३१ जुलै २००४ मध्ये काँग्रेसचे सरकार बनते. आता काँग्रेसला अजित डोवाल यांना ‘आयबी’चे नवीन संचालक बनवायचे होते; पण त्यांनी २ वर्षांचा कार्यकाळ ८ महिन्यांपर्यंत न्यून केला.
भविष्यात अजित डोवाल वर्ष २००५ मध्ये सेवानिवृत्त होतात आणि ते सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन ‘आयबी’ संचालक म्हणून नियुक्त झालेल्या ई.एस्.एल्. नरसिंहन् यांचा कार्यकाळ संपूर्ण २ वर्षांचा ठेवण्यात आला. त्यांच्यासाठी तो न्यून करण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसवर असा आरोप करण्यात आला की, त्यांनी जाणीवपूर्वक अजित डोवाल यांचा कार्यकाळ २ वर्षांवरून ८ महिन्यांपर्यंत न्यून केला.
९. दाऊदला मारण्याचा प्रयत्न पोलिसांमुळे अयशस्वी !
अजित डोवाल सेवानिवृत्त झाले होते; पण त्यानंतरही त्यांनी गुप्तचर संस्थांसह काम करतांना त्यांना मिळालेला अनेक वर्षांचा अनुभव आणि कौशल्ये त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत वापरली. ज्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले, म्हणजे वर्ष २००५ मध्ये त्याच वर्षी दाऊद इब्राहिमची मुलगी महरूख हिचे लग्न पाकचा क्रिकेटपटू जावेद मियांदादचा मुलगा जुनेद याच्याशी ९ जुलै या दिवशी मक्का येथे होते आणि नंतर २३ जुलै या दिवशी दुबईतील ‘द ग्रँड हयात’मध्ये स्वागत समारंभ होणार होता. डोवाल यांना कळले की, दाऊद इब्राहिम या विशिष्ट समारंभाला उपस्थित रहाणार आहे.
ही अशी संधी होती, जिथे दाऊदचे स्थान निश्चित झाले होते; पण तरीही जर त्यांनी त्याला अटक करण्यासाठी या ठिकाणी कोणतीही कारवाई केली, तर त्याच्या अपयशाची शक्यता पुष्कळ अधिक होती आणि अपयशी झाल्यास भारताच्या प्रतिमेवर एक मोठा डाग लागला असता. म्हणूनच भारत कोणत्याही कमांडो कारवाईपासून स्वतःला वाचवत होता. येथे अजित डोवाल यांनी एक योजना बनवली. ते दाऊद इब्राहिमचा शत्रू छोटा राजनपर्यंत पोचले. छोटा राजन पूर्वी दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य होता; पण नंतर त्यांच्यात भांडण झाले. किंबहुना दाऊद इब्राहिमने छोटा राजनवर बँकॉकमध्ये आक्रमण केले होते. अजित डोवाल यांना या गोष्टी ठाऊक होत्या. डोवाल त्यांच्या ‘नेटवर्क’चा वापर करून छोटा राजनपर्यंत पोचतात आणि ‘दाऊद इब्राहिमला एकत्र मारू शकतो’, असे ते छोटा राजनला पटवून देतात. छोटा राजन त्याला सहमत होतो आणि सीमा पार करून त्याचे दोन नेमबाज विकी मल्होत्रा अन् फरीद तनाशा यांना भारतात पाठवतो.
या कारवाईसाठी अजित डोवाल नेमबाजांच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ भारतातील एका गुप्त ठिकाणी करतात. या संपूर्ण कारवाईसाठी अल्प वेळ होता; पण त्या वेळेत अजित डोवाल यांनी त्यांचे खोटे पासपोर्ट, दुबईची तिकिटे सर्वकाही सिद्ध केले. एक समस्या होती की, मुंबई पोलीस विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशाला आधीपासूनच अटक करण्याचा प्रयत्न करत होते आणि मुंबई पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकार्यांना अजित डोवाल यांच्या कारवाईविषयी कळते. काही लोक म्हणतात की, दाऊद इब्राहिमने स्वतः मुंबई पोलिसांना या नेमबाजांविषयी सांगितले, जेणेकरून तो यावर मात करू शकेल.
या नेमबाजांना दुबईला पाठवण्यापूर्वी देहलीच्या हॉटेलमध्ये अंतिम माहिती दिली जात होती की, हॉटेलची मांडणी कशी आहे ? इमारती कशा असतील ? प्रवेश कसा करायचा ? दाऊदला कसे मारायचे ? हे सर्वकाही ते समजावून सांगत होते. अजित डोवाल देहलीच्या हॉटेलमध्ये छोटा राजनच्या नेमबाजांसह योजना आखत होते, त्याच वेळी मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कमलाकर आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी मीरा बोरवणकर त्याच हॉटेलमध्ये पोचतात आणि म्हणतात, ‘‘विकी आणि फरीद येथे राजकारण्यांना मारण्यासाठी आले आहेत, ते आधीपासूनच सर्वांत आधी पसार आहेत, म्हणूनच आम्हाला त्यांना अटक करण्याची आवश्यकता आहे.’’ यानंतर अजित डोवाल आणि अधिकारी यांच्यात वाद होतो.
अजित डोवाल पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न करतात; पण ते मानत नाहीत. अजित डोवाल त्या वेळी अधिकृत पदावर नव्हते, त्यामुळे त्यांचा यात हात वरचढ नव्हता. त्यामुळे पोलीस या नेमबाजांना अटक करतात आणि त्यांना घेऊन जातात. या ठिकाणी दाऊदला मारण्याची सर्वांत मोठी संधी चुकते. अजित डोवाल यांनी त्यांच्या वरिष्ठांना बोलावले आणि ते थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला; पण तोपर्यंत नेमबाजांना अटक करण्यात आली होती अन् ते बातम्यांवर दाखवले जात होते. ‘अजित डोवाल यांनी पोलिसांना धडा शिकवू’, असेच सांगितले. अजित डोवाल यांच्या सूचीमध्ये दाऊद इब्राहिम आधीपासूनच होता, त्यांनी स्वत:च्या कारकीर्दीत दाऊदला अटक करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले.
अजित डोवाल यांच्या विविध कामगिरींमुळे भारताचे संपूर्ण राजकारण पालटले आणि तेव्हापासून आजपर्यंत ते कधीही शक्तीहीन झाले नाहीत, उलट ते अजूनही सत्तेत आहेत.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (३.१२.२०२५)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !