भारताचे आधुनिक चाणक्य आणि ‘जेम्स बाँड’ अजित डोवाल !

आधुनिक भारताच्या जडणघडणीतील काही क्षेत्रे अशी आहेत की, ती एखाद्या प्रतिभावान व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळेच नावारूपाला येतात किंवा ओळखली जातात. संबंधित व्यक्ती त्या क्षेत्राशी एवढी एकरूप झालेली असते की, त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रात असण्यामुळेच त्या क्षेत्राविषयी निश्चिंतता असते, त्या क्षेत्राचे वैभव असते. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एन्.एस्.ए. – नॅशनल सिक्युरिटी एजन्सी) अजित डोवाल यांच्याविषयी येथे जाणून घेणार आहोत. एखादे पद भूषवणे आणि राष्ट्रप्रेम म्हणून त्या पदावर राहून पदाची शोभा वाढवणे, यांत भेद आहे. भारताच्या गुप्तचर विभागात काम करून अनेक मोहिमा यशस्वी करून अजित डोवाल हे आधुनिक चाणक्य ठरले असून पाश्चात्त्यांच्या शब्दांमध्ये ते भारताचे ‘जेम्स बाँड’ ठरले आहेत. (जेम्स बाँड हे इंग्लंड येथील प्रसिद्ध काल्पनिक गुप्तहेर आहे.) या लेखात देण्यात आलेली सूत्रे ही केवळ जनजागृती आणि माहिती देण्याच्या उद्देशाने येथे देत आहोत. कोणत्याही गोपनीयतेचा भंग करण्याचा उद्देश नाही.

(भाग १)

अजित डोवाल

१. जन्म आणि पार्श्वभूमी 

अजित डोवाल यांचा जन्म २९ जानेवारी १९४५ या दिवशी उत्तराखंडच्या पौरी गढवालमध्ये झाला. ते मेजर जी.एन्. डोवाल यांचे पुत्र आहेत, तर त्यांची आई उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एच्.एन्. बहुगुणा यांची चुलत बहीण होती. त्यांचे शालेय शिक्षण राजस्थानच्या अजमेरमधील ‘इंडियन मिलिटरी बोर्डिंग स्कूल’मधून पूर्ण केले. त्यानंतर वर्ष १९६७ मध्ये आगरा विद्यापिठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. वर्ष १९६८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ची परीक्षा उत्तीर्ण केली. वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ‘आय.पी.एस्.’ (इंडियन पोलीस सर्व्हिस – भारतीय पोलीस सेवा) झाल्यानंतर त्यांची नियुक्ती केरळमध्ये झाली.

२. केरळ येथील दंगल रणनीतीने थांबवणे

डिसेंबर १९७१ मध्ये अशी एक घटना घडली जी त्यांच्या कर्तृत्वाला कलाटणी देणारी ठरली. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथे नूर जहां नावाच्या हॉटेलजवळ एका व्यक्तीने पहिल्या मजल्यावरून चप्पल फेकल्यामुळे २ धार्मिक गटांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे दंगल चालू झाली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या दुकानांमधून वस्तू लुटणे आणि त्यांना जाळणेसुद्धा चालू केले. पोलीस या भागात जाण्यास घाबरत होते. काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री के. करुणाकरन यांच्यावर पुष्कळ दबाव होता आणि त्यांना निर्भय अधिकारी हवा होता. तेव्हा हे दायित्व अजित डोवाल यांच्याकडे सोपवण्यात आले. अजित डोवाल यांनी संपूर्ण भागात फिरून अगदी बारीकसारीक माहिती गोळा केली. या दंगलीचा संपूर्ण समन्वय ज्या भागातून कार्यरत होते, केवळ त्याच भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीसदल तैनात केले. या दंगलींचे नेतृत्व करणार्‍या दोन्ही गटांच्या नेत्यांना ओळखले आणि नंतर त्यांच्याशी स्वतः बोलणी करत वाटाघाटी चालू केल्या. दंगलीचे मुख्य कारण चोरी झालेल्या वस्तूंमुळे संघर्ष चालू आहे, हे समजल्यावर डोवाल यांनी दंगलखोरांनी लुटलेली दोन्ही गटांची मालमत्ता परत मिळवली आणि त्यांना परत केली. त्यामुळे अनेक दिवस चाललेल्या दंगली एका आठवड्यात कोणत्याही हिंसेविना थांबल्या. या दंगलींवर सिद्ध करण्यात आलेल्या एका पोलीस अधिकार्‍याच्या अहवालात डोवाल यांच्या या रणनीतीचे पुष्कळ कौतुक करण्यात आले.

३. मिझोंशी वाटाघाटी आणि मिझोराम वेगळे राज्य बनणे

श्री. यज्ञेश सावंत

त्यानंतर त्यांना केरळ राज्यातून देहलीला बोलावण्यात आले आणि वर्ष १९७२ मध्ये त्यांना ‘इंटेलिजेंस ब्युरो’च्या (गुप्तचर यंत्रणेच्या) थेट ‘ऑपरेशन विंग’मध्ये (मोहिमांचा विभाग) समाविष्ट करण्यात आले, जेणेकरून ते आता भारतातील संपूर्ण कारवायांमध्ये भाग घेऊ शकतील. येथूनच अजित डोवाल यांनी गुप्तहेराच्या जगात प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिझोराम येथे घडणार्‍या घडामोडींमुळे पुष्कळ चिंता होती. त्या वेळी मिझोराम आसामचा भाग होता, ते वेगळे राज्य नव्हते. मिझोरामच्या भागात दुष्काळ पडला होता, ज्यामुळे लोक प्रत्येकी दीड लाख रुपयांची भरपाई मागत होते आणि जेव्हा त्यांना ती मिळाली नाही, तेव्हा लाल डेंगा नावाच्या स्थानिक व्यक्तीने ‘मिझो नॅशनल फ्रंट’ नावाची संघटना स्थापन केली. लाल डेंगा मिझो लोकांच्या समस्यांविषयी सरकारवर टीका करत असे, लोकांना सरकारविरुद्ध भडकवत होता. मिझोराम आसामचा भाग होता आणि आसाममध्ये असा नियम बनवण्यात आला होता की, ज्यांना ‘आसामी’ भाषा येते, केवळ त्यांनाच सरकारी नोकरी मिळेल. त्यामुळे याविरुद्ध लाल डेंगा चालवत असलेल्या ‘मिझो नॅशनल फ्रंट’ने सरकारविरुद्ध आवाज उठवला आणि लोकांनी त्याला पुष्कळ पाठिंबा दिला. जेव्हा आसाम रायफल्सच्या ज्या रेजिमेंटमध्ये मिझो लोकसंख्या बहुसंख्य होती, त्यांच्या २ बटालियन बरखास्त केल्या गेल्या, तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बटालियनचे ७ मुख्य कमांडो ज्यांची नोकरी गेली होती, ते लाल डेंगाला साहाय्य करत आणि येथून लाल डेंगा ‘फ्रंट’ भक्कम बनून सरकारविरुद्ध हिंसा चालू करत. मिझोरामला आसामपासून वेगळे करण्याची चर्चा चालू करण्यासह सीमा सुरक्षा दलांवर आक्रमण करून भारतीय ध्वजाऐवजी ‘फ्रंट’ने स्वतःचा ध्वज लावला आणि त्यांनी मिझोरामला ‘नवीन देश’ म्हणून घोषित केले.

भारत सरकारसमोर गुंतागुंतीची परिस्थिती होती; कारण कोणतीही सैन्य कारवाई केली, तरी नागरिक लाल डेंगासमवेत असल्यामुळे भारत सरकारवरच कारवाई उलटू शकत होती. त्यामुळे यावर मात करण्यासाठी अजित डोवाल यांना मिझोरामला पाठवण्यात आले. डोवाल यांना कळले की, या ७ कमांडोंमुळे लाल डेंगाचे पारडे भक्कम आहे. या ७ कमांडोंनी म्यानमारच्या पर्वतांमध्ये स्वत:चा तळ स्थापित केला होता. म्हणून अजित डोवाल यांनी गुप्तहेर म्हणून या पर्वतांमध्ये प्रवेश केला. हळूहळू या ७ कमांडोंशी बोलण्यास प्रारंभ करून त्यांचा विश्वास जिंकला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, ‘कोणत्याही प्रकारे भारताशी हातमिळवणी करा. जर तुम्ही भारताशी जोडले गेला, तर मिझोरामला वेगळे राज्य म्हणून घोषित केले जाईल आणि तुम्हाला मंत्रीपदसुद्धा दिले जाईल अन् सामान्य लोकांच्या लहान समस्यासुद्धा सोडवल्या जातील. जर तुम्ही या सूत्रांना सहमत झाला नाहीत, तर भारतीय सैन्य एक दिवस शिरून तुमची हानी करील.’ यात २ वर्षे गेली आणि नंतर ७ पैकी ६ कमांडो डोवाल यांच्या समवेत सामील झाल्यामुळे लाल डेंगा कमकुवत झाला अन् त्याला भारत सरकारशी शांतता चर्चा चालू करावी लागली. परिणामी मिझोराम वेगळे राज्य बनले आणि लाल डेंगा मुख्यमंत्री झाले.

अजित डोवाल यांचे पाकिस्तानमधील वास्तव्य !

भारताने अणूचाचणी केली होती. यामुळे पाकिस्तानने फ्रान्स आणि चीन यांच्या साहाय्याने अणूचाचणीसाठी काम चालू केले; पण काही काळानंतर फ्रान्सला कळले की, पाकिस्तान अणूचाचणीची योजना आखत आहे. त्यामुळे फ्रान्स मागे हटला; पण चीन नाही. पाकिस्तान अणूचाचणीची योजना आखत असल्याचे जेव्हा इंदिरा गांधींना कळले, तेव्हा इंदिरा गांधींनी ‘रॉ’ आणि ‘आयबी’ (इंटेलिजन्स ब्युरो – गुप्तचर विभाग) यांच्या चमूला बोलावले अन् त्यांना काम दिले, ‘पाकिस्तान जे काही करत आहे, त्याविषयीची माहिती तुम्ही शोधून काढा आणि ते कोणत्याही प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न करा.’ अजित डोवाल यांना या कामगिरीसाठी भारतीय दूतावासात ‘सचिव’ म्हणून पाकिस्तानला पाठवण्यात आले. अजित डोवाल जवळपास ६-७ वर्षे पाकिस्तानमध्ये राहिले, त्यापैकी काही काळ त्यांनी ‘गुप्तहेर’ म्हणूनही माहिती मिळवली. पाकमध्ये कहुटामध्ये जो अणू कार्यक्रम चालू होता, तिथे ते भिकार्‍याच्या वेशात फिरत असत. अजित डोवाल पाकिस्तानमध्ये राहिले, त्या संपूर्ण कालावधीत त्यांनी अनेक कारवायांमध्ये भारताला साहाय्य केले आणि पाकिस्तानमध्ये रहात असतांना ते २ वेळा पकडलेही गेले. एकदा ते इस्लामाबादमधील प्रसिद्ध औलियाच्या मजारवर जात होते, तेव्हा एका माणसाने त्यांना थांबवले आणि त्यांचे कान टोचले असण्याविषयी विचारले. दुसर्‍या वेळी कव्वाली ऐकतांना एका माणसाने त्यांना सांगितले, ‘तुमची नकली दाढी ढिली होत आहे.’ पाकमध्ये त्यांनी हेरांचे मोठे जाळे निर्माण केले, असे सांगण्यात येते. त्याचा लाभ भारताला अद्यापही होत आहे.

– श्री. यज्ञेश सावंत

४. सिक्कीमची परिस्थिती हाताळून भारतात विलिनीकरणाचे कार्य !

सिक्कीम जे एक राजेशाही राज्य होते, त्याचे राजा पाल्डेन मंग्याल हे अमेरिकेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये (आमिषाच्या जाळ्यात) अडकले. अमेरिकेच्या ‘सीआयए’ची (गुप्तचर संघटना) एजंट असलेली होप कुक सिक्कीमची राणी बनली. त्यामुळे सिक्कीमचा कारभार अमेरिकेच्या सूचनांनुसार चालण्यास प्र्रारंभ झाला, ज्यामुळे अमेरिकेचे हित साधले गेले. यावर मात करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ‘रॉ’चे (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग – ‘भारतीय गुप्तचर यंत्रणे’चे) प्रमुख आर्.एन्. काओ यांच्याशी बोलून त्यांना सिक्कीमला पाठवले. आर्.एन्. काओ यांनी एक योजना बनवली, ज्यामध्ये ते सिक्कीमच्या लहान स्थानिक पक्षांना पाठिंबा देतील, त्यांना मोठे करतील आणि त्यांना राजाविरुद्ध भडकवतील, असे ठरले. जेव्हा राजा कमकुवत होईल आणि सामान्य लोकांचा पाठिंबा नसेल, तेव्हा त्याला पदावरून हटवले जाईल. हे काम अजित डोवाल यांना देण्यात आले.

डोवाल यांनी योजना सिद्ध करून सिक्कीममध्ये काँग्रेस पक्षाचे एक स्थानिक स्वरूप ‘सिक्कीम नॅशनल काँग्रेस’, ज्याचे नेते काझी दोर्जी होते, त्यांच्याशी बोलणी केली आणि त्यांना सिद्ध केले. पुष्कळ अल्प वेळेत स्थानिक लोकांनी सिक्कीम नॅशनल काँग्रेसचे नेते काझी यांना पाठिंबा देण्यास प्रारंभ झाला. त्यांनी राजावर दबाव आणला आणि सिक्कीममध्ये निवडणूक घेतली अन् निवडणूक जिंकली आणि काझी सिक्कीमचे पंतप्रधान बनले. तेव्हा सिक्कीम भारतात विलीन झाले नव्हते. योजनेनुसार काझी सिक्कीमचे पंतप्रधान झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी इंदिरा गांधींना एक पत्र लिहिले आणि साहाय्य मागितले, ‘सिक्कीमची परिस्थिती बिघडत आहे अन् राजा लोकांकडून अधिकार हिसकावून घेत त्यांना दुखावत आहे.’ या पत्रामुळे इंदिरा गांधींनी सैन्य पाठवले आणि राजा अन् त्याचा संपूर्ण राजवाडा जप्त करण्यात आला. ही परिस्थिती नियंत्रणात आल्यावर सिक्कीममध्ये जनमत घेण्यात आले, ज्यामध्ये ९७ टक्के लोकांनी भारताच्या समर्थनार्थ मत दिले. १६ मे १९७५ या दिवशी ते भारताचे राज्य बनले. काझी दोर्जी सिक्कीमचे मुख्यमंत्री बनले. अमेरिकेच्या हातातून नियंत्रण निघून ते भारताच्या नियंत्रणाखाली आले. या २ घटनांनंतर अजित डोवाल यांचे नाव मोठे झाले.

५. ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’मध्ये मुख्य भूमिका

जर्नेल भिंद्रनवाले याच्या संदर्भात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवल्यामुळे पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची हानी झाली, परिणामी शीख समुदाय पुष्कळ संतापलेला होता. तेव्हा इंदिरा गांधी मृत्यू पावल्या होत्या आणि सरकारला काही समजेपर्यंत वर्ष १९८८ मध्ये पुन्हा तशीच घटना घडली. वर्ष १९८८ मध्ये ‘खालिस्तानी कमांडो फोर्स’, ‘भिंद्रनवाले टायगर फोर्स ऑफ खालिस्तान’ आणि ‘बब्बर खालसा’ यांचे आतंकवादी सुवर्ण मंदिरात लपले होते. आतंकवाद्यांना सरकार मंदिरात घुसणार नाही, याची निश्चिती होती; कारण त्यांनी आधी केलेल्या कारवाईचे गंभीर परिणाम भोगावे लागले होते. या वेळी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुवर्ण मंदिराच्या आत न जाता आणि कुणीही आक्रमण न करता परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सांगितली. अजित डोवाल पाकिस्तानमध्ये होते. आतंकवाद्यांना बाहेर काढण्याची आणि कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने अजित डोवाल यांना शासनाने परत बोलावले अन् या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पंजाबचे तत्कालीन पोलीस महासंचालक के.पी.एस्. गिल आणि अजित डोवाल यांनी केले. सुवर्ण मंदिराला पुन्हा वेढा घातला गेला. डोवाल यांनी रिक्शावाल्याचा वेश घेऊन सुवर्ण मंदिराच्या आसपास फिरून सर्व माहिती गोळा केली.

काही दिवसांनी लक्षात आले की, सुवर्ण मंदिराच्या आत न जाता ही कठीण कारवाई पूर्ण करणे अशक्य आहे; कारण आतंकवाद्यांचे ठिकाण ठाऊक नव्हते. त्यामुळे डोवाल यांनी सुवर्णमंदिरात शिरून आणि स्वत: ‘पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा)चे ‘एजंट’ आहे’, असे सांगून  आतंकवाद्यांशी बोलणी चालू केली. त्यांनी आतंकवाद्यांना सांगितले, ‘पोलीस अधिकारी अमुक जागांवर उभे आहेत आणि या वेळी सरकार पुष्कळ घाबरले आहे. त्यामुळे ते काहीही करू शकणार नाहीत.’ अजित डोवाल अनेक वेळा आतंकवाद्यांना भेटत आणि भेटीच्या वेळी आतंकवाद्यांची लपण्याची ठिकाणे, संख्या इत्यादी सर्वच माहितीची नोंद करतात, तसेच आतंकवाद्यांना बाहेरील माहिती देऊन त्यांच्यात विश्वास निर्माण करतात. आतंकवाद्यांची सर्व माहिती मिळाल्यावर ‘राष्ट्रीय सुरक्षा गार्ड’ (एन्.एस्.जी. – राष्ट्रीय सुरक्षा रक्षक)च्या कमांडोंना बोलावण्यात येते. डोवाल सर्व माहिती कमांडोंना सांगतात त्याचप्रमाणे आतील पाणी आणि वीजसुद्धा खंडित केली जाते, जेणेकरून आतंकवादी पाणी पिण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा त्यांना लक्ष्य केले जाईल आणि मारले जाईल.

योजनेप्रमाणेच आतंकवाद्यांचा मुख्य कमांडर जगीर सिंह क्षणभर पाणी पिण्यासाठी बाहेर येतो आणि तो बाहेर येताच ‘स्निपर’ (लक्ष्यभेद करणारा बंदूकधारी सैनिक) त्याला गोळी मारतो, तो मारला जातो. अनेक दिवस पाणी पिण्यासाठी नव्हते, वीज नव्हती आणि पुष्कळ उकाडा, तसेच नेताही मारला गेल्यामुळे आतील आतंकवाद्यांचे मनोबल तुटते. या वेळी डोवाल हे आतंकवाद्यांना भारताला शरण येण्याचा आणि भविष्यासाठी पुढची योजना बनवण्याचा पर्याय देतात. नंतर अनेक चर्चेअंती डोवाल सर्व आतंकवाद्यांना शरण जाण्यासाठी पटवून देतात आणि मग १८ मे १९८८ या दिवशी सर्व आतंकवादी शरण येतात. ही अत्यंत कठीण मोहीम होती, म्हणजे विशेष चकमक आणि सैन्य कारवाई न होता ही मोहीम यशस्वी होते. अजित डोवाल आत जात असतांना आतंकवाद्यांना थोडासाही संशय आला असता, तर त्यांचा जीव जाणे निश्चित होते. या संपूर्ण कारवाईत डोवाल यांनी कमालीची रणनीती, धैर्य आणि कूटनीती दाखवली होती. २६.११.२०२५)

(क्रमशः पुढच्या रविवारी)

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल.

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/984187.html